Wednesday, 12 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 राफेल लाढाऊ विमान आणि रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढेल, असं हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय हवाई दलाची शक्ती रचना २०३५ या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते. भारत आपल्या प्रतिस्पर्धकांच्या संरक्षण शक्तीच्या समकक्ष पातळीपर्यंत पोहोचत असल्याचं ते म्हणाले. भारत ज्या गंभीर धोक्यांचा सामना करतो, त्याप्रमाणे जगातला कुठलाही देश करत नाही, असं त्यांनी नमूद केलं. शत्रूंच्या विरोधात भारतीय हवाई दलाची ताकद वाढवणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगून धनोआ यांनी, यापूर्वीही अशा प्रकारची खरेदी झाली असल्याचं नमूद केलं.

****



 आसाममधल्या कोकराझार परिसराला आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. भूकंप मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली असून, यात कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीचं वृत्त नाही. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तपास मोहीमेदरम्यान अज्ञात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करत गोळीबार केला. महामार्गावर वाहनांचा तपास करत असताना एका ट्रक मध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रक चालक आणि वाहकाला ताब्यात घेतलं असून, दहशतवाद्यांना पळून जाण्यात यश आलं.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वच्छतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ही एक ऐतिहासिक लोक चळवळ असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती समारंभाचा शुभारंभ होणार असल्याचं ते म्हणाले.

****



 आधार नोंदणी सॉफ्टवेअर हॅक केलं जात असल्याचा आरोप भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं फेटाळून लावला आहे. यासंबंधी आलेल्या बातम्या या निराधार आणि चुकीच्या असून, नागरिकांमध्ये संशय निर्माण करण्यासाठी देण्यात येत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. आधार कार्डचा दुरुपयोग करुन अनेक आधार कार्ड बनवता येत असल्याचा दावाही पूर्णपणे चुकीचा असून, आधार कार्डधारक जोपर्यंत आपला बायोमॅट्रीक पुरावा देत नाही, तोपर्यंत त्यात फेरफार करण शक्य नसल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे.

****



 फरार उद्योजक विजय मल्ल्या आज भारतात प्रत्यार्पणाच्या प्रकरणात लंडनमधल्या न्यायालयात हजर होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मल्ल्याला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. लंडनच्या न्यायालयानं जुलैमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातल्या बॅरक संख्या १२चा व्हिडिओ सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार आज हा व्हिडिओ न्यायालयात सादर केला जाणार आहे.

****



 केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्राणघातक ऑनलाईन खेळ मोमो चॅलेंज संबंधी काही दिशानिर्देश जारी केले आहेत. पालकांनी सामाजिक माध्यमांवर आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे. मोमो चॅलेंज या खेळामुळे मुलांचं नुकसान होत असल्याचं सांगून मंत्रालयानं, हा खेळ खेळताना मुलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांबद्दलही माहिती दिली आहे.

****



 सकल मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणासह अन्य सुविधा देण्याबाबत करण्यात आलेल्या अनेक मागण्यांची पूर्तता गेल्या वर्षभरापासून शासन प्राधान्यानं करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली इथं मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

****



 कोल्हापूर जिल्ह्याच्या कात्यायनी इथल्या प्राचीन देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो वजनाची चांदीचे दागिने लंपास केले. आज पहाटे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. करवीर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली असून, तपास सुरू केला आहे

****



 नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यात आज सकाळी पाऊस झाला. या पावसामुळे या भागातल्या  खरिप पिकांना जीवदान मिळालं आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कंधार तालुक्यात पहाटे चार वाजल्यापासून पाऊस झाला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...