Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
समलैंगिकता
गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
·
दाभोलकर आणि पानसरे हत्येबाबत माध्यमांसमोर भाष्य केल्या प्रकरणी
मुंबई उच्च न्यायालयाकडून नापसंती व्यक्त
·
स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या
वाहनांना परवान्यांची आवश्यकता नाही -परिवहन मंत्र्यांची घोषणा
·
आंध्र प्रदेशातल्या रस्ता अपघातात नांदेड जिल्ह्यातल्या पाच
जणांचा मृत्यू
आणि
·
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार जाहीर; उद्या
औरंगाबाद इथं वितरण
****
समलैंगिकता गुन्हा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च
न्यायालयानं दिला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान
देणाऱ्या याचिकांवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, परस्पर सहमतीनं ठेवले
जाणारे समलैंगिक संबंध गुन्हा ठरवणारा, कलम ३७७ मधला भाग वगळण्याचा निर्णय जाहीर केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं, समलैंगिकांना
अन्य नागरिकांप्रमाणेच समान अधिकार असल्याचा निर्वाळा देत, समलैंगिकता हा गुन्हा नसून
ही त्या व्यक्तीची ओळख असते आणि व्यक्तीची ओळख ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा
पैलू असते, असं मत व्यक्त केलं. प्राण्यांवर होणारे लैंगिक अत्याचार मात्र,
दंडनीय अपराध असल्याचं, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****
डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या
हत्येप्रकरणी माध्यमांसमोर भाष्य केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं नापसंती दर्शवली
आहे. काल याप्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, माध्यमांसमोर पुरावे उघड
केल्याबद्दल तपासयंत्रणांना फटकारलं. दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी देखील माध्यमांसमोर
जाऊन, या प्रकरणाचे पुरावे उघड करु नये, असं न्यायालयानं सांगितलं. या हत्या प्रकरणांचा
तपास करणाऱ्या विशेष तपास पथक-एसआयटीला इतर तपास यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे
तपास सुरु ठेवण्याची सूचनाही न्यायालयानं केली आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी १० ऑक्टोबरला
होणार आहे.
दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातला प्रमुख आरोपी
अमोल काळे याला काल पुणे न्यायालयानं १४ सप्टेंबरपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयची
कोठडी सुनावली आहे. सीबीआयनं काल बंगळूरु तुरुंगातून त्याचा ताबा घेतला होता. काळे
हाच दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असावा, असा सीबीआयचा संशय आहे.
****
तेलंगणा राज्य विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याचा निर्णय
तेलंगणा मंत्रिमंडळानं घेतला आहे, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल ई एस एल नरसिंहम यांनी मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव
मंजूर करत, नवीन सरकार सत्तेवर येईपर्यंत चंद्रशेखर राव यांची काळजीवाहू मुख्यमंत्री
म्हणून नियुक्ती केली. येत्या काळात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच तेलंगणा
विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
****
स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या
वाहनांना आता परवान्यांची आवश्यकता नसल्याची घोषणा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी
केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं वाहन निर्माता कंपन्यांच्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
हरित इंधन, इथेनॉल - मिथेनॉल किंवा जैविक इंधन तसंच विजेवर चालणाऱ्या वाहनांचा यात
समावेश असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. महानगरांव्यतिरक्त इतर शहरांमध्ये दुचाकी
वाहनांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करता येईल, असं गडकरी म्हणाले. ग्रामीण भागांमध्ये
रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी वाहन निर्मिती कंपन्यांनी ग्रामीण भागात वाहन चालक
प्रशिक्षण केंद्र सुरू करावीत, असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं.
****
पेट्रोल आणि डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात विविध विरोधी पक्ष येत्या सोमवारी १० सप्टेंबरला भारत
बंद आंदोलन करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नवी दिल्ली
इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत
देशभरात बंद पाळण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान, तृणमूल काँग्रेस
पक्ष इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करेल, मात्र या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं पक्षातर्फे
सांगण्यात आलं आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५००
नवीन बस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२ कोटी पाच लाख
रुपये लवकरच मंडळाला दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्याचे महसूल मंत्री तसंच भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं
जाहीर केलं आहे. ते काल कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. लोकसभा, विधानसभा
किंवा पदवीधर मतदार संघ यापैकी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा पाटील यांनी
यावेळी केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
आंध्र प्रदेशातल्या कर्नुल जिल्ह्यात एका चारचाकी गाडीला
झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या
वसूर तांडा इथले रहिवासी आहेत. मृत सर्वजण एकाच कुटुंबातले असून, ते तिरुपती इथं बालाजीच्या
दर्शनासाठी जात असताना, काल सकाळी हा अपघात झाला.
****
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गतचे राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये
२५ लाख रूपयांचा पहिला पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीला
मिळाला आहे, तर सातारा जिल्ह्यातल्या मान्याची वाडी आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव
गौरी या दोन ग्रामपंचायतींना दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आणि रायगड जिल्ह्यातल्या
धाटाव आणि चंद्रूपर जिल्ह्यातल्या राजगड ग्रामपंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
विभागून देण्यात आला आहे.
विभागस्तरावर औरंगाबाद विभागाचा प्रथम पुरस्कार लातूर
जिल्ह्याच्या शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या धामणगाव ग्राम पंचायतीला पहिला तर नांदेड
जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी ग्राम पंचायतीला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल
औरंगाबाद इथं हे पुरस्कार जाहीर केले, ते म्हणाले,
महाराष्ट्रामधील पाच गावं पहिला, दुसरा, तिसरा आलेली आहेत की ती गावं आदर्श
म्हणून त्यांनी चांगले कामं केलं.सहा विभागामध्ये प्रत्येक विभागात तीन बक्षीसं आहेत.जिल्हा पातळीवरचे तीन बक्षीसं आहेत. प्रत्येक
तालुक्यांमध्ये तीन ग्रामपंचायतींना बक्षीसं आहेत.एकूण उद्या १०२ ग्रामपंचायतींला आपण
गौरव करणार आहेत.आणि त्यांना नगदी स्वरूपाचं बक्षीस महाराष्ट्रातल्या गावांना द्यायचं
आहे की ज्यांनी स्वच्छता अभियानाचं काम केलं आहे.जिथं लोक चळवळ उभी राहीली आणि त्या
गावाचं चित्र बदललं.
या राज्यस्तरीय पुरस्कारांचं उद्या शनिवारी औरंगाबाद इथं
वितरण करण्यात येणार आहे. शहरातल्या संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता हा पुरस्कार
वितरण सोहळा होणार आहे.
****
प्रधानमंत्री
सुरक्षित मातृवंदन अभियानातून यवतमाळ जिल्ह्यातल्या आठ हजार एकशे पंचाऐंशी गर्भवतींची तपासणी
करण्यात आली आहे. वणी तालुक्यातल्या कुंभा गावातल्या माधुरी गाडेकर यांनी या योजनेबाबत
समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या-
माझं नाव सौ.माधुरी जगदीश
माडेकर त्याच्यासाठी आपल्याला पहिले हजार रूपये मिळायचे नोंदणी केल्या नंतर.नंतर सहा
महिने पूर्ण झाल्यानंतर आणखी दोन हजार रूपये मिळायचे आणि दर महिन्याच्या नऊ तारखेला
आपल्या गावातील दवाखान्यामध्ये तपासायला जावं लागायचं आणि दवाखान्यात डिलीव्हरी झाल्यानंतर
आणखीन दोन हजार असे एकूण पाच हजार रूपये भेटतात.
****
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम
यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचा जालना जिल्हा महिला काँग्रेस समितीनं
काल निषेध केला. कदम यांनी जाहीर माफी मागावी, या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
दिलं. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं
दहन करून निषेध व्यक्त केला. औरंगाबाद इथं शिवसेना महिला आघाडीनही आमदार कदम यांच्या
प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध व्यक्त केला. कदम यांनी राजीनामा द्यावा अन्यथा
तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, आमदार कदम यांनी या प्रकरणी काल सकाळी ट्वीटरवरून
माफी मागितली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कोथळज इथं पोषण
आहार महिना साजरा केला जात आहे. यामध्ये गर्भवती तसंच नवजात बालकांची काळजी घेणं, किशोरवयीन
मुलींमध्ये रक्ताचं प्रमाण वाढवणं यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. येत्या
३० तारखेपर्यंत हे अभियान चालणार आहे.
//************//
No comments:
Post a Comment