Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 3 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
भारत ही जगातली सर्वात जास्त गतीनं
वाढणारी महत्त्वाची अर्थव्यवस्था असून, नवीन भारताच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हा,
असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सायप्रसच्या भारतीय समुदायाला केलं आहे.
आपल्या तीन देशांच्या दौ-याच्या पहिल्या टप्प्यात काल सायप्रसची राजधानी निकोशिया इथे
भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते बोलत होते.राष्ट्रपती आज सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांची
भेट घेणार असून सायप्रसच्या संसदेला संबोधित करणार आहेत.
****
वायुसेना प्रमुख एअर मार्शल बीरेंद्र सिंह धानोआ
आपल्या म्यानमा आणि मलेशिया या दोन देशांच्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात काल म्यानमाच्या
नेपिथॉ इथे पोहचले. या भेटीत ते या देशांच्या वायुसेनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
करणार असून, माहितीचं आदान-प्रदान आणि आपसातला संपर्क वाढवणे, या बाबत या वेळी चर्चा
होण्याची अपेक्षा आहे.
****
शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीत
भारतानं वेगानं प्रगती केली असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच जारी झालेल्या
अहवालात म्हटलं आहे. स्वच्छतेच्या सुविधा नसलेल्या शाळांच्या संख्येत झपाट्यानं घट
झालेली दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतातल्या जवळपास सर्व शाळांमध्ये स्वच्छतेची
सुविधा उपलब्ध झाल्याचं दोन वर्षांपूर्वीच दिसून आलं असून, त्याआधी, दहा वर्षांपूर्वी
सुमारे पन्नास टक्के शाळा कोणत्याही स्वच्छता सुविधे शिवाय चालत असत, असं या अहवालात
म्हटलं आहे.
****
2017 या वर्षात भारताला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या
संख्येत विक्रमी वाढ झाल्याचं, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन समितीनं नुकत्याच जारी
केलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. परदेशी पर्यटक दक्षिण आशियामध्ये भारताला सर्वाधिक संख्येनं भेट देतात, असं या अहवालात
म्हटलं आहे. सोपी व्हिसा प्रक्रिया आणि देशातलं समाधानकारक वातावरण, यामुळे गेल्या
वर्षभरात सुमारे दीड कोटी परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिल्याचं या अहवालात म्हटलं
आहे.
****
भाजप प्रणित सरकारच्या पापांची हंडी जनता २०१९ मध्ये
फोडेल, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सातारा
जिल्ह्यातल्या कराड इथे दही हंडीच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. काँग्रेसनं सुरू
केलेल्या जन संघर्ष यात्रेचा एक भाग म्हणून, यावेळी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात
आली.
****
त्सुनामीसारख्या आपत्तीला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं
जनतेची आणि संबंधित यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये
उद्या मॉकड्रिल्स होणार आहेत. पालघर जिल्ह्यातल्या एडवन, रायगड जिल्ह्यातल्या बोरली,
रत्नागिरीतल्या पाजपांढरी, सिंधुदुर्ग मधल्या जामदुल आणि ठाणे जिल्ह्यातल्या पाली इथे
या मॉकड्रिल्स होणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि राष्ट्रीय सागरी
सेवा माहिती केंद्राच्या वतीनं संयुक्तपणे ही मोहीम राबवली जाणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या ंवदगाव
शिवारात गिरणा नदीच्या पात्रालगत अवैधरीत्या वाळू उपसा करत असताना झालेल्या अपघातात
एक जण ठार तर अन्य तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग़्नालयात
दाखल करण्यात आलं आहे. अवैध वाळू व्यवसायानं एक बळी घेतल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची
भावना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथे आज शेवटच्या
श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, ब्राह्मगिरीला महाप्रदक्षिणा
घालण्यासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली आहे. दुपारी परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वराच्या
मुखवट्याची मिरवणूक काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि
नाशिक जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांसाठी येत्या
४ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सैन्य
भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पनवेल
इथे हा मेळावा होणार असून, त्यासाठीची नावनोंदणी येत्या सतरा तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी
करता येणार आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव-केळापूर वन क्षेत्रात
गेल्या काही महिन्यांमध्ये तेरा जणांचा कथितरीत्या बळी घेणाऱ्या वाघांना जेरबंद करण्यासाठी
चार हत्तींची मदत घेतली जाणार आहे. मध्य प्रदेशातून हे हत्ती चार आठवड्यात यवतमाळला
पोहचतील, असं वन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment