Tuesday, 4 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



·      न्यायप्रविष्ट प्रकरणांची माध्यमांना माहिती देण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

·      दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर याचा सीबीआयकडे ताबा

·      जन्माष्टमी तसंच दहीहंडी उत्सव काल देशभरात उत्साहात साजरा

आणि

·      ‘स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धेत’ हिंगोली जिल्ह्यातली गोटेवाडी आश्रमशाळा राज्यातून पहिली

****



 न्यायप्रविष्ट प्रकरणांसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, त्यात पुरावा ठरू शकणाऱ्या कागदपत्रांचं जाहीर वाचन करणं चूक आहे, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक प्रकरणी, अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीरसिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन, माहिती जाहीर केली होती. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.



 भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांना न करू देता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेला, न्यायालयानं काल स्थगिती दिली.



 दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकर याला चौकशीसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून मुंबई सत्र न्यायालयानं काल त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.



 नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरच्या पोलीस कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

****



 देशातलं जनमत बदलू लागलं असून,ता लोकसभा निवडणुका झाल्या, तर भारतीय जनता पक्षाला दोनशे जागाही मिळणार नाहीत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशात भाजपा शिवाय पर्याय नाही, असा भ्रम निर्माण केला जात आहे. मात्र सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आता जनता करेल, असंही ते म्हणाले. राज्यातल्या रस्त्यांच्या दुर्व्यवस्थेबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

****



 भगवान श्रीकृष्णाचा ज्न्मोत्सव, जन्माष्टमी काल देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाची ज्न्मभूमी असलेल्या मथुरा इथं या सणाचा मुख्य समारंभ मोठ्या श्रद्धेनं आणि उल्हासात साजरा झाला. मुंबई तसंच ठाण्यासह राज्यातही ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी झाली.



 ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, गोविंदा पथकांनी दहीकाल्याची हंडी फोडावी,  अत्याचार-भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू, असं ते यावेळी म्हणाले. थरांवर थर लावून मानवी मनोरे रचणाऱ्या पथकांचं त्यांनी कौतुक केलं. 



 नवी मुंबईतल्या अनेक प्रमुख मंडळांनी मात्र केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या बहुतांश दहीहंड्या रद्द करण्यात आल्या. मात्र अनेक गावांमध्ये पारंपरिक पध्दतीनं दहीहंडीचा उत्सव काल साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबईत धारावी इथं एका गोविंदाचा मानवी मनोऱ्यावरून कोसळून मृत्यू झाला, तर ठिकठिकाणी घडलेल्या लहान मोठ्या घटनांमध्ये सुमारे शंभरावर गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे.



 औरंगाबाद जिल्ह्यातही विविध ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातव्या महानुभाव आश्रमासह, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ - इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरात दहीहंडी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.



 भाजप प्रणित सरकारच्या पापांची हंडी जनता २०१९ मध्ये फोडेल, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात कराड इथं दहीहंडीच्या कार्यक्रमात काल बोलत होते. काँग्रेसनं सुरू केलेल्या जन संघर्ष यात्रेचा एक भाग म्हणून, यावेळी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.

****



 सार्वजनिक परिवहनासाठी भारत लवकरच ‘एक देश एक कार्ड’ धोरण जाहीर करेल, असं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत ‘फ्युचर मोबिलिटी समिट २०१८’ मधे बोलत होते. परिवहनाच्या विविध प्रकारांना जोडण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं, त्यांनी सांगितलं. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकासाचा कणा म्हणजे चांगलं परिवहन असून, सकल घरेलू उत्पादनाच्या चार टक्के इतका वाटा रस्ते परिवहनाचा असतो, असं कांत म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 केंद्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, ‘स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धेत’ हिंगोली जिल्ह्यातल्या गोटेवाडी आश्रमशाळेनं राज्यात पहिला तर देशातून सातवा क्रमांक पटकावला आहे. प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या वतीनं देशभरात स्वच्छ भारत विद्यालय स्पर्धा घेण्यात आली होती. येत्या १८ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं काल विविध मागण्यांसाठी परभणी आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. परभणीत काढण्यात आलेल्या सायकल मोर्चानं निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.



 जालन्यातल्या मोर्चात आमदार राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.



 इंधन दरवाढ रद्द करावी, मागील वर्षी बोंडअळींनं नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

****



 पाणी अडवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे योग्य दिशा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं, शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल   अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित, शेतकरी परिषदेत बोलत होते.  शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू डॉ के. पी. विश्वनाथ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. शरद जोशी यांच्याबरोबर काम केलेल्या तेरा कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

****



 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं महत्त्व ग्रामीण भागातल्या जनतेलाही पटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मजगाव इथल्या जान्हवी शिवलकर या गृहिणीनं या योजनेचा लाभ घेतला असून या लाभाविषयी त्यांनी सांगितलं…



माझं नाव जान्हवी जितेंद्र शिवलकर. मुक्काम मामूरवाडी, पोस्ट मजगाव, तालुका जिल्हा रत्नागिरी. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेचे लाभधारक आहे. या योजनेचे महत्त्व मला पटलेले आहे. म्हणून मी योजनेमध्ये सहभागी झाले. बॅक ऑफ महाराष्ट्रा मधून दर वर्षी माझे ३३० रूपये या योजने मध्ये जमा होतात. दरवर्षी कोणतेच कागद मला द्यायला लागत नाही. पुढे जिवनामध्ये माझे काही कमी जास्त झाले तर माझ्या पश्चात माझ्या कुटूंबाला २ लाख रूपये मिळतील म्हणून मी या योजनेचा लाभ घेतला आहे.

****



 लातूर इथं काल बहुभाषिक कवींनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींच्या कविता सादर करुन, त्यांना आदरांजली अर्पण केली. ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे या काव्यांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष विधीज्ञ संजय पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अजय पांडे, रेवण शहाबादे, संतोष कुलकर्णी, विनीता कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. 

****



 माजी फुटबॉलपटू आर्थर परेरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते सत्तर वर्षांचे होते. १९७० च्या दशकात ते, राज्य तसंच राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सदस्य होते.

****



 नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पात्रालगत अवैधरीत्या वाळू उपसा करत असताना झालेल्या अपघातात काल एक जण ठार तर अन्य तीन जण जखमी झाले. अवैध वाळू व्यवसायानं एक बळी घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल मधुकर बनकर या खाजगी इसमाला जमिनीबाबतचे शासकीय काम करून देण्यासाठी, पंचावन्न हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तो जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथला रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

       

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांनी काल परभणी इथं धरणे आंदोलन केलं. खासदारांच्या मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***  

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...