Wednesday, 5 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 5 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

शिक्षकांना आवश्यक त्या सुविधा देण्याबरोबरच, त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकार तत्पर असल्याची ग्वाही, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. शिक्षक दिनानिमित्त सातारा इथं आज ‘आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार गौरव सोहळ्या’त ते बोलत होते. विद्यार्थ्यांना समाजात माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा आणि बळकटी देणाऱ्या शिक्षकांप्रती आदर असून, त्यांचा गौरव करणं, त्यांना सन्मानित करणं आमचं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. यावेळी राज्यातल्या १०६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

****

समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिकवण्याचं कार्य महापालिकेच्या शाळेतले शिक्षक करत असून, विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेत आहेत, असं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज शिक्षक दिनानिमित्त महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ११० शिक्षकांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह असलेल्या ‘मुठभर गोष्टी’ या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. समाजाचा महानगर पालिकेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विनाअनुदानित प्राध्यापकांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी क्रांती चौक परिसरात ‘भीक मांगो’ आंदोलन केलं. कार्योत्तर मान्यतेची अट रद्द करावी, ज्यावर्षी मूल्यांकन केलं जाईल त्याच वर्षीचं वय आणि विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात यावी, अनुदान पात्र सर्व महाविद्यालयं प्रचलित नियमानुसार अनुदानासह घोषित करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात जमा झालेली रक्कम शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतरांविरुद्धची आरोप निश्चिती करण्यासाठी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं पुढची तारीख दिली आहे. इतर आरोपींपैकी एकानं याप्रकरणी बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा लागू होतो का, हा मुद्दा आधी निकाली काढावा अशी मागणी केली आहे. त्यावर येत्या सोमवारपासून सुनावणी होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. विशेष न्यायाधीश विनोद पाडळकर दररोज सुनावणी घेतील. २९ सप्टेंबर २००८ ला झालेल्या या स्फोटात सहा जण ठार झाले तर सुमारे १०० जण जखमी झाले होते.

****

विविध मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांच्या निधनानं कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शुभांगी जोशी यांचं आज पहाटे निधन झालं, त्या ७२ वर्षांच्या होत्या. ‘आभाळमाया’, ‘काहे दिया परदेस’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ आदी दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

****

देशातल्या शेतकऱ्यांना समाधानानं जगता यावं यासाठी त्यांना तंत्रज्ञान आणि बाजाराचं स्वातंत्र्य द्यावं, असं मत शेतकरी संघटनेचे परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं आज शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विचार यात्रेत ते बोलत होते. शरद जोशी यांचे विचार तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, असं संयोजकांनी सांगितलं. 

****

आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात स्त्रियांबद्दल केलेल्या वक्तव्याचा सातारा इथल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं निषेध केला आहे. आज शिक्षण मंत्री विनोद तावडे सातारा इथं आले असता, या महिलांनी त्यांना घेराव घालत, आमदार कदम यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणाचे पडसाद आज धुळ्यातही उमटले. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आणि शिवसेनेतर्फे वेगवेगळं आंदोलन करून राम कदम यांचा निषेध करण्यात आला.

औरंगाबाद इथंही क्रांती चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे यांच्या नेतृत्वात दुचाकी पायी चालवून हे आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.

****

आय ए ए एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इंडोनेशिया इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या धावपटू हिमा दास हिला आसाम सरकारनं एक कोटी ६० लाख रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. शुक्रवारी होणाऱ्या एका कार्यक्रमात तिला हे पारितोषिक देण्यात येईल.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत हिनानं महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिनं एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं जिंकली आहेत. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...