Thursday, 6 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



·      राज्यातल्या बांधकाम बंदी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

·      विद्यार्थ्यांना आधारपत्र मिळवून देण्याची जबाबदारी शाळांची असल्याचं, विशेष ओळख प्राधिकरणाकडून स्पष्ट

·      शिक्षक दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

आणि

·      लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि आठ सदस्यांची निवड, मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

****



 राज्यातल्या बांधकाम बंदी आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे न्यायालयानं, एकतीस ऑगस्टला महाराष्ट्र, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात बांधकामांवर पूर्ण बंदी घातली होती. महाराष्ट्रानं घनकचरा व्यवस्थापनाची ठोस योजना सुरू केल्यानं ही स्थगिती उठवावी अशी मागणी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयानं ही स्थगिती दिली.

****



 आधारपत्र मिळवून देण्याची जबाबदारी शाळांची असून त्यासाठी त्यांनी तशी सुविधा निर्माण करावी, असं भारतीय विशेष ओळख प्राधिकरण-युआयडीएआयनं स्पष्ट केलं आहे. आधार क्रमांक नसल्यामुळे काही शाळा बालकांना प्रवेश नाकारत असल्याचं लक्षात आल्यानंतर प्राधिकरणानं ही सूचना केली आहे. आधार पत्र नसल्यामुळे कुठलाही बालक शालेय प्रवेश आणि इतर सुविधांशिवाय वंचित राहू नये, याची खातरजमा शाळांनी करावी, असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी म्हटलं आहे. आधार क्रमांक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना इतर माध्यमांद्वारे सर्व सुविधा मिळवून द्याव्यात असंही प्राधिकरणानं बजावलं आहे.

****



 पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचे, बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे, सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात सादर केली. या कार्यकर्त्यांच्या मुक्त विचारांशी कारवाईचा काहीही संबंध नसल्याचं, सरकारनं आपल्या उत्तरात स्पष्ट केलं आहे.

****



 आवश्यकता भासल्यास पुन्हा नोटबंदी लावू हे, रिजर्व्ह बँकेचं सांगणं जनता सहन करणार नाही, असं शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्षांतर्गत आढावा बैठकीनंतर, ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नोटबंदी फसली आणि रुपया मृत्यू शय्येवर आहे, याची सरकार जबाबदारी घेणार आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. शहरी नक्षलवाद आणि सनातन संस्था याबद्दल नुसते आरोप न करता पोलिसांनी सबळ पुरावे सादर करावेत, असं ते म्हणाले.

****



 आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात स्त्रियांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काल राज्यभर पडसाद उमटले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना काल सातारा इथं, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्यांनी घेराव घालत, कदम यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीनं नाशिकमध्ये निदर्शनं केली. तर, आमदार कदम यांना पक्षातून काढून टाकावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

****



 मुंबईतली राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था आणि, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती इथल्या प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थांमधल्या प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन चार हजार रूपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. यापूर्वी या प्रशिक्षणार्थींना दरमहा दोन हजार रूपये विद्यावेतन मिळत होतं.

****



 शिक्षक दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं. काल शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रौप्यपदक, सन्मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असून, ४५ शिक्षकांना यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.



 राज्य सरकारनंही काल राज्यातल्या १०६ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. सातारा इथं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, शिक्षकांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची ग्वाही दिली.



 औरंगाबाद इथं, महापालिका तसंच जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी, महापालिका शाळेतल्या ११० शिक्षकांनी लिहिलेल्या ‘मुठभर गोष्टी’ या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेमुळे मराठवाड्यातल्या तेरा धरणांमधला पाणीसाठा सिंचन, उद्योग आणि पिण्यासाठी उपलब्ध होणार असल्यानं मराठवाड्याच्या विकासासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असं पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पिसादेवी इथल्या जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तसंच पूल आणि रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या वीस हजार गावातल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून जवळपास दहा हजार कोटी रुपये खर्च करून प्रत्येक गावाला पाणी  पुरवठा करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.

****



 लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आणि आठ सदस्यांची निवड प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवली आहे. स्थायी समितीत भारतीय जतना पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी आठ सदस्य आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभापती निवडीला विलंब झाल्याचं सांगत, महापौरांनी गेल्या जून महिन्यात, स्थायी समितीच्या बैठकीऐवजी सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सभापतींची निवड केली होती. महापालिकेतले विरोधी पक्षनेते विधीज्ञ दीपक सूळ यांनी या निवड प्रक्रियेस आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता, तो काल घोषित करण्यात आला.



 दरम्यान, न्यायालयाचा हा निकाल म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा विजय असल्याची प्रतिक्रया काँग्रेस पक्षानं व्यक्त केली आहे. तर, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक शैलेश गोजमगुंडे यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 ‘पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१६ - १७ वर्षासाठीची पीकविम्याची रक्कम औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. गंगापूर तालुक्यातल्या बोलठाण इथले शेतकरी चाँद खाँ फरीद खाँ पठाण यांना या योजनेचा लाभ झाला. याविषयी बोलतांना ते म्हणाले….



मी शेतकरी गंगापूर तालुक्यातील बोलठाणा येथील रहिवासी आहे. चाँद खाँ फरीद खाँ पठाण आहे. मला २०१६-१७ चा पंतप्रधान  पीक विमा मिळाला आहे, खरीपाचा . आणि मक्का, आणि बाजरी, आणि मुग अश्या प्रकारे पिक विमा मला मिळालेला आहे. मी लाभार्थी आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या विनाअनुदानित प्राध्यापकांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक परिसरात ‘भी मांगो’ आंदोलन केलं. कार्योत्तर मान्यतेची अट रद्द करावी, ज्यावर्षी मूल्यांकन केलं जाईल त्याच वर्षीचं वय आणि विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात यावी, अनुदान पात्र सर्व महाविद्यालयं प्रचलित नियमानुसार अनुदानासह घोषित करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात जमा झालेली रक्कम शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****



 देशातल्या शेतकऱ्यांना समाधानानं जगता यावं यासाठी त्यांना तंत्रज्ञान आणि बाजाराचं स्वातंत्र द्यावं, असं शेतकरी संघटनेचे परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी म्हटलं आहे. परभणी इथं काल शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विचार यात्रेत ते बोलत होते. शरद जोशी यांचे विचार तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, असं संयोजकांनी सांगितलं.   

****



 उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांसह मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा नाबार्ड अंतर्गत पॅकेज मध्ये समावेश करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे या ्रकल्पासाठी दोन हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपये निधी मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. जलसंपदा मंत्री गिरी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी दिली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यातलं २६ हजार  क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

****



 राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार बीडचा कुस्तीपटू राहूल आवारे याला शासनानं पोलिस उपअधिक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. काल त्याच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. धावपटू ललिता बाबर, आणि भारोत्तोलक अमित निंबाळकर, यांनाही शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...