Monday, 20 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 20.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार येत्या आठवडाभरात राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु करणार

·      अकार्यक्षम शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं बंद करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा प्रस्ताव

·      पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला अमरावतीमध्ये प्रारंभ

·      शेतकरी आत्महत्या स्मरणार्थ राज्यात सामुहिक अन्नत्याग आंदोलन

·      मराठवाडा जनता विकास परिषद अध्यक्षाच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या भूमिकेला सदस्यांचा तीव्र विरोध

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी

****

दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार येत्या आठवडाभरात राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु करणार आहे. आर्थिक दुर्बल गटातल्या वृध्दांना सामान्य आणि सक्रीय जीवन जगता यावं यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. त्या अनुषंगानं गरजु वृध्दांना चाकाची खुर्ची, ष्मा, श्रवणयंत्र, दातांची कवळी, कुबड्या आदी साधनं पुरवली जातील. ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

****

अकार्यक्षम शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठं बंद करण्याचा किंवा त्यांचं विलनीकरण करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. यासाठी सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांचं परिक्षण करून, कार्यक्षमतेनुसार त्यांचं वर्गीकरण केलं जाणार आहे. यात उत्कृष्ट संस्थांना अधिक स्वायत्तता आणि अनुदान देण्याचा प्रस्ताव असून सुधारणाक्षम संस्थांना उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. अकार्यक्षम गटातल्या संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोग मार्गदर्शन करेल, मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्यास त्या बंद किंवा विलीन करण्याचा विचार केला जाईल.

****

घटस्फोटाच्या खटल्यात अज्ञान बालकांच्या खर्चासाठी मिळालेली रक्कम एकल पालकाच्या खात्यात जमा केल्यास त्यावर आयकर सूट द्यावी अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे. अशा ठेवींवरील व्याज सध्या पालकांच्या उत्पन्नात धरले जाते, ज्यावर आयकर लागू शकतो.

****

पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला काल अमरावती इथं सुरूवात झाली.  व्यसनमुक्तीचे संदेश असलेल्या दिंडी आणि  रॅलीला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडी दाखवून आरंभ केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचं उद्धाटन करतांना  बडोले यांनी व्यसनाधिनता ही समाजाची मोठी समस्या असुन दारुबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधिनता आढळून येते या बद्दल खंत व्यक्त केली. शासन समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

 भारतीय जनता पक्षाविरूद्ध लढा देण्यासाठी समान विचाराच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल अहमदाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्धाटन करतांना बोलत होते. योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केल्यामुळं मंदिर- स्जिदच्या राजकीय चर्चेला खतपाणी मिळेल असंही त्यांनी नमूद केलं.

****

शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव म्हणून काल राज्यात सर्वत्र सामुहिकरित्या शेतकऱ्यांनी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. जवळपास ३१ वर्षांपूर्वी  १९ मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी आत्महत्या केली होती, नापिकीच्या कारणामुळे  झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढत गेलं.

मराठवाड्यात औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषद परिसरासह क्रांती चौक इथं, बीड जिल्ह्यात बीड, अंबाजोगाई, धारुर तालुक्यात उपोषण करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. परभणी जिल्ह्यात विविध गावांच्या जवळपास आठशे शेतकऱ्यांनीही उपवास केला. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष-संघटनांचे प्रतिनिधींनी उपोषण केलं. हिंगोली, उस्मानाबाद आणि जालना इथंही या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

अन्नदात्याच्या वेदनेशी नाते जोडण्यासाठी करपे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं  हे आंदोलन करण्यात आलं असून त्याची लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी  काल यवतमाळ जिल्ह्यात महागाव इथं बोलतांना केलं.

****

मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रदीप देशमुख यांनी केलेल्या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीच्या भूमिकेला परिषदेच्या सर्व सदस्यांनी काल तीव्र विरोध दर्शवला. मराठवाडा विकास आराखड्याचे जिल्हानिहाय सादरीकरण करण्यासाठी काल औरंगाबाद इथल्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन सभागृहात परीषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या मागणीचे तीव्र पडसाद उमटले. येत्या २३ तारखेला देशमुख यांचा मराठवाडा मुक्ती मोर्चाच्यावतीनं विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, स्वतंत्र मराठवाड्याला जनता विकास परीषदेचा विरोध असून संस्थापक गोविंदभाई श्रॉफ यांचाही या मागणीला विरोध होता. या पार्श्वभूमीवर परीषदेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेला बैठकीत जोरदार विरोध झाला. सर्वच सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षाला वैयक्तिक भूमिका नसते असं सांगून आधी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि मग आपली भूमिका मांडावी असं सूचित केलं. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देतांना देशमुख यांनी ही माझी वैयक्तिक भूमिका असून या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार मदत करणार असल्याची ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या गारपीटग्रस्त येलोरी, मासुर्डी गावांना पालकमंत्री निलंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान पीक विमा योजनेत ज्यांनी विमा हप्ता भरला आहे त्यांना आणि ज्यांनी भरला नाही त्यांनाही मदत दिली जाणार असल्याचं सांगत दानवे यांनी, सरकार शेतकरी कर्ज माफीच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. शेतीत शाश्वत गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी कर्जमुक्त होणार नसल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणाचं काम  येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी आठ पथकं नेमण्यात आली असल्याचं विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितलं. या सर्वेक्षणाच्या कामाचा काल त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ७१० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातल्या ११ जिल्ह्यातून जाणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं सुरु असलेल्या श्री एकनाथ षष्ठी यात्रेच्या मुख्य उत्सवाची आज दही हंडी फोडून काल्याच्या प्रसादानं सांगता होणार आहे. काल मध्यरात्री बारा वाजता छबिना मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवाच्या निमित्तानं आतापर्यंत वारकऱ्यांच्या दिंड्यांसह लाखो भाविकांनी गावातल्या नाथ मंदिरासह गावाबाहेरच्या नाथ समाधीचं दर्शन घेतलं. 

****

शासकीय मालकीच्या जागेवर शादीखाना बांधण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी न घेता, निविदा काढल्याप्रकरणी लातूर महापालिका आयुक्तांवर कारवाईची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात भाईकट्टी यांनी नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे एक निवेदन सादर केलं आहे. दरम्यान, मनपा आयुक्तांनी मात्र या निविदेत त्रूटी आढळल्यामुळे, निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं काल दादाराव कराड स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय महा वीर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला. पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्धाटन झालं. महाराष्ट्र केसरी बहुमान मिळविणारे पैलवान विजय चौधरी यांना वायुपुत्र हनुमान कुस्ती महाविर विशेष गौरव पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. या स्पर्धेमध्ये राज्यभरातले ३०० मल्ल आणि  २० महिला कुस्तीपटू सहभागी झाले आहेत. आज सांयकाळी या स्पर्धेचा समारोप होईल.

****

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात दोन बाद २३ धावा केल्या. त्यापूर्वी भारतानं पहिला डाव नऊ बाद ६०३ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजाराच्या २०२ तर, वृद्धीमान सहाच्या ११७ धावांमुळे भारताला १५२ धावांची आघाडी मिळवता आली. आज शेवटच्या दिवशी सामना रंगतदार अवस्थेत असून दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एकनं बरोबरीत आहेत.

****

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या मौजे पालवण इथल्या जमिनींच्या चौकशीसाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याचं आवाहन बीड जिल्हा प्रशासनानं केलं आहे. भूमी अभिलेख कार्यालयाचे भूमापक येत्या बुधवार आणि गुरुवारी मौजे पालवणला प्रत्यक्ष भेट देणार असून, ज्यांची जमीन संपादित झाली आहे किंवा होणार आहे अशा धारकांनी पुराव्यासह हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

//*****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...