Friday, 7 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 07.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 7 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ७ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

सरकार सर्वांना आणि स्वस्त दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यावर काम करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज एका संमेलनात ते बोलत होते. केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं. हाडांशी संबंधित आजारांवर उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानं त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सचं कौतुक केलं आहे. रुग्णालयांमध्ये ३० खाटा या फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवाव्या, असे निर्देश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आल्याचं आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु केलेल्या खेलो इंडिया कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये दिसून आला असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. येणाऱ्या काळात खेलो इंडिया कार्यक्रमाचे आणखी चांगले परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातले ९० टक्के ॲथलीट हे ग्रामीण भागातले असल्याचं सांगून, राठोड यांनी, ग्रामीण क्षेत्रातल्या प्रतिभावान खेळाडूंचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महिलांनी जास्तीत जास्त खेळाची आवड निर्माण करुन पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.   

दरम्यान, राठोड यांनी दक्षिण कोरियामधल्या चांगवोन इथं सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल कनिष्ठ प्रकारात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारताच्या हृदय हजारिका याचं अभिनंदन केलं आहे.

****

राज्यातल्या ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली असून, खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा आणि राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवून राज्याचा आणि देशाचा लौकिक वाढवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आज महिलांच्या राष्ट्रीय कनिष्ठ मुष्टीयुद्ध स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिक वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुष्टीयुद्ध या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर इथल्या विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येऊन बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

राजकीय संन्यास घेणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर आज पाटील यांनी याबद्दल खुलासा केला. निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं, त्यामुळे निवडणूक न लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले. निवडणूक लढवण्यासंदर्भात आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. पाटील यांनी आज मुंबई गोवा-महामार्गाची पाहणी केली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

****

जालना इथल्या राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक तीनमध्ये नोकरी मिळवून देण्याचं अमिष दाखवून आठ बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध आज तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोज नासिर पठाण आणि फेरोज इकबाल खान अशी फसवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं असून, दोघेही जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाल्याचं पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितलं.

****

सोयाबीनवर खोड अळी आणि कापसावर लाल्या रोग, बोंडअळी यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून, या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार डी.पी.सावंत यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातला कुख्यात गुन्हेगार पर्वतराव उर्फ दीपक तुकाराम शिंगाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. शिंगाडे हा जालना जिल्ह्यातल्या शेवली शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान लंडन इथं सुरु असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवशी, उपहारापर्यंत इंग्लंडच्या एक बाद ६८ धावा झाल्या होत्या. भारताकडून रविंद्र जडेजानं हा बळी घेतला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघानं याआधीच तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 17 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...