Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
अमेरिकेतली
ओरॅकल कंपनी मुंबईत अत्याधुनिक माहिती केंद्र उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§
मुंबई-पुणे
अंतर फक्क २५ मिनिटांवर आणणाऱ्या हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पासाठी
राज्य सरकारचा पुढाकार
§
रमजान
ईदचा पवित्र सण देशभरात हर्षोल्हासात
साजरा
§
सनदी
लेखापालांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला औरंगाबादमध्ये सुरूवात
आणि
§
मागासवर्गीयांवर
होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडणं अयोग्य - केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
*****
अमेरिकेतली प्रसिद्ध ओरॅकल कंपनी मुंबईत अत्याधुनिक
माहिती केंद्र - डाटा सेंटर उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या
अमेरिका दौऱ्यात काल सॅन फ्रान्सिस्को इथं ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकार सॅफ्रा कात्झ
यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी, ओरॅकल कंपनीला हे
माहिती केंद्र उभारण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. जनसामान्यांना
आवश्यक सेवा अधिक चांगल्या प्रकारे पुरवण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्ता - आर्टिफिशियल
इंटिलिजन्सचा वापर करता यावा, या साठी एक संयुक्त गट स्थापन करण्यावरही यावेळी सहमती
झाल्याचं, मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
सायबर सुरक्षेसंदर्भात सिमॅन्टेक कंपनी सोबत मुख्यमंत्र्यांनी
काल एक सामंजस्य करार केला. सायबर पोलिसिंग संदर्भात ‘सिमॅन्टेक’आणि गृहविभाग यांचं
संयुक्त कृतीदल स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यापूर्वीच स्थापन करण्यात
आलेल्या सायबर लॅबची क्षमता वृद्धी आणि विकास साध्य होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याच्या शिष्टमंडळानं
काल नेवाडा इथं व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्राला भेट दिली. कंपनीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील
संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे अंतर फक्क २५ मिनिटांवर आणणाऱ्या या हायपरलूप तंत्रज्ञानावर
आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या
पहिल्या टप्प्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पंधरा किलोमीटर अंतराचा
प्रायोगिक मार्ग निश्चित केला आहे. व्हर्जिन हायपरलूप लवकरच आपल्या अभियंत्यांचं पथक
पुण्याला पाठवणार असल्याचं, कालच्या चर्चेत सांगण्यात आलं.
****
इंधन दरवाढीचं कारण सांगून सर्वसामान्य
नागरिकांवर लादलेली राज्य परीवहन महामंडळ- एस टी बस सेवेची १८ टक्के भाडेवाढ म्हणजे
भाजप-शिवसेना सरकारनं सुरू केलेली लुटमार असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल शिर्डी इथं बोलत होते. पीक कर्जासंदर्भात
राज्यभरातून तक्रारी येत असताना सरकारकडून तातडीनं पावलं उचलली जात नाहीत, पेरणीची
वेळ असताना शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरून परत येईपर्यंत
वाट बघायची का? असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला.
****
राज्यातल्या
११ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीं मधल्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकी
साठी येत्या १५ जुलै रोजी मतदान होणार आहे, राज्य
निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
लोहारा बुद्रुक नगरपंचायतीचा समावेश आहे. मतमोजणी १६ जुलैला होणार आहे.
****
इस्लाम धर्मियांमध्ये महिनाभराचे पवित्र रोजे ठेवल्या
नंतर येणारा ‘ईद उल फित्र’ अर्थात
रमजान ईदचा सण काल देशभरात हर्षोल्हासात
साजरा झाला.
मुस्लिम बांधवांनी काल सकाळी ठिकठिकाणी ईदची विशेष नमाज अदा करून, परस्परांना
ईदच्या शुभेच्छा दिल्या. औरंगाबाद इथं छावणी, रोजाबाग, उस्मानपुरा
इथल्या ईदगाह मैदानांवर विशेष नमाज अदा करण्यात आली.
जालना इथं जुना जालना भागातल्या ईदगाह मैदानावर,
लातूर इथं बार्शी रस्त्यावरच्या ईदगाह मैदानावर तर हिंगोली आणि परभणी इथंही मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर विशेष
नमाज अदा केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा
इथं ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची भेट घेऊन, ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नांदेड इथं, खासदार अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर,
आमदार डी पी सावंत यांच्यासह मान्यवरांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून, मुस्लिम बांधवांना
ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शीरखुर्मा ही रमजान ईदची विशेष ओळख. मराठवाड्यात
सर्वत्र शीरखुर्म्याच्या मेजवानीसह हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
****
कैलास
मानसरोवर यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था आज सिक्कीमची राजधानी गंगटोक इथून
रवाना होणार आहे. ३४ भाविक नथुला इथून चीनच्या सीमेपर्यंत बसने प्रवास करतील.
