आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
११ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आशा, अंगणवाडी
कर्मचारी आणि आरोग्य सेवेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. देशातल्या प्रत्येक घरात
पोषण आहाराचं महत्त्व पटवून देणारा संदेश पोहोचवण्यासाठी चालू महिन्यात हा उपक्रम
राबवला जात आहे. राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामुळे गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू
झालेल्या राष्ट्रीय पोषण आहार अभियानाला अधिक बळकटी मिळणार आहे. पोषण आहार अभियानाअंतर्गत
बालकांचं अल्प पोषण, कुपोषण तसंच महिला आणि किशोरवयीन मुलींमधलं रक्तक्षयाचं
प्रमाण कमी करण्याचं उद्दीष्ट सरकारनं निश्चित केलं आहे.
****
तुळजापूर-औसा-लातूर या महामार्गाच्या भूसंपादनासाठी
जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलात असलेली प्रकरणं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं निकाली
काढावीत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तुळजापूर-औसा-लातूर
महामार्ग, आणि रेणापूर-पानगाव-परळी रस्त्याच्या भूसंपादन संदर्भात काल पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. औसा आणि रेणापूर
इथल्या जमिनींची संयुक्त मोजणी करून एक महिन्यात अहवाल द्यावा, असेही निर्देश त्यांनी
यावेळी दिले.
****
औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयातला कनिष्ठ लिपिक
गंगाधर डहाळे याला काल पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात
पकडलं. नवीन घर घेण्याची परवानगी देण्यासाठी डहाळे यानं लाचेची मागणी केली होती.
****
नांदेड इथं शेतकरी-शेतमजुर पंचायतीच्या वतीनं काल
जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी मिळावी,
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, मुग उडीद पिकांना हमीभाव आदी मागण्यांसाठी
हे आंदोलन करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड
इंडस्ट्रीज या साखर कारखान्यानं, ऊस उत्पादकांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची
वाढीव दराची थकबाकी अदा केली आहे. कारखान्याकडून एक पत्रक जारी करून ही माहिती देण्यात
आली.
*****
***
No comments:
Post a Comment