Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 4 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं पुनरूज्जीवन करण्याच्या
प्रस्तावाला आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सभेनं हा प्रस्ताव
मंजूर करताना औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी समोर विविध स्वरूपाच्या १५ अटी घातल्या
आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडे २८९ कोटी रूपये अतिरिक्त निधीची मागणी
करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य शासनानं कडे पाठवणार
असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
दरम्यान,
कॉंग्रेस पक्षानं या प्रस्तावाला विरोध करत सभात्याग केला. स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीला
काम देण्यात येत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी विषय पत्रिकाही फाडल्या.
या प्रस्तावावर महापालिकेत चर्चा सुरु असतांना महापालिका मुख्यालयासमोर मात्र समांतर
विरोधी नागरी कृती समिती आणि संघर्ष समितीतर्फे आंदोलन आणि महापालिका विरोधात जोरदार
घोषणाबाजी करण्यात आली.
****
केरळ
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा मंडळातर्फे २० लाख रुपयांचा धनादेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला. नृसिंहवाडी इथल्या
श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फेही पुरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची
मदत देण्यात आली.
****
सर्वसामान्यांचे
प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचं सरकार राज्यात सत्तेवर आणलं पाहिजे, असं काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा
इथं आज जनसंघर्ष सभेत ते बोलत होते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार राजकीय
फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकारच्या विविध धोरणांवर त्यांनी यावेळी टीका केली.
****
मालेगाव
बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्या अर्जाची सुनावणी
करण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. आपलं अपहरण आणि छळ झाल्याचा आरोप पुरोहितनं
केला असून, याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी या अर्जात केली आहे. या
टप्प्यावर या अर्जाची सुनावणी केली, तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यावर त्याचा परिणाम
होईल, त्यामुळे अर्जदारानं याबाबतीत कनिष्ठ न्यायालयात जावं, असं न्यायालयानं म्हटलं
आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष
नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांना पाठवला आहे. नरेंद्र पाटील यांची नुकतीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास
महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या परंडा मतदारसंघाचे माजी आमदार जेष्ठ विधिज्ञ वासुदेवराव देशमुख यांचं
आज वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. देशमुख हे १९७२ ते १९८१ या कालावधीत
सलग दोन वेळा भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि जनता पक्षाकडून भूम - परंडा विधानसभा मतदारसंघातून
विधानसभेवर निवडून आले होते. विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी
काम पाहिलं होतं. परंडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव या सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पासह
तालुक्यात अनेक सिंचन प्रकल्प, दळणवळण तसंच शिक्षणाच्या सोयीसुविधा उभारण्यात त्यांचा
मोठा सहभाग राहिला. देशमुख यांच्या पार्थिव देहावर दुपारी परंडा इथं अंत्यसंस्कार करण्यात
आले.
****
रायगड
जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या धालघर इथं पोलिसांनी जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनिटर्सचा
मोठा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक
अनिल पारसकर यांनी आज वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. बेकायदेशिररित्या मासेमारी करण्यासाठी
ही स्फोटकं वापरली जात असावीत, असं त्यांनी सांगितलं. अलिकडेच अरबी समुद्रात काही मच्छिमार
जखमी झाले होते, त्याप्रकरणाचा तपास करत असताना माहिती हाती लागल्यानं छापा टाकून या
दोघांना अटक केल्याचं पारसकर यांनी सांगितलं.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या देवळा इथं बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा
मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. मृतांपैकी दोघांची ओळख
पटली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं ‘माझा गणपती माझा निसर्ग’ या उपक्रमाअंतर्गत शालेय
विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. बाळापूर परिसरातल्या
७० ते ८० विद्यार्थ्यांनी गणपती बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव
साजरा करण्याची शपथ घेतली.
****
No comments:
Post a Comment