Tuesday, 4 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 4 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 अनुसूचित जाती आणि जमातीतल्या नागरिकांसाठी माध्यमांनी दलित हा शब्द वापरु नये, अशी सूचना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या यावर्षी जून महिन्याच्या आदेशावरुन मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत. इंग्रजी भाषेतल्या शेड्यूल्ड कास्ट या शब्दाचं इतर कोणत्या राष्ट्रीय भाषेत केलेलं भाषांतर हे सरकारी कामकाज, प्रमाणपत्र आणि अन्य प्रकरणातच केलं जाऊ शकतं, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं यावर्षी मार्च महिन्यात काढलेल्या अधिसूचनेत केंद्र आणि राज्य सरकारांनाही दलित या शब्दाऐवजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हा शब्द वापरण्याचा सल्ला दिला होता.

****



 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पुढच्या सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केली आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे. न्यायमूर्ती गोगोई, पुढच्या महिन्यात, येत्या तीन ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांवरचे दोषारोप सिद्ध झाले आहेत. २००७ साली हैदराबाद शहरात गोकुळ चाट आणि लुंबिनी पार्क इथं हे स्फोट झाले होते, या स्फोटात ४२ जण ठार झाले होते, तर ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

****



 जम्मू काश्मीरमध्ये बारामुला जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या निमलष्करी दलाच्या ताफ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात चार जवान जखमी झाले. आज सकाळी हा हल्ला झाला. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या परिसरात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.

****



 कुपोषणविरुद्ध लढा देण्याकरता सप्टेंबर हा महिना देशभरात राष्ट्रीय पोषण माहिना म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्त कुपोषण, रक्तक्षय, जन्मतः अपुऱ्या वजनाची बालकं, या सारख्या समस्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याकरता महिला-बाल विकास मंत्रालयानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. किशोरवयीन मुली, तसंच गर्भवतींच्या पोषणावर या महिन्यात विशेष लक्ष केंद्रीत केलं जाईल. सहा वर्षाखालची मुलं, किशोरवयीन मुली, आणि गर्भवतींच्या पोषणात क्रमबद्ध रितीने सुधारण करणं हा या अभियानाचा हेतू आहे.

****



 शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार २०१७ साठी शिक्षकांची निवड करताना मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासाठीच्या निकषांमध्ये थोडे बदल केले होते. नवीन योजना अधिक पारदर्शी, नि:पक्ष आणि उत्कृष्टतेचा सन्मान करणारी असावी असा त्यामागचा उद्देश आहे.

****



 मुंबईतल्या मलाड परिसरात सोमवार बाजारातल्या चित्रपटगृहाला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवणयाचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत अद्याप तरी कोणत्या जीवितहानीचं वृत्त नाही.

****



 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड येथून पुण्याला जाण्याकरता या महिन्यात चार विशेष गाड्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन नांदेड इथून पुण्याला जाणारी गाडी नांदेड इथून आठ आणि १५ सप्टेंबर रोजी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता सुटेल आणि पुणे इथं रविवारी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पुणे इथून रविवारी नऊ आणि १६ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि सोमवारी सकाळी पाच वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी पूर्णा, परभणी, परळी, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी, दौंड मार्गे धावेल.

****



 बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या टेंभुर्णा इथं स्क्रब टायफसचा आजार पसरल्यानं ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं तत्काळ दखल घेऊन टेंभुर्णा इथं तीन दिवसांमध्ये तीन हजार ३७२ नागरिकांची तपासणी केली. टेंभुर्णा इथं स्क्रब टायफसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ही तपासणी करण्यात आली, मात्र यात या गंभीर आजाराचा इतर कोणीही रुग्ण आढळून आला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 २०२० सालच्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी कोट्यातून निवड होण्याचा मान अंजुम मौदगिल आणि अपुर्वी चंदेला या दोन भारतीय नेमबाजांना मिळाला आहे. दक्षिण कोरियात चांगवन इथं होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात मौदगिलनं काल दुसरं स्थान पटकावत रौप्य पदकाची कमाई केली. पूर्वी चंदेला चौथ्या स्थानावर आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...