Thursday, 6 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 6 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 समलैंगिकता अपराध नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटना पीठानं २०१३च्या यासंदर्भातल्या आपल्या निर्णयात बदल केला. दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी संबंधांना बेकायदा ठरवलं होतं.



 मात्र भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं, परस्पर सहमतीनं ठेवले जाणारे लैंगिक संबंध गुन्हा ठरवणारा, कलम ३७७ मधला भाग वगळण्याचा निर्णय जाहीर केला. प्राण्यांवर होणारे लैंगिक अत्याचार मात्र, दंडनीय अपराध असल्याचं, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.



 घटनात्मक नैतिकता महत्त्वाची असून, प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. स्वत:ला व्यक्त होण्याचा अधिकार नाकारणं, हे मृत्यूला आमंत्रण देण्याइतकं गंभीर असल्याचं, न्यायालयानं नमूद केलं. पूर्वीच्या चुका सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमोल काळे याला आज पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. काळे हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातही सहभागी असावा, असा केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचा संशय आहे. त्यामुळे सीबीआयनं काल अमोल काळे याचा बंगळूरु इथल्या तुरुंगातून ताबा घेतला. काळे याला २१ मे रोजी दावणगिरी इथून अटक करण्यात आली होती. 

****



 भारतीय घटनेमुळे संसदीय लोकशाही बळकट झाली असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं संविधानावरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. संविधान शासन आणि न्यायशास्त्राच्या सर्व मुद्यांवर आधारित असल्याचं ते म्हणाले.

****



 सरकार खासगी कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी राफेल लढाऊ विमान खरेदी करार करत असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावला आहे. या करारावर टीका केल्याबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची निंदा केली आहे. या संपूर्ण करारात कोणत्याही खासगी पक्षाची भूमिका नसून, गांधी यांना याबाबत संपूर्ण माहिती नसल्याचं जेटली यांनी नमूद केलं. हा करार पूर्ण होणार असून, ३६ राफेल विमानं भारताच्या वायूसेनेत दाखल होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



 दरम्यान, रुपयाच्या घसरणीसाठी जेटली यांनी जागतिक घटकांना दोषी ठरवलं आहे. यात चिंता करण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी ते बोलत होते. रुपयाच्या मूल्याच्या घसरणीसंदर्भात रिजर्व्ह बँक आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. भारत कच्च्या तेलाचा मोठा खरेदीदार असून, तेलाचे भाव वाढल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो, असं त्यांनी नमूद केलं. चलन बाजारातले चढ उतारही लवकरच कमी होतील, असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला.

****



 महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी समाजाच्या सर्वच स्तरातून टीका होत असलेले आमदार राम कदम यांनी ट्वीटरवरून माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून, आपल्या राजकीय हितशत्रूंनी हा वाद निर्माण केला, त्यामुळे माता भगिनींची मतं दुखावली, मात्र सर्व माता भगिनींबद्दल आदर व्यक्त करत, माफी मागत असल्याचं, त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

****



 चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस २९ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०१९ या दरम्यान मुंबईत होणार आहे. आपत्तीतील धोका व्यवस्थापन, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, शाश्वत विकास यामधील आपत्ती व्यवस्थापन ही या परिषदेची संकल्पना आहे. आयआयटीच्या परिसरात ही परिषद आयोजित करण्यात आली असून, राज्य शासन हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत शंभरहून अधिक देशातले पंधराशेहून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेसाठी गठित सुकाणू समितीची पहिली बैठक काल मुंबईत मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन ही भरवण्यात येणार आहे.

****



 गोवर आणि रूबेला आजार मुक्त भारतासाठी संपूर्ण देशभरात गोवर आणि रुबेला लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. राज्यात येत्या चौदा नोव्हेंबरपासून या रोगांच्या लसीकरणाची मोहीम सुरू होणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे. मराठवाड्यात सगळ्या खासगी, शासकीय, महानगरपालिका, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांसह संपूर्ण ठिकाणी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना त्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...