सिक्कीम सरकारनं हवामानाच्या स्थितीनुसार प्रवाशांसाठी विशेष उपाययोजना केल्या
आहेत.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
इन्स्ट्यिूटस ऑफ चार्टर्ड अकांउंटंट्सच्या औरंगाबाद,
लातूर, अकोला, आणि अमरावती विभागांच्या वतीनं औरंगाबाद इथं कालपासून दोन दिवसांच्या
सनदी लेखापाल-सीएच्या राष्ट्रीय परिषदेला सुरूवात
झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी या परिषदेचं उद्धाटन केलं.
यावेळी बोलतांना त्यांनी सनदी लेखापाल देशाच्या आर्थिक विकासाची मुळे असून सीए शिवाय आर्थिक विकास अशक्य असल्याचं सांगितलं. पालकांनी
मुलांना सनदी लेखापाल घडवण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन करून सीएंनी ग्राहकांप्रती आपली विश्वासार्हता वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं.
****
औरंगाबाद इथं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
नाट्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय एनएसडी यांच्या वतीनं आयोजित ग्रीष्मकालीन
नाट्य महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद इथं, विद्यापीठाच्या नाट्यगृहात
आयोजित या नाट्यमहोत्सवाचं उद्घाटन एनएसडीचे सुरेश शर्मा यांच्या हस्ते झालं. त्यानंतर
प्राध्यापक वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गजब तेरी अदा' या नाटकाचं सादरीकरण
झालं, २० जून रोजी महोत्सवाचा समारोप होणार असून, या काळात 'ताजमहल का टेंडर', बांयेन,
‘खामोशी सीली सीली’ तसंच घाशीराम कोतवाल या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
****
महाराणा
प्रताप यांची जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली. मुंबईत मंत्रालयात
रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं यानिमित्त कॉंग्रेसचे माजी
आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात दुचाकी रॅली काढण्यात आली. औरंगाबद
इथं विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी, तर
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हधिकारी संजीव जाधवर, यांनी
महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन केलं. मराठवाड्यात सर्वत्र महाराणा प्रताप यांना विविध कार्यक्रमांच्या
आयोजनातून अभिवादन करण्यात आलं.
****
मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा
संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडणं योग्य नसल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय
राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं ते वार्ताहरांशी बोलत होते.
मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सामाजिक
संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तत्पूर्वी, आठवले यांनी काल
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातल्या वाकडी इथं भेट देऊन अत्याचारग्रस्त कुटुंबियांची
भेट घेतली. विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या मागसवर्गीय समाजातल्या दोन मुलांची धिंड काढण्याचा
प्रकार या गावात घडला होता.
****
जीवन
रेखा एक्सप्रेस या जगातल्या पहिल्या चालत्या फिरत्या रुग्णालय रेल्वेतल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ लातूर
जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना उपलब्ध केला असल्याचं पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लाईफ लाईन एक्सप्रेस लातूर इथं आली असून, इथल्या
आरोग्य शिबीराचं उद्घाटन काल
निलंगेकर आणि खासदार सुनिल गायकवाड
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. समाजातल्या
शेवटच्या घटकापर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी
सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
येत्या
२१ तारखेला साजऱ्या होणाऱ्या
जागतिक योग दिनानिमित्त कालपासून
औरंगाबाद इथं आर्ट लिव्हिंग तर्फे योग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. काल सकाळी
विभागीय क्रीडा संकुल तसंच
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या भारतीय क्रीडा प्राधिकरण- साई
केंद्रात आयोजित या सप्ताहात नागरिकांनी, उत्स्फुर्तपणे सहभागी होत, सूर्य नमस्कार घातले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात गंगापूर इथल्या मुक्तानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरेश
पैठणकर यांचं काल ह्रदयविकाराच्या धक्क्याचं निधन झालं, ते
५२ वर्षांचे होते. समीक्षक तथा संशोधक म्हणून प्रसिद्ध असलेले पैठणकर यांचे, उत्तम
बंडू तुपे आस्वाद आणि समिक्षा, दलित स्वकथनाचे अंतरंग, साद
आणि प्रतिसाद, मराठी वाडमयाचा इतिहास आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यातलं
दलित साहित्य या विषयावर त्यांनी शोध प्रकल्प पूर्ण केला होता. त्यांच्या पार्थिवदेहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार
करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment