Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 5 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका
महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण उपराष्ट्रपतींच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. रजतपदक, सन्मानपत्र आणि पन्नास हजार रुपये असं
या पुरस्काराचं स्वरुप असून, ४५ शिक्षकांना यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्यामुळे देशात परिवर्तन होत असून, प्रतिभेला
पुरस्कृत करणं ही आपली परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात, सबको शिक्षा अच्छी शिक्षा या
धोरणावर सरकार काम करत असल्याचं सांगितलं. आता शिफारशींच्या आधारावर नाही, तर कामाच्या
आधारावर पुरस्कार दिले जात असून, शिक्षकांना योग्यरित्या प्रशिक्षित करण्यावर भर दिला
जात असल्याचं ते म्हणाले.
****
भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये होत असलेल्या राफेल
लढाऊ विमान खरेदी कराराला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर पुढच्या आठवड्यात
सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती
ए एम खानविलकर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं, या याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी
घेण्यास मंजुरी दिली. विधीज्ञ एम एल शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेत राफेल कराराच्या
तपशीलात विसंगती असल्यानं, या कराराला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या
जवानांनी आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत
एक घुसखोर ठार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव
प्रकरणी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी आज सर्वोच्च
न्यायालयात उत्तर सादर केलं. या कार्यकर्त्यांचे, बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी
संबंध असल्याचे, सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात सादर
केली. हिंसाचार घडवून आणणं, देशाविरुद्ध आणि सुरक्षा दलाविरुद्ध कट रचणं या आरोपाखाली
या कार्यकर्त्यांना अटक केली असून, त्यांच्या मुक्त विचारांशी कारवाईचा काहीही संबंध
नसल्याचं पोलिस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीअंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना
वार्षिक कर विवरणपत्र भरण्यासाठीचे अर्ज अर्थ मंत्रालयानं अधिसूचित केले आहेत. या
अर्जात, २०१७-१८ या आर्थिक वर्षात केलेली खरेदी विक्री आणि इनपूट टॅक्स क्रेडिटचे
लाभ यांचं विवरण भरायचं आहे. जीएसटीआर
नऊ म्हणजे सर्वसामान्य करदाते आणि जीएसटीआर नऊ अ म्हणजे संयुक्त करदात्यांसाठी वार्षिक कर विवरणपत्र अर्ज अधिसूचित करण्यात
आले असून, ते येत्या ३१
डिसेंबर पर्यंत दाखल करता येतील. उद्योग
जगताची जुनी मागणी यामुळे आता पूर्ण होत आहे. वस्तू
आणि सेवा कर एक जुलै २०१७
पासून लागू असून, त्यात १७ अन्य
प्रकारचे अप्रत्यक्ष कर विलीन करण्यात आले आहेत.
****
या पावसाळ्यात एक जूनपासून कालपर्यंत राज्यात एकूण
सरासरीच्या ८६ पूर्णांक एक दशांश टक्के इतका पाऊस झाला असून, राज्यातल्या जलाशयांमध्ये
६६ पूर्णाक एक दशांश टक्के जलसाठा झाला आहे.
खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ११ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के
पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांचा
समावेश आहे. त्याचप्रमाणे राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये ७५ ते शंभर टक्के यादरम्यान पावसाची
नोंद झाली असून, त्यात मराठवाड्यातल्या जालना, लातूर, परभणी, या जिल्ह्यांचा समावेश
आहे. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांसह राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये,
५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या देवराई गावाजवळ कल्याण-विशाखापट्टणम
महामार्गावर एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू
झाला. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली
देवराई इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी
झाली होती. या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यानं अनेक अपघात
होत असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित
ठेकेदारावर शासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सतीश पालवे यांनी केली आहे.
****
राज्यात काही भागात स्वाईन फ्ल्यू चा प्रादुर्भाव
दिसून येत आहे. या हंगामात राज्यात आतापर्यंत २२२ लोकांना एच वन एन वन विषाणूची लागण
झाली असून, स्वाईन फ्ल्यू मुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे. एक ऑगस्ट नंतर राज्यात स्वाईन
फ्ल्यूचे १७९ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागानं स्वाईन फ्ल्यूला आळा घालण्यासाठी जनजागृती
अभियान सुरु केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment