Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांच्या
भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
Ø बंद अयशस्वी झाल्याचा सरकारचा दावा
Ø विद्यापीठांनी रोजगाराभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम
तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Ø ज्येष्ठ संगीत तज्ञ पंडित शांताराम चिगरी यांचं निधन
आणि
Ø संशोधन आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाला सरकारचं
प्राधान्य; केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
****
काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीच्या
निषेधार्थ तसंच अन्य मागण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला काल देशभरात संमिश्र प्रतिसाद
मिळाला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या
नेत्यांनी दिल्लीत राजघाटापासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढला. केंद्र सरकारनं
दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसून, उद्योजक आनंदात तर जनता आणि शेतकरी त्रस्त असल्याची
टीका राहुल गांधी यांनी केली.
राज्यातही या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत
वार्ताहरांशी बोलतांना राज्यात बंद शांततेत पार पडल्याचा दावा केला. महागाईमुळे जनतेत
संताप असून, सरकार चालवण्यात पंतप्रधान अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. काँग्रेस नेते संजय
निरुपम यांनी यावेळी बोलताना, शिवसेनेच्या सहकार्या शिवायही मुंबईत हा बंद संपूर्ण
यशस्वी झाल्याचा दावा केला. संपात सहभागी न झाल्यानं शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याचं
ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्यांनी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतले कांदा-बटाट्याचे व्यवहार बंद पाडले. दादरमध्ये मनसेच्या
वतीनं अच्छे दिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या
वतीनं मोर्चा काढण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे या मोर्चात सहभागी झाल्या. पिंपरीमध्ये
मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
औरंगाबादसह मराठवाड्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद
मिळाला. औरंगाबाद इथं, मुख्य चौकांसह, विविध पेट्रोल पंपांवर विरोधी पक्षांतर्फे निदर्शनं
करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सिडको चौकात ठिय्या आंदोलन केलं. डाव्या
पक्ष संघटनांतर्फे पैठण गेट इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष तसंच वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, स्वराज
अभियान या संघटना सहभागी झाल्या होत्या.
विभागात बीड, नांदेड, हिंगोली, आणि परभणी जिल्ह्यात
या बंदला चांगला, तर उस्मानाबाद, लातूर, जालना, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
काल भारत बंद दरम्यान, देशाच्या विविध भागात झालेल्या
हिंसक घटनांबद्दल भारतीय जनता पक्षानं, काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना
जाब विचारला आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारला विरोध करण्याचा अधिकार आहे, मात्र यात
हिंसेला जागा नाही, असं भाजप नेते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सर्वसामान्य लोक बंदला समर्थन देत नसताना,
विरोधी पक्षाचे कार्यकर्ते बळजबरीनं, बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्थांसह इतर सेवा बंद
करत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. इंधन दरवाढीला आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत
असल्याचं सांगत, महागाई कमी होण्याच्या दृष्टीनं, सरकार उपाययोजना करत असल्याचं प्रसाद
असं म्हणाले.
विरोधकांनी पुकारलेला
हा बंद अयशस्वी झाल्याचं, राज्याचे गृह राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
देशभरातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन चर्चा केली, तर इंधनाच्या किंमती कमी होऊ
शकतात, असं ते म्हणाले.
****
विद्यापीठांनी रोजगाराभिमुख शिक्षण देणारे अभ्यासक्रम
तयार करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उच्च शिक्षणासंदर्भात
नेमलेल्या राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोग -माहेडची काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा,
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. युवकांना रोजगार मिळावा यासाठी राज्यात कुठल्या भागात
किती गुंतवणूक झाली, याची माहिती उद्योग विभागाकडून घेऊन त्यानुसार गरजेप्रमाणे रोजगाराला
चालना देणारे अभ्यासक्रम तयार केले जातील, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
यावेळी दिली.
****
ज्येष्ठ संगीत तज्ञ पंडित शांताराम चिगरी यांचं काल
लातूर इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी मुंबईत पंडीत ओंकारनाथ ठाकूर, पंडीत
नारायणराव व्यास आणि पंडीत विनायकबुवा पटवर्धन
यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचं शिक्षण घेतलं होतं. १९७१मध्ये ते लातूरला
आले आणि त्यांनी तिथं सूर ताल संगीत विद्यालयाची स्थापना केली. गायनासोबतच, तबला, मृदंग,
व्हायोलिन, सतार, बासरी, आदी वाद्यं वाजवण्यात ते पारंगत होते. त्यांच्या पार्थिव देहावर
काल अंकोली इथल्या त्यांच्या शेतात अंत्यसंसकार करण्यात आले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीतकार सुधीर
फडके, आणि पु. ल. देशपांडे या तिन्ही मान्यवरांसोबतचे दुर्मिळ व्हिडिओ, छायाचित्रं,
मुलाखती, शासनानं गठित केलेल्या समितीला उपलब्ध करून देण्याचं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. चालू वर्ष हे या तिन्ही मान्यवरांचं जन्मशताब्दी वर्ष आहे.
यासंदर्भात स्थापन समितीची काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली,
त्यावेळी ते बोलत होते. या निमित्तानं वर्षभर विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्याची
सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
संशोधन आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाला सरकारचं
प्राधान्य असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित शिक्षण परिषदेत ते
काल बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे
यावेळी उपस्थित होते. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी
केंद्र सरकारनं एक लाख दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं,
ते म्हणाले..
यावर्षी हायर एजूकेशक्न, फायनान्स एक नवी वैवस्था
तयार केली. या वर्षीचं बजट हे त्यामुळे २५+२५ए
एक लाख दहा हजार कोटी झालं. ७०टक्के वाढ झालेली आहे. हा आमचा शिक्षणाविषयीचा
दृष्टिकोन आहे. ओपन डिसस्टन लररिंग आणि ऑनलाईन
लररिंग या दोन्हीचा मार्ग आम्ही खूला केला आहे. तोही त्या क्वॉलिटीशी जोडला आहे. ज्या
संस्था चांगलं काम करतात, त्या संस्थाना मदत करण हेच खर सरकारचं काम आहे. ते आम्ही करत आहोत यु.जी.सी. मार्फेत,
अ.आय.सी.टी. मार्फेत. एकूण शिक्षण हे गुणवत्तापूर्ण व्हावं, सारथक व्हावं. शोध आणि
अणुसंधान याला भर असावा. तर आपला देश पुढे जाईल. कारण शिक्षणातच बिज आहे. देशाला पुढे
नेण्याची.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या
खामगाव इथं गोरक्ष कॉलेज ऑफ फॉर्मसी ॲण्ड रिसर्च सेंटरचं उद्घाटनही जावडेकर यांच्या
हस्ते काल झालं. मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांसह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
‘डिजिटल
भारत’ या योजने अंतर्गत सरकार नागरिकांना तंत्रज्ञान वापरासाठी प्रोत्साहित करत आहे. औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरातील दूधविक्रेते
रतन कटारिया यांनी या बद्दल आपला अनुभव आकाशवाणीला
सांगितला...
मी रतन सूभाषजी कटारिया. माझा औरंगाबाद शहरामध्ये दूधडेरिचा वैवसाय आहे. शेतकऱ्यांकडून आम्ही दूध
खरेदी करतो. आणि ते रिटेल काऊंन्टर मधून विकतो. कस्टमर कडून जी आमची मनथी खरेदी होत त्याला आम्ही मंथली
अकाऊंट पेमेंन्ट म्हणतो आम्ही त्याला. ते पेमेंन्ट आम्ही सातवीमशिन द्वारे स्विकारतो.
पेटियम द्वारे पण आम्ही पेमेंन्ट स्विकारतो. बरेचस पेमेंन्ट ऑनलाईन जाऊ लागल ते पूर्वी
जात नव्हतं. पण आता मी पुर्वीप्रमाणेच पैसे घेतो सोबत ऑनलाईन पण घेत आहे. त्या मुळे
पेमेंन्ट ट्रक होऊ लागले सगळे. कुठलं पेमेंन्ट कुठे जात आहे. एखाद्या पेमेंन्टची नोंद
झाली नाही झाली. तरी ते आपण ट्राक करू शकतो. असा फायदा मला डिजिटलाईझनचा झाला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment