Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 6 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
समलैंगिकता
अपराध नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. भारतीय दंड
विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान
न्यायालयानं, परस्पर सहमतीनं ठेवले जाणारे लैंगिक संबंध गुन्हा ठरवणारा, कलम ३७७ मधला
भाग वगळण्याचा निर्णय जाहीर केला. प्राण्यांवर होणारे लैंगिक अत्याचार मात्र, दंडनीय
अपराध असल्याचं, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****
तेलंगणा
विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा निर्णय तेलंगणा मंत्रिमंडळानं घेतला असून, राज्यपाल
ई एस एल नरसिंहम यांनी मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव मंजूर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांनी
नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती
केली आहे. येत्या काळात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच तेलंगणामध्येही विधानसभेची
निवडणूक होण्याची शक्यता आहे.
****
अंधश्रद्धा
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी
माध्यमांसमोर भाष्य करणाऱ्या तपास यंत्रणांना आज मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं. याप्रकरणी
आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनीही माध्यमांसमोर
जाऊन या प्रकरणाचे पुरावे उघड करु नये असं सांगितलं. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या
विशेष तपास पथक-एसआयटीला इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे तपास सुरु
ठेवण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १० ऑक्टोबरला होणार
आहे.
****
दरम्यान,
पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातला प्रमुख आरोपी अमोल काळे याला आज पुणे न्यायालयात
हजर करण्यात आलं असून, न्यायालयानं त्याला १४ सप्टेंबरपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयची
कोठडी सुनावली आहे. सीबीआयनं काल बंगळूरु तुरुंगातून ताबा घेतला होता. काळे हाच दाभोलकर
यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असावा, असा सीबीआयचा संशय आहे.
****
कंत्राटी
कामगार प्रथा आणि ठराविक मुदतीचा रोजगार या सरकारच्या धोरणांविरुध्द आज भारतीय मजदूर
संघातर्फे देशभरात आंदोलन करण्यात आलं. धुळ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजदूर
संघाच्या पदाधिकारी सभासदांनी निदर्शनं केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सर्वोच्च
न्यायालयानं समान काम - समान वेतन देण्यात यावं असे आदेश दिलेला असूनही त्याचा कोणताही
फायदा कंत्राटी कामगारांना मिळत नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
प्रवाशांच्या
सुरक्षिततेबाबत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लातूर शहरातल्या सर्व परवानाधारक ऑटोरिक्षांना
दर्शनी भागात क्विक रिस्पॉन्स - क्यूआर कोड बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या कोडमुळे
पोलिसांबरोबरच प्रवाशांनाही संबंधित वाहनाची आणि वाहनचालकाचीही पूर्ण माहिती मिळणं
सोपं होणार आहे. ऑटोरिक्षांना कोड बसवण्याच्या उपक्रमाची सुरुवात आज जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
यांच्या हस्ते करण्यात आली.
****
भारतीय
जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचा जालना जिल्हा महिला
काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज निषेध करण्यात आला. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर
कारवाई करावी, तसंच कदम यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आलं. जालना शिवसेना महिला आघाडींच्या पदाधिकाऱ्यांनीही सुभाष चौकात राम कदम
यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध नोंदवला.
****
रायगड
जिल्ह्यातल्या खालापूर इथं मुंबई-पुणे महामार्गावर पाच कार, एक टेम्पो आणि चार ट्रक
एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मार्गावरची
वाहतूक विस्कळीत झाली होती.
****
आंध्र
प्रदेशातल्या कर्नुल जिल्ह्यात क्रूझर गाडीला झालेल्या अपघातात नांदेड जिल्ह्याच्या
मुखेड तालुक्यातल्या वसूर तांडा इथल्या पाच जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी हा अपघात
झाला. मृत सर्वजण एकाच कुटुंबातले असून, ते तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात होते.
****
चित्रपट
निर्माता, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि रॉनी स्क्रुवाला हे आज कथा चोरीच्या प्रकरणात
औरंगाबाद जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. औरंगाबादचे मुस्ताक मोहसीन मुबारक हुसैन
यांनी, त्यांच्या ‘जंगल मे मंगल’ या कथेवर आधारित वर्मा यांनी ‘अज्ञात’ नावाचा चित्रपट
बनवल्याची तक्रार दाखल केली आहे. कॉपी राईट कायद्यानुसार वर्मा यांच्यावर कारवाईची
मागणी ता तक्रारीत केली आहे.
****
No comments:
Post a Comment