Friday, 7 September 2018


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 7  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

गोरक्षक तसंच जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात सर्व राज्यसरकारांनी न्यायालयानं दिलेल्या दिशा निर्देशांचं पालन करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात न्यायालयानं १७ जुलै रोजी दिलेल्या निकालावर फक्त ११ राज्यांनीच अहवाल सादर केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. ज्या राज्यांनी अहवाल सादर केला नाही, त्यांच्या मुख्य सचिवांना न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल, असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. हा अहवाल उर्वरित राज्यांनी एका आठवड्याच्या आत सादर करावा, असा आदेश न्यायालयानं दिला आहे. 

अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत, यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारचं मत मागवलं आहे.

****

अनुसूचित जाती आणि जमातीतल्या नागरिकांसाठी दलित हा शब्द वापरण्यावर माध्यमांवर बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. दलित हा शब्द दलित पँथर सारख्या अनेक संस्थाशी जोडला गेला आहे, आणि या संस्थेचे माजी सदस्य या नात्यानं, दलित हा शब्द वापरणं, आपण, अपमानकारक मानत नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

****

देशाची अर्थव्यवस्था प्रगती पथावर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज मूव्ह या पहिल्या जागतिक मोबिलिटी परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  हवामान बदलाच्या विरोधात सुरु असलेल्या आपल्या लढ्यात मोबिलिटी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी, नवीन ऊर्जा, नवीन गरजा आणि नवीन उद्देश घेऊन भारत पुढे जात असल्याचं नमूद केलं. नीति आयोगाच्या वतीनं आयोजित या दोन दिवसीपरिषदेत प्रामुख्यानं शहरी भाग प्रदुषण मुक्त करण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार आहे. वीजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात जागरूकता वाढवण्यावरही या परिषदेत चर्चा होईल.

****

बँकाचं कर्ज बुडवून परदेशी पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महीर रश्मी भंसालीच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या विनंतीवरून हे नोटीसवजा आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

****

उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंड क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या परिसरात हवामान विभागानं आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

****

आदिवासींबाबतच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन उपाययोजना करीत असून, त्यास अजून गती देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार इथं श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीनं सुरू असलेल्या संजीवन बाल उपचार केंद्रास काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. आदिवासींचं स्थलांतर होऊ नये यासाठी रोजगार वाढवण्यावर शासनाचा भर आहे, रोजगाराचे पैसे वेळेवर देणं, जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं याला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले. कुपोषण हा आकडेवारीच्या पलिकडचा प्रश्न असून, एकही बालक कुपोषणानं दगावू नये यासाठी शासन उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. जव्हारचं गतवैभव परत मिळवून देऊ असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी, एक उत्तम पर्यटन शहर म्हणून सर्व सोयी सुविधा विकसित केल्या जातील आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन दिलं.

****



केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं सिंधुदुर्ग-मालवण इथं पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या  - भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था - आय आय टी टी एम ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे कळवलं आहे. कोकणात या संस्थेची शाखा सुरु झाल्यानं स्थानिक तरुणांना पर्यटन व्यवस्थापनाचं तंत्रशुध्द शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या संस्थेच्या स्थापनेमुळे या भागातल्या पर्यटन विकासाला गती येईल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आजपासून लंडनमधल्या ओव्हल मैदानावर सुरु होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजेपासून सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

//***********//


No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 17 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 17 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...