Monday, 10 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 इंधनवाढीच्या विरोधात देशभरात पुकारलेल्या आजच्या बंदच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत राजघाटापासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढला. केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसून, उद्योजक आनंदात तर जनता आणि शेतकरी त्रस्त असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

 काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आज अंधेरी रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन केलं. दादर सेना भवन परिसर मनसेनं बंद केला. मुंबईच्या अनेक भागांमध्ये बंदला प्रतिसाद मिळत असून, अनेक भागातल्या टॅक्सी, रिक्षा आणि बेस्ट बस सेवा बंद आहेत. अनेक महाविद्यालयांच्या आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे.

 औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून, शहरातल्या सिडको, क्रांती चौकासह, विविध पेट्रोल पंपांवर विरोधी पक्षांतर्फे निदर्शनं करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सिडको चौकात ठिय्या आंदोलन केलं.

जालना शहरात काँग्रेसच्या वतीने  फेरी काढून व्यापाऱ्यांना बंदचं आवाहन करण्यात आलं. बंदला जिल्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 नाशिक शहरात या बंदला मध्यवर्ती बाजार पेठांमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. सुरक्षिततेचा भाग म्हणून शहर बस सेवा बंद ठेवण्यात आल्याचं आणि कळवण, देवळा, चांदवड इथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 पुण्यामध्ये मनसेच्या कथित कार्यकर्त्यांनी शहर बसवर दगडफेक केल्याचं वृत्त आहे. मनमाड, कोल्हापूर, पंढरपूर आणि विरार इथेही निदर्शनं करण्यात आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

 सोलापूर शहरातल्या प्रमुख बाजार पेठा व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवला.  काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी मोर्चे काढले. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून दिल्यानं काही काळ तणाव निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 सातारा, धुळे, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

 दरम्यान, विरोधी पक्षांनी पुकारलेला हा बंद म्हणजे अफवा पसरवण्याचा आणि जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. काँग्रेसचं सरकार असताना भाववाढीचे विक्रम नोंदले गेले, मात्र आता काँग्रेस या मुद्द्यावर नक्राश्रू ढाळत आहे, अशी टीका भाजप नेते केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज केली.

****

 राज्यातल्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू कराव्यात, विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करू नये आणि अनुसूचित जाती आणि जमातींच्या तसंच इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींमध्ये दुप्पट वाढ करावी, यासह अनेक अन्य मागण्या करणारं एक निवेदन आज सम्यक विद्यार्थी आंदोलन या संस्थेतर्फे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या संस्थेच्या वतीनं आज क्रांती चौकात यासाठी निदर्शनं करण्यात आली.

****

 लातूरचं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि पाली भाषा शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या तर्फे संयुक्तपणे लातूर आणि परिसरातल्या नागरिकांसाठी पाली भाषा शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. एक महिना कालावधीचा हा अभ्यासक्रम येत्या चौदा तारखेपासून सुरू होणार असून, याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन महाविद्यालयानं केलं आहे.

****

 क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी साताऱ्याच्या जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारत केलेल्या पलायनाला आज चौऱ्याहत्तर वर्षं पूर्ण झाल्यानं या घटनेचा अमृतमहोत्सव आज सातारा जिल्हा कारागृहात साजरा करण्यात आला. यावेळी कारागृहाबाहेर असणाऱ्या क्रांती स्तंभाला अभिवादन करत क्रांतीवीर नागनाथअण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. या घटनेच्या अनुषंगानं माहितीपट तयार करण्याच्या सूचना साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

****

 झेक गणराज्याच्या ओस्ट्रावा इथे झालेल्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशनच्या काँटिनेंटल चषक स्पर्धेत भारताच्या अर्पिंदर सिंहनं तिहेरी उडीमध्ये काल कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

*****

*** 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती...