Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
01 December 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
०१ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
जी-ट्वेंटी देशांनी
फरार आर्थिक गुन्हेगारांना शोधून त्यांचं सुलभ हस्तांतरण करण्यासाठी तसंच त्यांना संबंधित
देशांमध्ये आश्रय नाकारण्यासाठी एक सामुहीक कार्यक्रम आखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्जेंटिनामध्ये ब्यूनर्स
आयर्स इथं जी ट्वेंटी राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.
याबाबत एक तपशीलवार सादरीकरण करत फरार आर्थिक गुन्हेगारांचा उपद्रव रोखण्यासाठी परिणामकारक
कृतीशील सहकार्याची गरज असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय्य, लोकशाहीकारक संबंधांना चालना देण्यासाठी तसंच आंतरराष्ट्रीय
सुव्यवस्था राखण्यासाठी सामुहिकरित्या काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
जी-ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या नेत्यांच्या झालेल्या
बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
****
आधार प्राधिकरणानं अर्थात
यु आय डी ए आयनं बँकांना, आधार कार्डच्या आधारे राबवण्यात येत असलेली वेतन व्यवस्था बंद
करू नये, असं सूचित केलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं भारतीय राष्ट्रीय वेतन व्यवस्था
महामंडळाला या स्वरुपाचं पत्र पाठवल्यानंतर यु आय डी ए आयनं हे स्पष्टीकरण दिलं. सर्वोच्च
न्यायालयानं काही दिवसांपूर्वी आधारबाबत दिलेल्या निकालानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं
वेतन महामंडळाला आधारवर आधारित वेतन व्यवस्था बंद करण्याबाबतचा मानस व्यक्त केल्यानंतर
यु आय डी ए आयनं सदरचे निर्देश दिले.
****
तरुण पिढीने वैफल्यग्रस्त
होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, यासाठी आत्महत्या
प्रतिबंधक धोरण आखण्याची कल्पना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे. हैदराबाद
इथं काल भारतीय व्यक्तीगत मानसोपचार संघटनेच्या एकोणिसाव्या
वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तरुण मुलं, शेतकरी, महिला
आत्महत्या करतात हे पाहून आपण व्यथित होतो, असं
सांगून उपराष्ट्रपतींनी, यावर उपाय म्हणून राष्ट्रीय पातळीवर अभियान राबवण्याची
गरज व्यक्त केली.
****
केंद्रीय महसूल सचिव म्हणून अजय भुषण पांडेय यांनी
काल कार्यभार स्वीकारला. पांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतले १९९४च्या तुकडीचे अधिकारी
आहेत. भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वस्तू आणि सेवा
कर नेटवर्कचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत.
****
राजस्थानच्या बिकानेर इथं एका जमिन घोटाळ्याप्रकरणी आर्थिक
गैरव्यवहाराचा आरोप ठेवत सक्तवसूली संचालनालयानं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे
नातलग रॉबर्ट वाड्रा यांना समन्स बजावलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार
वाड्रा यांच्याविरोधात हे दुसरं समन्स असून पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू.
बुश यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. जॉर्ज एच. डब्ल्यू.
बुश हे अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी १९८९ ते १९९३ या काळात राष्ट्राध्यक्ष
पदाची धुरा सांभाळली होती. अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे
ते वडील होते.
****
बुलडाणा जिल्हयात पाणीटंचाई गंभीर होत चालली असून,
अत्यल्प पावसामुळे भुर्गभातली पाण्याची पातळी मोठया प्रमाणात खालावली आहे. जिल्ह्यातल्या
शेगाव तालुक्यातल्या दहा गावात विहीरींचं अधिग्रहण करण्यात आलं, तर चिंचोली, कुरखेड
या गावात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात गोवर रुबेला लस दिल्यानंतर काल
सलग चौथ्या दिवशी १२ मुलांना रिॲक्शन झाली. या मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल
करण्यात आलं आहे. याआधीही पहिले तीन दिवस काही मुलांना लसीकरणानंतर आरोग्याच्या समस्या
सुरु झाल्या, मात्र त्यांना तातडीनं उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं
डॉक्टरांनी सांगितलं.
****
भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याला आंतरराष्ट्रीय
नेमबाजी महासंघाच्या ब्ल्यू क्रॉस या मानाच्या सर्वोच्च नेमबाजी सन्मानानं गौरवण्यात
आलं. जर्मनीत म्युनिक इथं महासंघाच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत अभिनवला हा पुरस्कार
प्रदान करण्यात आला. अभिनव बिंद्रानं २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये, तसंच २००६ साली जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून
दिलं होतं. ब्ल्यू क्रॉस हा सन्मान पटकावणारा अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय नेमबाज
आहे.
****
भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज
नेदरलँड ची गाठ मलेशियाशी पडणार आहे, तर ड गटात जर्मनीचा सामना पाकिस्तानबरोबर होईल.
क गटात भारताचा सामना उद्या बेल्जियम बरोबर होईल. गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं
काल आयर्लंडला दोन - एक असा पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment