Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
राज्यातल्या
३२ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्याला
मान्यता
·
प्रत्येक
महसूल विभागात दिव्यांगांसाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन होणार
·
औरंगाबाद
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; आज वितरण
·
परंड्याचे
माजी आमदार विधिज्ञ वासुदेवराव देशमुख यांचं निधन
आणि
·
औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी पुनरूज्जीवन प्रस्तावाला महापालिकेची मंजुरी
****
राज्यातल्या ३२ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या
सुमारे १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्याला मान्यता देण्यात
आली आहे. या ३२ संस्थांमध्ये पुणे विभागातल्या नऊ, कोकण पाच, नागपूर सहा, नाशिक दोन,
औरंगाबाद तीन आणि अमरावती विभागातल्या सात स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यातल्या २१३ स्थानिक स्वराज्य संस्थांचा घनकचरा व्यवस्थापन
आराखडा यापूर्वीच मंजूर झाला असून काल, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ३२ संस्थांनी त्याचं सादरीकरण केलं. औरंगाबाद
विभागातील तुळजापूर, मुखेड आणि वसमतनगर या स्थानिक स्वराज संस्थांचा यात समावेश आहे.
****
राज्यात प्रत्येक महसूल विभागात दिव्यांगांसाठी एक
विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन होणार आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय मंत्री
राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. दिव्यांगांसाठी कौशल्य विकास अंतर्गत
नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कर्णबधीर, अंध, सेरेब्रल पाल्सी, आत्ममग्न, अस्थिव्यंग,
या गटातल्या दिव्यांगांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, हा निर्णय घेतला असून, यासाठी
सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित केल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचं
सरकार राज्यात सत्तेवर आणलं पाहिजे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण
यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथं काल जनसंघर्ष सभेत ते बोलत होते.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार राजकीय फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण
करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारच्या विविध धोरणांवर
त्यांनी यावेळी टीका केली.
****
सध्या केंद्र सरकार वारंवार इंधन दर वाढ करुन आपली
तिजोरी भरत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी
काल मुंबईत केला. आगामी चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेलचे भाव थोडेसे
कमी करुन जनतेची काळजी असल्याचा आव केंद्र सरकार आणेल, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी
केली. तेल कंपन्यांचा फायदा करुन देण्यासाठीच इंधन दरवाढ केली जात असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि लेबर सेलचे
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
नरेंद्र पाटील यांची नुकतीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी
नियुक्ती झाली असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी लेफ्टनंट कर्नल
प्रसाद पुरोहित याच्या अर्जाची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला.
आपलं अपहरण आणि छळ झाल्याचा आरोप पुरोहितनं केला असून, याची विशेष तपास पथकामार्फत
चौकशी करण्याची मागणी या अर्जात केली आहे. या टप्प्यावर या अर्जाची सुनावणी केली, तर
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर त्याचा परिणाम होईल, त्यामुळे अर्जदारानं याबाबतीत कनिष्ठ
न्यायालयात जावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या माध्यमिक शाळांमध्ये गेल्या २२ वर्षापासून
अर्धवेळ काम करणाऱ्या ५९६ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार ५९६ ग्रंथपालांचे रिक्त जागांवर समायोजन झालं, तर उर्वरित
जागांवर अर्धवेळ ग्रंथपालाचं नियोजन केलं जाणार आहे.
****
श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी
१४८ कोटी ३७ लाख रूपये मंजूर करण्यात आले असून
या मंजूर आराखड्यातील सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातल्या कामांसाठी १५ कोटी ४० लाख रुपयांचा
निधी उपलब्ध करून दिला आहे. पर्यटन सुविधांच्या भांडवली खर्चासाठी या निधीचा वापर करण्यात
येणार आहे.
