Friday, 14 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.09.2018 - Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****

·      राज्यात हर्षोल्हास आणि ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सवाला प्रारंभ.

·      विजय मल्ल्या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोप.

·      न्यायमूर्ती रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश.

·      जगमित्र सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह आठ संचालकांच्या मालमत्तेवर न्यायालयाचे निर्बंध.

आणि

·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तर भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा सात धावांनी पराभव करत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकला.

****

राज्यात गणेशोत्सवाला कालपासून हर्षोल्हासात आणि ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ झाला. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या भक्तीभावानं गणेशाची स्थापना केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुखसमाधान, चांगलं आरोग्य मिळावं, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं, त्यांनी सांगितलं. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, काल दिवसभर सर्वत्र बाजारपेठा गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्यानं फुलल्या होत्या. यंदा पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची बहुतांश प्रमाणात खरेदी करण्यात आली. तसंच नागरिकांनी बाजारपेठेतून मूर्ती खरेदी करण्यापेक्षा घरी बनवलेल्या मूर्तींची स्थापना अधिक प्रमाणात केल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

विविध बँकाचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये कर्ज बुडवलेल्या विजय मल्ल्या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काल काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मल्ल्याला, देशाबाहेर पळून जाण्यास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप वार्ताहरांशी बोलतांना केला. संसदेच्या केंद्रीय सभागृहात जेटली आणि मल्ल्या यांना, काँग्रेस नेते खासदार पी एल पुनिया यांनी एकत्र पाहिल्याचं, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एक मार्च २०१६ रोजी ही भेट झाली आणि दुसऱ्याच दिवशी दोन मार्चला मल्ल्या पसार झाल्याचं, वृत्तवाहिन्यांकडून समजल्याचं, गांधी म्हणाले. या संदर्भात अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही गांधी यांनी केली.

दरम्यान, गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विजय मल्ल्या याला सहकार्य केल्याचं, भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस सरकारनं मल्ल्याला मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यासाठी बेलआऊट पॅकेज मिळवून दिलं, मल्ल्या याला गांधी कुटुंबियांनी मोठी सूट मिळवून दिल्यानेच २०१० पासून त्यानं सर्व नियम धाब्यावर बसवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं, गोयल म्हणाले.

****

न्यायमूर्ती रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश असतील. विधी मंत्रालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला निवृत्त होत आहेत. मिश्रा यांच्यानंतर गोगोई हेच सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. ते येत्या तीन ऑक्टोबरला पदग्रहण करतील आणि तेरा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असेल.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जगमित्र सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह सूत गिरणीच्या इतर आठ संचालकांच्या मालमत्तेवर अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्बंध घातले आहेत. याशिवाय सूत गिरणीचे कार्यालय तसंच विविध ठिकाणच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. विरोधी पक्षनेते मुंडे यांच्या मालकीचं परळी इथलं घर, देशमुख टाकळी, कौडगाव आणि जलालपूर इथली शेतजमिनीची खरेदी - विक्री तसंच हस्तांतरण करण्यावर न्यायालयानं बंदी घातली आहे. त्याचबरोबर या मालमत्तेपासून कोणताही लाभ त्यांना घेता येणार नसल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

मुंडे यांनी २००३ ते २०११ या काळात बँकेकडून सूतगिरणीसाठी कोट्यावधी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्यामुळे २०१३ मध्ये त्यांच्यासह संचालकांविरूद्ध परळीच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.

****

९४ कोटी रूपयांच्या कॉसमॉस बँक सायबर घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातला सिल्लोडचा रहिवाशी शेख मोहम्मद अब्दुल जब्बार आणि नांदेड जिल्ह्यातला भोकरचा रहिवाशी महेश साहेबराव राठोड या दोघांना नव्यानं अटक करण्यात आली आहे. त्यांनी एटीएममधून पैसे काढून हा घोटाळा केल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे दोघेही ऑनलाईन मार्केटींगच्या व्यवहारात असून त्यांचे इतर आरोपींसोबत संबंध असल्याचं आढळून आलं आहे. बँक ग्राहकांच्या विसा आणि रूपै कार्डची माहिती चोरून २८ देशामधून हे ९४ कोटी रूपये त्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आले आहेत.

****

शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी उद्यापासून केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं देशभर ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेत या अभियानाचा शुभारंभ होणार असून यानिमित्त स्वच्छतेची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी दिली आहे.

****

देशातल्या असंघटित लघुउद्योगांच्या विकासासाठी आणि वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारनं तयार केलेल्या ‘पंतप्रधान मुद्रा योजने’ला अहमदनगर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव इथले लक्ष्मण नांगरे यांनी मुद्रा योजनेतून आपल्या इलेक्ट्रिकल्स दुकानासाठी दोन लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भरभराट झाल्याचा अनुभव त्यांनी आकाशवाणीला सांगितला.

मी लक्ष्मण नागरे तिसगाव येथील रहिवासी असून मातोश्री इलेक्ट्रीकल या नावाने माझे दुकान आहे. या दुकानासाठी मला भांडवलाची कमतरता होती. म्हणून मी सेंट्रल बँकेकडे ॲप्लीकेशन केले व ॲप्लीकेशन केल्यानंतर केंद्राची मुद्रा लोनची स्कीम चालू होती. त्या स्कीममध्ये मला दोन लाख रुपयांचे लोन मिळाले. व ते लोन मिळाल्यानंतर मी माझ्या दुकानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले. त्या साहित्यामधून मला माझ्या दुकानासाठी खूप काही भरभराट करता आली. त्या लोनच्या जोरावर मी माझ्या दुकानाला खूप चांगले स्वरुप देऊ शकलो. यामुळे मी सेंट्रल बँकेचा, केंद्र शासनाच्या मुद्रा लोन स्कीमचा खूप खूप ऋणी आहे.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतनं पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एच एस प्रणोय आणि पी व्ही सिंधूचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघानं काल यजमान श्रीलंकेचा सात धावांनी पराभव करत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकला आहे. याबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी निर्धारीत ५० षटकांत सर्वबाद २१९ धावा केल्या. यष्टीरक्षक तान्या भाटीयानं ६६ चेंडुत ६८ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेचा महिला संघ ४९ व्या षटकांत २१२ धावा काढून सर्वबाद झाला. वेगवान गोलंदाज मानसी जोशीनं तीन तर फिरकीपटु राजेश्वरी गायकवाडनं दोन बळी घेतले.

****

पोलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या तेराव्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एल. सरीता देवीनं ६० किलोग्रॅम वजन गटात, एम. सी. मेरी कोमनं ४८ किलोग्रॅम वजनी गटात, रितू ग्रेवालनं ५१ किलोग्रॅम वजनी गटात तर लव्हलिना बोरगोहेननं ६९ किलोग्रॅम वजनी गटात पदकं निश्चित केली आहेत. या चारही जणींनी त्यांच्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य शरण पाटील यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत तीन उपाध्यक्ष आणि सहा जिल्हा सरचिटणीस यांचीही निवड झाली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातल्या काही गावात सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हे धक्के बसले. भूकंप मापक यंत्रावर या धक्क्याची तीव्रता २ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...