Tuesday, 4 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

४ सप्टेंबर  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 राजस्थानातल्या जोधपूरमध्ये हवाई दलाचं मिग-२७ हे विमान कोसळल्याचं वृत्त आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवानं विमानातले दोन्ही वैमानिक सुखरुप असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पूर्व जयपूरमधल्या  देवलिया गावाजवळ हे विमान कोसळलं.

****



 शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार २०१७ साठी शिक्षकांची निवड करताना मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासाठीच्या निकषांमध्ये थोडे बदल केले होते. नवीन योजना अधिक पारदर्शी निष्पक्ष आणि उत्कृष्टतेचा सन्मान करणारी असावी असा त्यामागचा उद्देश आहे.

****



 देशात जलसाक्षरतेची गरज असून, त्यासाठी आंतरसंवादाची आवश्यकता असल्याचं मत जलबिरादरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत जलसाक्षरता कार्यशाळेत बोलते होते. जलसाक्षरतेचं महत्व गावपातळीपर्यंत पोहोचवल्यास पाण्याचं योग्य नियोजन करणं शक्य आहे, असं ते म्हणाले.

****



 औरंगाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गोवर, रुबेला लसीकरण आणि राष्ट्रीय पोषण आहाराच्या अंमलबजावणी संदर्भात काल महिला आणि बालकल्याण विभागानं कार्यशाळा घेतली. राज्यात लसीकरण मोहिमेचा प्रारंभ नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार असून नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींना ही लस देण्यात येणार आहे.

****



 काल अखेरच्या श्रावणी सोमवारी राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली होती. औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथं वैजनाथ, तर हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथाच्या दर्शनासाठीही भाविकांनी काल पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. 

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र.

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...