Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियानाच्या अंमलबजावणीला
केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
Ø राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्याला साठ कोटी
शहात्तर लाख रूपयांचा निधी मंजूर
Ø कृषी आणि औद्योगिक वापराच्या वीज दरातली वाढ १ सप्टेंबरपासून
लागू
Ø सकल मराठा समाज संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्याचा
निर्णय
आणि
Ø आज गणरायांचं धुमधडाक्यात आगमन होणार
****
पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान अर्थात
पी.एम. आशा या नव्या सर्वसमावेशक योजनेच्या अंमलबजावणीला काल केंद्रीय मंत्रीमंडळानं
मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या कल्याण योजनांमधलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी काल वार्ताहरांना सांगितलं. या योजनेअंतर्गत
मूल्य समर्थन योजना, खासगी खरेदी आणि साठवण योजना तसंच मूल्य तुट देयक योजना या एका
छताखाली आणण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर तेलबियांच्या विक्रीत शेतकऱ्यांना
हमीभाव मिळवून देण्याच्या दृष्टीनं खाजगी उद्योगांना खरेदी प्रक्रियेत सामावून घेण्याचा
निर्णयही यावेळी घेण्यात आला.
देशातल्या तेरा हजार सहाशे
पंचाहत्तर किलोमीटरच्या रेल्वे ब्रॉडगेज
मार्गाच्या विद्युतीकरणालाही
कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून राज्याला साठ
कोटी शहात्तर लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात
आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल उच्च अधिकार प्राप्त
समितीची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. २०१७ मध्ये कीड आणि चक्रीवादळात
झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी राज्याला हा निधी प्रदान करण्यात आला आहे.
****
ऊसाच्या रसापासून शंभर टक्के इथेनॉल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉलच्या दरात वाढ करणाच्या
प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं
मंजुरी दिली आहे. साखर कारखान्यांसाठी
हा दर ५९ रूपये १९ पैसे प्रतिलिटर एवढा निश्चित करण्यात आला आहे. सी हेवी इथेनॉलची
किंमत ४३ रूपये ४६ पैसे प्रती लिटर, तर बी
हेवी इथेनॉलची किंमत ५२ रूपये ४३ पैसे प्रती लिटर इतकी ठरवण्यात आला असल्याचं पेट्रोलियम
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं
****
महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं घरगुती, कृषी आणि
औद्योगिक वापराच्या वीज दरात वाढ केली आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली असल्याचं आयोगाचे अध्यक्ष
आनंद कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
या दरवाढीनुसार कृषी क्षेत्रासाठीचा प्रतियुनिट वीजदर
हा तीन रूपये ३५ पैशांवरून तीन रुपये ५५ पैसे असा झाला आहे. घरगुती वापरासाठीच्या शून्य
ते १०० युनिटसाठीचा दर हा पाच रूपये सात पैशांवरून पाच रुपये ३१ पैसे प्रतियुनिट आणि
१०१ ते ३०० युनिटसाठीचा दर आठ रुपये ७४ पैशांवरून वरून आठ रुपये पंचाण्णव पैसे प्रती
युनिट असा करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सहा रूपये प्रतियुनिट
वीज दर निश्चित करण्यात आल्याचं आल्याचं आयोगानं सांगितलं आहे. २०२० पर्यंत हे वीजदर
लागू असणार आहेत.
****
अंधश्रद्धा
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटकप्रकरणी
औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकानं काल जालन्यातल्या गणेश कपाळे याला चौकशीसाठी ताब्यात
घेतलं आहे. जुना जालन्यातल्या शनिमंदीर चौकात कपाळे याचं झेरॉक्स दुकान आहे. दाभोलकर
हत्या प्रकरण आणि नालासोपारा स्फोटकप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या जालन्यातल्या श्रीकांत
पांगारकर याच्याशी गणेश कपाळे याची घनिष्ठ मैत्री होती. कपाळेच्या संगणकावरून पांगारकरनं
काही इमेल्स पाठवल्याची माहिती पुढे येत असून, एटीएसनं कपाळेचं संगणकही ताब्यात घेतल्याची
माहिती सूत्रांनी दिली आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या
भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरकैदेत
सर्वोच्च न्यायालयानं येत्या सोमवारपर्यंत वाढ केली आहे. यासंदर्भात इतिहासकार रोमिला
थापर यांच्यासह अन्य चार जणांनी दाखल केलेल्या याचिकेवरही सोमवारी सुनावणी होणार आहे.
पुणे पोलिसांनी गेल्या २८ ऑगस्टला देशभरात छापे घालून सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण
फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवर राव यांना अटक केली होती.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
सकल मराठा समाज संघटना आता स्वतंत्र राजकीय पक्षाची
स्थापना करणार आहे. काल कोल्हापूरमध्ये संघटनेचे प्रवक्ते
सुरेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात
आला. नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा येत्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात होणार आहे,
असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आजपासून श्री गणेशोत्सव सुरू होत आहे. घराघरांमध्ये
तसंच सार्वजनिक गणेश मंडळांतून गणेशभक्तांनी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे.
यावर्षीचा हा उत्सव नेहमीच्या दहाऐवजी अकरा दिवसांचा आहे. या अकरा दिवसात राज्यभरात
विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन होणार आहे.
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रगती, शांती, आनंद
आणि समृद्धी या मार्गावर चालण्यासाठी गणपती बप्पा आपल्याला मार्ग दाखवेल, असं राष्ट्रपतींनी
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान,
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बाजारपेठा सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांनी
गर्दी केली आहे. पर्यावरणपुरक गणेश मूर्तीला यंदाही प्रोत्साहन मिळालं असून, शाडू मातीपासून
बनवलेल्या गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग आज गणेश चतुर्थी निमित्त बंद राहणार
असल्याचं या महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी कळवलं आहे.
****
उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यात देशी गाईंचा ‘काऊ
क्लब’ स्थापन करण्याची संकल्पना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी
मांडली आहे. शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग सुरू करता यावा आणि या माध्यमातून त्यांचं
उत्पन्न वाढावं हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे. लाभार्थ्यांनी सामायिक पध्दतीनं दुधाळ
देशी गाईंचं पालन करुन दुग्धोत्पादन करणं, या दुधावर आवश्यक संस्करण आणि प्रक्रिया
करुन दूध तसंच दुग्धजन्य पदार्थांचे विशिष्ट ब्रॅंड विकसित करुन त्याची विक्री करणं
याबाबींचा या संकल्पनेत समावेश आहे.
****
देशातल्या जनतेला स्वतः च्या हक्काची पक्की घरं मिळावीत
या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नागरिकांना मिळत
आहे. या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम आणि सबसिडी ही थेट लाभार्थ्यांच्या आधारलिंक बँक
खात्यात जमा होत आहे. पालघर जिल्ह्यातले आशिष रावत यांना आवास योजनेअंतर्गत फ्लॅट साठी ही सबसिडी मिळाली.
माझ नाव आशिष दत्तात्र्य राऊत. मी भुईसर मध्ये राहतो. भुईसर मध्ये एक फ्लॅट
घेतला, होम लोन केलं. पतप्रधान आवास योजनेचा फार्म मेन्शन केला. आणि ते पंतप्रधान आवास
योजनेचे पैसे मला मिनिम्म चार महिन्यात माझ्या खात्यात आले आणि मला तो मॅसेजपण आला.
की हि योजना एकदम चांगली आहे. आणि एकदम सोपी प्रोसेजर आहे. एक सिंगल फार्म येतो. त्याच्या
मध्ये आधारकार्ड आणि पॉनकार्ड यांच्या झेरॉक्स जोडल्या फक्त, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी
लागते. बँक आपली प्रोसेसिंग करते सर्व. आणि मला त्याच्यातून दोन ते अडिच हजाराचा फरक
झाला हप्त्या मध्ये.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या सोयाबीन
पिकाच्या शेंगा पक्व होण्याआधीच वाळत असल्यानं कृषी विभागानं तालुक्यातल्या पिकांचे
पंचनामे करावेत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं पाथरीच्या तहसीलदारांकडे
निवेदनाद्वारे केली आहे. त्याचप्रमाणे पावसात खंड पडल्यामुळे पिकं वाळण्याचा धोका असल्यानं
या पिकांना वाचवण्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावं, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
सोनपेठ तालुक्यातही अत्यल्प पाऊस झाल्यानं आणि जमिनीतली पाणी पातळी खालावल्यानं पिकं
सुकत चालल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या सावंगी बायपासवर काल भरधाव मालमोटारीनं
एका दुचाकीला दिलेल्या धडकेत शाळेत जाणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मालमोटार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी
दिली.
****
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं शासकीय
कला महाविद्यालयात काल ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात
आलं होतं. शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएम पक्षानं ईव्हीएमला विरोध दर्शवत मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी केली. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष
डॉ. गफ्फार कादरी, कॉंग्रेसचे जगन्नाथ काळे यांच्यासह पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित
होते.
*****
***
No comments:
Post a Comment