Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 3 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भारताच्या आर्थिक विकासात सायप्रसचं योगदान अधोरेखित करत राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी देशात डिजीटायजेशन, स्मार्ट सिटीज, पायाभूत सुविधा आणि पर्यटन यासारख्या
क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन सायप्रसच्या उद्योगांना केलं आहे.
कोविंद यांनी आज सायप्रसच्या लोकप्रतिनिधी सभागृहाला संबोधित केलं, त्यावेळी
ते बोलत होते. सायप्रस हा भारतात गुंतवणूक करणारा आठव्या क्रमांकाचा देश असून या दोन
देशा दरम्यानचा व्यापार हा सव्वा आठ अब्ज डॉलर्स इतका असल्याचं ते म्हणाले. भारतात
गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
तत्पूर्वी, या दोन देशांनी आपसातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी अनेक क्षेत्रातल्या
महत्त्वाच्या करारांवर आज स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रपती कोविंद यांनी संयुक्त राष्ट्र
संघाच्या सुरक्षा परिषदेच्या तसंच अणु पुरवठादार देशांच्या गटाच्या स्थायी सदस्यत्वासाठी
भारताला पाठिंबा दिल्याबद्दल सायप्रसचे आभार मानले आहे.
****
यावर्षीच्या पावसाळ्यात देशभरातल्या एक हजार चारशे लोकांचा, पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे
मृत्यू झाल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. यापैकी चारशे अट्ठ्याऐंशी लोक केरळच्या
पुरात मृत्यू पावले आहेत. महापुराच्या संकटानंतर केरळ राज्यावर आता अनेक साथरोगांचा
धोका उत्पन्न झाला असून लेप्टोस्पायरोसिस या आजारानं गेल्या तीन दिवसात त्या राज्यात
बारा जण मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे. कालच्या दिवसभरात या रोगाची तेहतीस प्रकरणं
दाखल झाल्यानं आरोग्य विभागानं तेरा जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा जारी केला असून, प्रतिबंधात्मक
उपाय सुरू केले आहेत.
****
युनायटेड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ॲपच्या माध्यमातून या वर्षीच्या ऑगस्ट
महिन्यात तीस कोटींचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण
चौदा टक्क्यांनी जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीआयच्या या उत्कृष्ट कामाची
प्रशंसा केली आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देऊन देशात रोकडरहित अर्थव्यवस्था
मजबूत करण्याचं यूपीआयचं उद्दिष्ट असून, विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरच्या दोन वर्षात
यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
****
भगवान श्रीकृष्णाचा ज्न्मोत्सव, जन्माष्टमी आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात
येत आहे. श्रीकृष्णाची ज्न्मभूमी असलेल्या मथुरा इथं या सणाचा मुख्य समारंभ मोठ्या
श्रद्धेनं आणि उल्हासात साजरा होत आहे. मुंबई तसंच ठाण्यासह राज्यातही ठिकठिकाणी पारंपरिक
पद्धतीनं दहीहंडी फोडून जन्माष्टमी साजरी होत आहे. मुंबईमध्ये ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठानच्या
जय जवान पथकाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मुंबईत या उत्सवादरम्यान सहा गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त असून, या सर्वांना
विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतल्या अनेक प्रमुख मंडळांनी मात्र केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचा
निर्णय घेतल्यामुळे मोठ्या आणि मानाच्या मानल्या
जाणाऱ्या बहुतांश दहीहंड्या रद्द करण्यात आल्या. मात्र नवी मुंबईतील गावठाणांमध्ये
आणि घणसोली गावात पारंपरिक पध्दतीनं दहीहंडीचा उत्सव आज साजरा करण्यात आल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीची सुरूवात झाली
आहे. शहरातल्या इस्कॉन कृष्ण मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
सातारा जिल्ह्यात आज सुमारे तीनशे ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या वतीनं दहीहंडीचं
आयोजन करण्यात आलं.
****
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काही कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या
अटकेसंदर्भात माध्यमांना माहिती देण्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली
आहे. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना,
त्यात पुरावा ठरू शकणारी कागदपत्रं अशी वाचून दाखवणं चूक आहे, असं न्यायालयानं म्हटलं.
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांना
न करू देता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेच्या
सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त करतानाच, या याचिकेला स्थगितीही दिली.
****
गोव्याचे मुख्यमंत्री आणि अन्य दोन मंत्री सातत्यानं गैरहजर राहत असल्यानं गोव्यात
राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे गोव्यातले
प्रवक्ता रमाकांत खलप यांनी आज ही मागणी केली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर,
ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर आणि नागरी विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे तिघेही जण
आजारपणामुळे वारंवार रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे गोव्यात घटनात्मक पेच निर्माण
झाला आहे, असं नमूद करत, यासंदर्भात आपण राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन यामध्ये
हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याची माहिती खलप यांनी आज पत्रकारांना दिली.
//*************//
No comments:
Post a Comment