आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३ सप्टेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरच्या
पुलवामा जिल्ह्यातल्या बाराहून अधिक गावांमध्ये सुरक्षा दलांनी आज सकाळपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. सैन्यदल, जम्मू
काश्मीर पोलिसांचं विशेष कारवाई दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी या गावांचे
बाहेर जाण्याचे सगळे रस्ते बंद करून घराघरात शोध सुरू केला आहे. या भागात अतिरेकी लपून
असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली
आहे.
****
भारत आणि
बांगला देश या देशांच्या सीमा सुरक्षा दलांची अर्धवार्षिक बैठक आज नवी दिल्ली इथे सुरू
होत आहे. या दोन देशांदरम्यानची मादक पदार्थांची आणि पशूंची तस्करी आणि शस्त्रास्त्रांचा
अवैध व्यापार रोखणं, हे या बैठकीचं उद्दिष्ट असून, या चर्चेनंतर येत्या सात तारखेला
यासंबंधातला करार होईल, अशी अपेक्षा आहे.
****
देशभरात आज
भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव, जन्माष्टमी भक्तीभावानं साजरा होत आहे. राज्यात आज जन्माष्टमीनिमित्त पारंपारीक उत्सव
साजरा होत असून यानिमित्त मुंबईसह इतर ठिकाणी गोविंदा
पथकं मानवी मनोऱ्यांची रचना करत उत्साहात
दहीहंडीचा सोहळा साजरा करत आहेत. नेपाळमध्येही जन्माष्टमीचा सण काल उत्साहात
साजरा केला गेला. काठमांडू इथल्या एस्कॉन मंदिरात या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी
केली होती.
दरम्यान,
औरंगाबाद शहरात दहीहंडीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून, टी.व्ही. सेंटर
, कॅनॉट प्लेस, पुंडलिक नगर - गजानन महाराज मंदिर - त्रिमुर्ती चौक, रेल्वेस्थानक रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर चौक,
गुलमंडी या ठिकाणांवरील वाहतुकीचा यात समावेश आहे.
****
देशभरात ऑनलाईन
पद्धतीनं औषध विक्री करण्याबाबतचे नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केले असून,
ई-फार्मसी पोर्टलवरून औषधांची विक्री करण्याची परवानगी, अधिकृत नोंदणी केलेल्या परवानाधारकांनाच
असेल, असं स्पष्ट केलं आहे. या नियमांमुळे रुग्णांना ऑनलाईन पद्धतीनं प्रमाणित औषधं
विकत घेता येतील, असं सरकारनं म्हटलं आहे. झोपेची आणि मानसिक रोगांच्या उपचारासाठीची
औषधं तसंच मादक द्रव्यांचा अंश असलेली औषधं ऑनलाईन पद्धतीनं विकण्यास मात्र बंदी असल्याचं
यामध्ये म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment