Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø
अनुसूचित
जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदींना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा
नकार
Ø
क्रीडापटूंनी खेळाकडे करिअर म्हणून
पाहण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Ø
राजकीय
संन्यास घेणार नसल्याचा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खुलासा
Ø
म्हैसमाळ,
वेरुळ- खुलताबाद आणि सुलीभंजन या पर्यटन स्थळांच्या विकास आराखड्याला मंजुरी
आणि
Ø
यंदाचा
‘बी.रघुनाथ पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांना प्रदान
****
अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदींना
स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. केंद्र सरकारनं संसदेच्या पावसाळी
अधिवेशनात या कायद्यात दुरुस्ती करुन, कायद्यातल्या तरतुदी पूर्ववत केल्या होत्या.
त्यावर आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत, यासंदर्भात
काल झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं या तरतुदींना स्थगिती देण्यास नकार देत,
केंद्र सरकारला याबाबत सहा आठवड्यात आपलं मत नोंदवण्यास सांगितलं आहे.
गोरक्षक तसंच जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या दिशा निर्देशांवर सर्व राज्यसरकारांनी येत्या आठवडाभरात
अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या
सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, अशा हल्ल्यांसंदर्भात १७ जुलै रोजी दिलेल्या निकालावर,
अंमलबजावणीबाबत फक्त ११ राज्यांनीच अहवाल सादर केल्याचं सांगितलं. ज्या राज्यांनी अहवाल
सादर केला नाही, त्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल, असा इशाराही
न्यायालयानं दिला आहे.
****
सर्वांना
स्वस्त दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यावर सरकार काम करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका परिषदेत बोलत होते. केंद्र
सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी
सांगितलं. रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ३० खाटा राखीव ठेवाव्यात, असे निर्देश
सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आल्याचं आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे
यांनी यावेळी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु
केलेल्या ‘खेलो इंडिया’ या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये
दिसून आला असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं
आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशातले ९० टक्के ॲथलीट ग्रामीण भागातले
असल्याचं सांगून, राठोड यांनी, ग्रामीण क्षेत्रातल्या प्रतिभावान खेळाडूंचा गौरवपूर्ण
उल्लेख केला.
दक्षिण कोरियात चांगवोन इथं सुरु असलेल्या जागतिक
नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल
प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या हृदय हजारिकाचं, राठोड यांनी अभिनंदन केलं
आहे.
****
राज्यातल्या ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती
देण्यात आली असून, खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करावी आणि राष्ट्रीय
- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवून राज्याचा आणि देशाचा लौकिक वाढवा, असं आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं काल महिलांच्या राष्ट्रीय
कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुष्टीयुद्ध क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी
नागपूर इथल्या विभागीय क्रीडा संकुल परिसरात मुष्टीयुद्ध अकादमी सुरु करण्याची तसंच
इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षानं
शेतकऱ्यांसंदर्भातल्या प्रमुख दोन मुद्यांना पाठिंबा दिला, तर काँग्रेसबरोबर आघाडी
करायला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयार असल्याचं, सूतोवाच पक्षाच्या सूत्रांनी काल
वृत्तसंस्थेशी बोलताना केलं. शेतकऱ्यांना योग्य हमी भाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी
लागू करणं, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत. २०१९च्या लोकसभा
निवडणूकीत आपला पक्ष कोल्हापूर, हातकणंगले, माढा, वर्धा, बुलडाणा, आणि सांगली या सहा
मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्यावर भर देईल असंही यावेळी सांगण्यात आलं.
****
राजकीय संन्यास घेणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर पाटील यांनी
काल याबद्दल खुलासा केला. निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं, त्यामुळे
निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले. निवडणूक लढवण्यासंदर्भात आपण
केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं ते म्हणाले.
