Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
शेतमालास
योग्य भाव मिळण्यासाठी राज्य सरकार धोरणं आखणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·
नक्षलवाद्यांशी
संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी
९० दिवसांची मुदतवाढ
·
राज्य
सरकारची सर्व संकेतस्थळं दिव्यांगांभिमुख करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
आणि
·
अठराव्या अशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप. तर, चौथ्या कसोटीत भारताला साठ धावांनी पराभूत करून
इंग्लंडनं पाच कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली
****
शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी राज्य सरकार धोरणं
आखणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबईत वाशी इथं एका
पतसंस्थेच्या कार्यक्रमात काल ते बोलत होते. केंद्र सरकारनं केलेल्या राष्ट्रीय बाजारपेठेच्या
निर्णयामध्ये बाजार समितीचं महत्व वाढणार असल्याचं नमूद करुन
समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी वित्तीय संस्था महत्वाच्या असल्याचं ते म्हणाले.
देशासह राज्याच्या आर्थिक वाटचालीत वित्तीय संस्थांचा वाटा मोठा असून तरूणांना स्टार्टअप
उद्योगासाठी कर्ज देण्यास त्यांनी पुढाकार
घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून जून महिन्यात अटक केलेल्या पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी
पुणे सत्र न्यायालयानं काल पुणे पोलिसांना
९० दिवसांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी परवा शनिवारी
न्यायालयात अर्ज केला होता. तो कालच्या सुनावणीत न्यायालयानं मंजूर केला. या प्रकरणाची
व्याप्ती मोठी असल्यानं पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी
सरकारी वकिलांनी या सुनावणी दरम्यान केली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळाल्यानं
आरोपींना जामिनासाठी फायदा मिळणार नाही. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा
संबंध असल्याच्या आरोपावरून आणि या परिषदेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी जून महिन्यात सुधीर ढवळे,
रोना विल्सन, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन या पाच जणांना अटक केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात
अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांवर अत्याचार वाढले असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं केंद्रीय
मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. मात्र जातीशी
संबंधित अत्याचार देशात सुरूच आहेत, असं सांगून सरकार कोणत्याही पक्षाचं असो, गुन्हेगारांविरूद्ध
सरकारनं पावलं उचलायला हवीत असं ते पुढं म्हणाले. २०१९ ची निवडणूक दक्षिण मध्य मुंबईतून
लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
****
इतर पक्ष फोडणं, विरोधकांना धमकावणं, प्रचंड पैसा
खर्च करणं या मार्गांनी भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकत असल्याचा आरोप महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते काल धुळे इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. २०१४ ला
पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं, पण त्या बदल्यात मोदींनी नोट बंदी केली, असं
सांगत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. शहरातली गर्दी वाढतेय, परप्रांतीय
लोक राज्यात येत आहेत, ही स्थिती उद्याचं आव्हान
आहे, असं ते म्हणाले.
****
राज्य सरकारच्या सर्व संकेतस्थळांमध्ये दिव्यांगांना
वापरता येतील, अशा रितीनं बदल करावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
स्वयंसेवी संघटनेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे
निर्देश दिले. संकेतस्थळांमध्ये बदल केल्यानंतर त्या बाबतचा अहवाल पुढच्या तीन महिन्यात
सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शिवेसेनेचे उपनेते हाजी
अराफत शेख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजप प्रवेश केला. दोनच दिवसापूर्वी
त्यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी सरकारनं नियुक्ती केली आहे.
****
राज्यातल्या ३० जिल्ह्यांमध्ये पुनर्रचित हवामान
आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी, पेरू,
डाळींब, आंबा, काजू या फळपिकांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्या महसूल मंडळात
अधिसूचित फळपिकांचं क्षेत्र २० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या महसूल मंडळासाठी
ही योजना आहे.
****
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड-बीएसएनएल तर्फे ग्राहकांसाठी
सुरू करण्यात आलेली सीडीएमए तरंग सेवा परवा बुधवारी पासून बंद करण्यात येणार आहे. मोबाईल
क्षेत्रात वाढलेल्या कंपन्या आणि आलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे या सेवेची मागणी कमी
झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं बीएसएनलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
इंडोनेशियात
जकार्तामधल्या अठराव्या अशियाई क्रीडा स्पर्धेचा काल दिमाखदार सोहळ्यानं समारोप झाला.