****
आज पाच सप्टेंबर, शिक्षक दिन. राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी शिक्षक दिनाबद्दल देशातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु-शिष्य
परंपरा हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यं असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
शिक्षकांनी आर्थिक दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या
सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं
आहे. २०१७ सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधताना ते
काल बोलत होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधली दरी कमी करण्यासाठी शिक्षकांनी काम करण्याची
गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सर्वत्र
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातल्या १६ शिक्षकांना
काल आदर्श पुरस्कार जाहीर केले. आज दुपारी चार वाजता शहरातल्या तापडिया नाट्यगृहात
या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास
मंत्रालयानं घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कार स्पर्धेत लातूर जिल्ह्यातल्या दोन शाळांना
प्रत्येकी ५० हजार रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. निलंगा तालुक्यातल्या जाऊ अणि
रेणापूर तालुक्यातल्या बावची इथल्या सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांना
हे पुरस्कार मिळाले आहेत. पुरस्कारात अव्वल ठरलेल्या जिल्ह्यात लातूरचा देशात तिसरा
क्रमांक आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्येष्ठ विधिज्ञ
वासुदेवराव देशमुख यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. १९७२ ते
१९८१ या कालावधीत सलग दोन वेळा ते अनुक्रमे भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि जनता पक्षाकडून
भूम - परंडा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. विधीमंडळाच्या अंदाज
समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव
या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पासह तालुक्यात अनेक सिंचन प्रकल्प, दळणवळण तसंच शिक्षणाच्या
सोयीसुविधा उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला. देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल
परंडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं
पुनरूज्जीवन करण्याच्या प्रस्तावाला काल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात
आली. सभेनं हा प्रस्ताव मंजूर करताना, औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी समोर विविध स्वरूपाच्या
१५ अटी घातल्या. योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे २८९ कोटी रूपये अतिरिक्त निधीची
मागणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. लवकरच हा प्रस्ताव राज्य शासनानं कडे
पाठवणार असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं.
दरम्यान, कॉंग्रेस
पक्षानं या प्रस्तावाला विरोध करत सभात्याग केला. स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीला काम
देण्यात येत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी विषय पत्रिकाही फाडल्या.
या प्रस्तावावर महापालिकेत चर्चा सुरु असतांना महापालिका मुख्यालयासमोर, समांतर विरोधी
नागरी कृती समिती आणि संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आलं.
****
प्रधानमंत्री जनऔषधी
योजनेमुळे गरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासोबतच अनेक बेरोजगार युवकांना
रोजगार मिळाला आहे. धुळे जिल्ह्यात चंद्रकांत बंब यांनी जनऔषधी केंद्र सुरू केलं आहे.
आपला अनुभव त्यांनी या शब्दात व्यक्त केला…..
मी चंद्रकांत भाऊलाल बंब.
धुळे येथील रहिवासी असून, केंद्र सरकारच्या जनऔषधी योजने अंतर्गत नवकार जनऔषधी या नावाने मेडीकल स्टोअर २०१५ मध्ये
सुरू केले आहे. या माध्यमातून सर्व लोकांसाठी सरकारने स्वस्त व दर्जेदार औषधी उपलब्ध
करून दिले आहेत. आमच्या मेडीकल मधून धुळे शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो लोकांना
याची मदत होत आहे. आम्हाला या माध्यमातून चांगला रोजगार मिळाला आहे. सरकारची ही जनऔषधी
योजना खरोखर खूप चांगली असून जनतेने याचा खूप पूरेपूर लाभ घ्यावा.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख रेखा फड यांना काल बीड शहर पोलिसानी अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घालून महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ तसंच
धक्काबुक्की केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केरळ पूरग्रस्तांच्या
मदतीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा मंडळातर्फे २० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे काल सुपुर्द करण्यात आला. नृसिंहवाडी इथल्या श्री नृसिंह सरस्वती
स्वामी दत्त देवस्थानतर्फेही पुरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा वन इथं कार्यरत वन मजूर शाहू सोनवणे याला काल एक हजाराची
लाच घेतांना उस्मानाबाद लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडलं. अपसिंगा जंगलात जनावरे चरण्यासाठी
वन विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या चराई
पाससाठी सोनवणे यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
बोलठाण इथला पोलिस पाटील जब्बार सत्तार पठाण याला २० हजार रूपये लाच घेतांना काल लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं सापळा रचून अटक केली. आत्महत्येच्या एका प्रकरणात, मयताच्या पत्नीवर
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
आखाडा बाळापूर इथं माझा गणपती माझा निसर्ग या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना
पर्यावरणपुरक गणपती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. बाळापूर परिसरातल्या ७० ते ८०
विद्यार्थ्यांनी गणपती बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची
शपथ घेतली.
*****
***
No comments:
Post a Comment