****
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कारांचं आज औरंगाबाद इथं वितरण होणार आहे. शहरातल्या
जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या म्हैसमाळ, वेरुळ- खुलताबाद
आणि सुलीभंजन या पर्यटन स्थळांच्या ४३८ कोटी ४४ लाख रूपयांच्या विकास आराखड्याला राज्य शासनानं
मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत झालेल्या बैठकीत ही
माहीती दिली.
पाच टप्प्यात होणारी या आराखड्यातली कामं वेगाने
पूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ५० कोटी रुपये तर वन विभागानं २ कोटी रुपये निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचेही
निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
ते काल औरंगाबाद इथं बी.रघुनाथ
स्मृतीसंध्येत या विषयावर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील यांनी
व्यक्त केलं आहे.
यंदाचा बी रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रेखा
बैजल यांना काल औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘प्रलयंकार’ या कादंबरीसाठी
बैजल यांना, ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. यावेळी केलेल्या भाषणात बोकील यांनी, ‘साहित्याची लोकनीती’ या विषयावर बोलताना,
साहित्य क्षेत्रानं राजकारणाचा केलेला स्वीकार अत्यंत धोकादायक असल्याचं मत व्यक्त
केलं. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि संचानं, आज
या देशामध्ये हा देशभरातल्या विविध कवींच्या अनुवादीत कविता अभिवाचनाचा कार्यक्रम सादर
केला.
****
केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या महत्वाकांक्षी
उज्ज्वला गॅस योजनेचे यवतमाळ जिल्ह्यात ४८ हजार ७९९ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातल्या लोहारा
उद्योग नगरी इथं राहणाऱ्या अनिता भेरट यांनी स्वयंपाकासाठी चुलीच्या आणि गॅसच्या वापरातील
फरक या शब्दात मांडला –
मला गॅस मिळाल्यामुळे माझे
जे कठिण दिवसं होते, ते मला फार सोपे झाले. पहिले मी चुलीवर स्वयंपाक करायची. त्या
चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे जेवणाला उशिर व्हायचा. लेकरांना शाळेत जायला उशिर व्हायचा.
आणि मला असं कळंल की, जे प्रधानमंत्री गॅस योजनाचा लाभ भेटत आहे. पण मी तो फार्म भरला.
तो फार्म भरल्यामुळे मला लगेचच २ ते ३ दिवसात गॅस मिळाला. या गॅस मुळे माझा स्वयंपाक
लवकर होत आहे म्हणजे मुलांच शाळेत जाणं लवकर होत आहे. त्याच्यामुळे मी नरेंद्र मोदी
यांचे खूप आभारी आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख
सी. एम. अभंग आणि कंत्राटी इमारत निरीक्षक सचिन दुबे यांना ५० हजार रुपयांची लाच घेतांना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल रंगेहाथ पकडलं. विनापरवानगी बांधकाम करणाऱ्या
एका नागरिकाचं बांधकाम साहित्य जप्त करुन या
अधिकाऱ्यांनी बांधकाम थाबवलं होतं. हे काम पुन्हा सुरु करण्यासाठी तसंच जप्त साहित्य
परत देण्यासाठी अभंग आणि दुबे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
****
जालना इथल्या राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक तीनमध्ये
नोकरी मिळवून देण्याचं अमिष दाखवून आठ बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या
दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध काल तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला. फिरोज नासिर पठाण आणि फेरोज इकबाल खान अशी फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं
असून, दोघेही जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही
फरार झाल्याचं पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितलं.
****
सोयाबीनवर खोड अळी आणि कापसावर लाल्या रोग, बोंडअळी
यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या
नुकसानाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार
डी.पी.सावंत यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सादर केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं त्यांनी
निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे, की नाही याबाबत खात्री
करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. मतदार यादीतल्या नावांमध्ये
दुरूस्ती, नाव समाविष्ट करणं, वगळणं आदी प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू असून प्रारूप
मतदार यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती तपासून मतदार यादीत नाव असल्याची
खात्री करून घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. याबाबत दावे, हरकती असल्यास त्या
येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.
******
***
No comments:
Post a Comment