समारोपाच्या कार्यक्रमात महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही भारतीय ध्वजवाहक
होती. या स्पर्धेत ४० क्रिडा प्रकारात ४६५ प्रकारच्या स्पर्धा झाल्या. भारतानं स्पर्धेत
पंधरा सुवर्ण,चोवीस रौप्य आणि तीस कांस्य पदकांची कमाई करत पदक तालिकेत आठवं स्थान
मिळवलं. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताची ही सर्वाधिक पदकांची कमाई आहे.
****
चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा
६० धावांनी पराभव केला. या बरोबरच इंग्लंडनं पाच पैकी तीन सामने जिंकत ही मालिका जिंकली
आहे. विजयासाठी भारताला २४५ धावांच उद्दिष्ट इंग्लंडनं दिलं होतं. मात्र भारताचा संघ
१८४ धावांतच सर्वबाद झाला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अलीनं चार गडी बाद केले, त्याला
सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या डावातही त्यांनं पाच गडी बाद केले होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तहसील कार्यालयाच्या नव्या
इमारतीचं उद्द्घाटन काल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झालं. यावेळी
खासदार सुनिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. निलंगा पंचायत समिती तसंच तालुक्यातल्या
जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना
निलंगेकर यांनी, जिल्ह्यात प्रस्तावित रेल्वे बोगी निर्मिती प्रकल्पासह सुरु असलेली
राष्ट्रीय महामार्गाची कामं पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी
निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला.
****
लातूर जिल्ह्यात औसा इथं काल जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कार्यशाळा घेण्यात
आली. तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कृषी सहाय्यक यांना
या कार्यशाळेद्वारे जलसिंचनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. पालकमंत्री संभाजी पाटील
निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी
जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांची यावेळी उपस्थिती होती.
****
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातल्या पेझारा
इथल्या रुपाली योगेश पाटील यांनी सन २०१७-१८ या काळात प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा
लाभ घेतला. या योजनेच्या झालेल्या लाभाविषयी बोलतांना त्या म्हणाल्या.
मी सन २०१७-१८ या वर्षात
गरोदर असल्याने, मला माझ्या गावातील सिस्टर ताईन प्रधानमंत्री मातृवंदन गरोदर योजना
बद्दल माहिती सांगितले. व त्यांनी माझी योग्य वेळी पंतप्रधान मातृवंदन योजना मध्ये
नोंदणी केली. त्यामुळे मला योग्यवेळी अनुक्रमे
१ हजार, २ हजार, २ हजार रूपये असे तीन टप्यामध्ये एकून ५ हजार रूपये मला लाभ मिळाला
असून, त्याचा उपयोग मला माझ्या व मुलाच्या
पोषण आहारासाठी झाला. त्याबद्दल मी शासनाचे आभारी आहे. धन्यवाद.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीचं
लवकर दर्शन घडवून आणण्यासाठी खासगी व्यक्तींमार्फत पैसे घेऊन काळा बाजार केल्याप्रकरणी
अटकेत असलेल्या सचिन अधटराव यांना आज तीन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली
आहे. थेट दर्शनाचं आमिष दाखवून अधटरावनं हैदराबाद इथून आलेल्या दोन भाविकांकडून आठशे
रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती.
****
भगवान श्रीकृष्ण जयंती देशभरात भक्तीभावानं साजरी
होत आहे. मध्यरात्री ठिकठिकाणी भजन-किर्तनाच्या नादात बालकृष्णाचा जन्मोत्सव झाला.
कृष्णाच्या मंदीरांवर रोषणाईसह गाभाऱ्यांमध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे. आज जन्माष्टमीनिमित्त
गोपाळकाला - दहीहंडीचा पारंपारीक उत्सव असून राज्यात यानिमित्त गोविंदा पथकांसाठी जय्यत
तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या
नायडू यांनी देशवासीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, औरंगाबाद
शहरात दहीहंडीमुळं वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यात टी.व्ही. सेंटर , कॅनॉट
प्लेस, पुंडलिक नगर – गजानन महाराज मंदिर – त्रिमुर्ती चौक, रेल्वेस्थानक रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर चौक,
गुलमंडी याठिकाणांवरील वाहतुकीचा यात समावेश आहे.
*****
***
No comments:
Post a Comment