Saturday, 16 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची बैठक उद्या नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीचे अध्यक्ष असतील. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या उपाययोजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय पोषण आहार, इंद्रधनुष आदी योजनांची अंमलबजावणी तसंच महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळ्याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ग्रीस, सुरीनाम आणि क्युबा देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत इस्पात राज्यमंत्री विष्णू देवसाई तसंच संसद सदस्यांचं शिष्टमंडळ आहे. राष्ट्रपती नऊ दिवसांच्या या दौऱ्यात इथेंसमध्ये ग्रीसचे राष्ट्रपती प्रोकोपीस पावलोपाउलोस तसंच वरिष्ठ मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची पहिल्या टप्प्यात भेट घेतील.  

****

आसाममध्ये पूर परिस्थिती कायम असून, त्रिपुरामध्ये परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दोन्ही राज्यात सात जिल्ह्यातल्या चार लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. जवळपास सदुसष्ठ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात आज काही ठिकाणी पावसाचं वृत्त आहे. मुंबईत सकाळपासून संततधार सुरु आहे. पालघर जिल्ह्यातही बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मराठवाड्यात मात्र आज पावसानं उघडीप दिली आहे.

****

ईद उल फित्र अर्थात रमजान ईद देशभर उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यात सर्व ठिकाणी आज सकाळी नमाज अदा करण्यात आली. परभणी शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यातल्या ११ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा बुद्रुक नगरपंचायतीचा समावेश आहे. मतमोजणी १६ जुलैला होणार आहे.

****

‘जीवन रेखा एक्सप्रेस’ या जगातल्या पहिल्या चालत्या फिरत्या रुग्णालय रेल्वेतल्या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ लातूर जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना उपलब्ध केला असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लाईफ लाईन एक्सप्रेस लातूर इथं आली असून, इथल्या आरोग्य शिबीराचं उद्घाटन आज निलंगेकर आणि खासदार सुनिल गायकवाड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. या रेल्वे रुग्णालयामुळे वंचित घटकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचं खासदार गायकवाड यांनी सांगितलं.

****

भ्रष्टाचार देशासमोरील सर्वात मोठं आव्हान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे. उदयपूरमध्ये महाराणा प्रताप जयंती समारंभात ते बोलत होते. सरकारनं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी मोबाईल आणि बँक खात्यांना आधारनं जोडून अनुदानं थेट गरजुंच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराणा प्रताप यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. मंत्रालयात रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. बुलडाणा जिल्हयातील खामगाव इथं यानिमित्त कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात दुचाकी रॅली काढण्यात आली. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हधिकारी संजीव जाधवर,यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या लोहगाव इथले जवान विनोद वानोळे यांचा पार्थिव देह आज नांदेड इथं आणण्यात आला. खासदार अशोक चव्हाण यांनी विमानतळावर त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. आमदार डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनीही वानोळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वानोळे यांचं काल पठाणकोठ इथं निधन झालं, ते फिल्ड वर्कशॉपमध्ये कार्यरत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर इथल्या मुक्तानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश पैठणकर यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ५२ वर्षांचे होते.

//**********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...