आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ नोव्हेंबर डिसेंबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे मुख्य निवडणूक
आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांनी आज
पदभार स्वीकारला. निष्पक्ष निवडणूक होण्यावर आपली प्राथमिकता राहील, असं त्यांनी
सांगितलं. अरोरा यांची नियुक्ती सप्टेंबर २०१७
मध्ये झाली असून, त्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळणार आहे. अरोरा यांनी
यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे
सचिव आणि इंडियन एअर लाईन्सचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे.
****
स्वातंत्र्य
प्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षात २०२२ मध्ये जी-ट्वेंटी शिखर परिषद भारतात आयोजित
करण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०२२ मध्ये
ही परिषद इटलीमधे होणार होती, त्याऐवजी २०२१ मध्ये इटलीनं परिषदेचं यजमानपद स्वीकारावं
अशी विनंती आपण केली होती, ती इटली आणि इतर देशांनी मान्य केल्याचं पंतप्रधानांनी
ट्विटर संदेशात सांगितलं. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्वानिमित्त देशभरात होणाऱ्या
सोहळ्यामध्ये जी-ट्वेंटी देशांनी सहभागी व्हावं, आणि
भारताच्या आतिथ्याचा लाभ घ्यावा, असं
पंतप्रधान म्हणाले.
****
जागतिक
व्यापार संघटनेत सुधारणा तसंच हॅम्बर्ग जाहिरनाम्याची अंमलबजावणी करण्याकरता सर्व जी-ट्वेंटी देशांनी पुढे येण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जी-ट्वेंटी शेर्पा म्हणून नियुक्त झालेले शक्तीकांत दास यांनी काल ब्यूनर्स आयर्स इथं ही माहिती
दिली. आर्थिक गुन्हे किंवा घोटाळे करुन फरार झालेल्या व्यक्तींच्या हस्तांतरणाबाबत
तसंच त्यांच्या इतर देशातल्या मालमत्ता जप्त करण्याबाबत नऊ कलमी कार्यक्रम पंतप्रधानांनी
शिखर परिषदेत मांडल्याचं त्यांनी सांगितलं.
****
प्राथमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या विविध
प्रलंबित मागण्या संदर्भात काल राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं राज्यव्यापी आंदोलनं
केलं. औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी
धरणे आंदोलन केलं. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी,
भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजनानं नियुक्त करु नये याप्रमुख मागण्यासह
अन्य मागण्याचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment