Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
03 December 2018
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
०३ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
जागतिक अर्थव्यवस्थेतले व्यापार
अडथळे दूर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं
आहे. मुंबईत आज जागतिक सीमा शुल्क
संघटना आणि धोरण आयोगाच्या ८०व्या संमेलनात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
ते बोलत होते. जागतिक अर्थव्यवस्थेत जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या भूमिकेची जेटली
यांनी यावेळी प्रशंसा केली. राष्ट्रीय सीमा ओलांडून व्यापार करणं ही काळाची गरज
असून, मुक्त व्यापारातले अडथळे दूर करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तीन दिवस
चालणाऱ्या या संमेलनात ३० हून अधिक देशांचे सीमा शुल्क प्रतिनिधी आणि
जागतिक सीमा शुल्क संघटनेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.
****
मध्यप्रदेशात भोपाळ इथं झालेल्या गॅस दुर्घटनेला
आज ३४ वर्ष पूर्ण झाली. या दुर्घटनेतल्या मृतांना आज सकाळी भोपाळ इथं आयोजित प्रार्थना
सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काल मृतांना श्रद्धांजली
अर्पण करताना, या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगाचं पर्यावरण आणि औद्योगिक सुरक्षेकडे लक्ष
केंद्रीत झाल्याचं नमूद केलं. १९८४ साली झालेल्या या दुर्घटनेत १५ हजाराहून अधिक लोकांचा
मृत्यू झाला, तर पाच लाखाहून अधिक नागरिक जखमी झाले होते.
****
जागतिक दिव्यांग दिवस आज पाळण्यात येत आहे. १९९२
साली संयुक्त राष्ट्रसंघानं एक प्रस्ताव पारित करुन तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग
दिवस म्हणून घोषित केला होता. दिव्यांगांच्या हिताचं रक्षण करणं आणि समाजातल्या प्रत्येक
वर्गातल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठी जागरुकता निर्माण करणं, हा या दिनाचा उद्देश
आहे. दिव्यांगांना सशक्त बनवण्याबरोबरच त्यांना बरोबरीचा अधिकार सुनिश्चित करणं, ही
यंदाच्या दिव्यांग दिनाची संकल्पना आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातल्या सांगरान
गावात आज पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या परिसरात
दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली, मात्र
चकमक सुरू झाल्यावर दहशतवादी पळून गेल्याचं वृत्त आहे.
****
जम्मू
काश्मीरमधे कायम अधिवास प्रमाणपत्रसंबधित कायद्यात कुठलाही बदल करण्याची योजना
नसल्याचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. सध्याच्या क्लीष्ट
पध्दतीमुळे राज्यातल्या वैध रहिवाशांना हे प्रमाणपत्र वेळेत मिळवण्यात अडचणी येत
आहेत, म्हणूनच हे प्रमाणपत्र देण्याच्या पध्दतीचं सुलभीकरण
करण्याच्या हेतूनं यासंदर्भात नागरिकांची मतं जाणून घेतली जात आहेत. घटनेतल्या ३५
अ या कलमाद्वारे राज्यातले कायम रहिवाशी कोण हे ठरवून त्यांना त्यांचे विशेष हक्क
आणि सुविधा देण्याचे अधिकार जम्मू काश्मीरला देण्यात आले आहेत, हे
देखील राज्यपालांनी स्पष्ट केलं.
****
तेलंगणा
आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज हैदराबाद इथं, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गडवाल आणि तनदूर
इथं प्रचार सभा घेणार आहेत. राजस्थानमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते मतदारांना
आकर्षित करण्यासाठी प्रचारसभांवर भर देत आहेत.
****
ट्रेन-१८
या देशाच्या पहिल्या इंजिन विरहीत रेल्वे गाडीनं काल चाचणी दरम्यान तासाला १८०
किलोमीटर मर्यादा पार केली. रेल्वेची इतर यंत्रणा आणि सिग्नल व्यवस्थित
मिळाल्यास ही गाडी ताशी दोनशे किलोमीटर वेगानं धावू शकते. पूर्णपणे भारतीय बनवटीची
ही गाडी कार्यान्वित झाल्यानंतर देशातली सर्वात जलद रेल्वे गाडी ठरणार आहे. गाडीला
१६ डब्बे असून सध्याच्या शताब्दी एक्सप्रेस एवढे प्रवासी त्यात मावतील. गाडीला एरो
डायनामिक प्रणालीच्या चालक केबिन्स असून, त्यामुळे ही गाडी विरुध्द दिशेचा
प्रवासही त्वरीत सुरु करु शकते. येत्या जानेवारीपासून ही गाडी प्रवासी सेवेत रुजू
होणार आहे.
****
मुंबईत
झालेली अकरावी टाटा खुली इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धा भारताच्या
लक्ष्यसेन आणि अस्मिता चालिहा यांनी जिंकली आहे. काल झालेल्या पुरुष एकेरीच्या
अंतिम सामन्यात युवा ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या लक्ष्यसेन यांनं
थायलंडच्या खेळाडूचा २१ - १५, २१ - १० असा पराभव केला, तर महिला एकेरीच्या अंतिम
सामन्यात अस्मितानं भारताच्याच वृषाली गुम्मादी हीचा २१ - १६, २१ - १३ असा पराभव
करत पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलं.
****
भुवनेश्वर
इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ‘अ’ गटात स्पेन विरुध्द
फ्रान्स ही लढत संध्याकाळी पाच वाजता, तर न्यूझीलंड विरुध्द अर्जेंटिना हा सामना
संध्याकाळी सात वाजता होणार आहे. क गटात काल भारत आणि बेल्जियम संघातला सामना
अनिर्णित राहिला. या अनिर्णित सामन्यामुळे भारत आणि बेल्जियम दोन्ही संघांना
आतापर्यंत चार-चार गुण मिळाले असून, चांगल्या गोल फरकामुळे भारत क गटात पहिल्या
स्थानावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment