आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मध्यप्रदेश विधानसभेचा पूर्ण निकाल
जाहीर झाला आहे. विधानसभेच्या एकूण २३० पैकी काँग्रेसनं ११४ जागा जिंकल्या असून, सरकार
स्थापनेकरता आवश्यक बहुमतासाठी आणखी दोन जागांची आवश्यकता आहे. बहुजन समाज पार्टीनं
दोन तर समाजवादी पक्षानं एक जागा जिंकली आहे. भारतीय जनता पक्षानं १०९ जागा जिंकल्या
आहेत.
राजस्थानातही काँग्रेसला बहुमतासाठी एका जागेची आवश्यकता
आहे. काँग्रेसनं १९९ जागांपैकी ९९ जागा जिंकल्या असून, बहुजन समाज पार्टीला सहा जागा
तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं ७३
जागा जिंकल्या आहेत. राजस्थानात, सरकार स्थापन करण्याची तयारी काँग्रेसनं केली असून,
पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज जयपूरमधे होत आहे. या बैठकीत सरकारस्थापनेबाबत
तसंच विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीबाबत चर्चा होईल.
छत्तीसगढमध्ये मात्र काँग्रेस पक्षानं ९० जागांपैकी
काँग्रेसनं सर्वाधिक ६८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
तेलंगणातही नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी टीआरएसच्या
नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज हैदराबादमधे होत आहे. पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर
राव यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
मिझोराममधे, मिझो नॅशनल फ्रंटचे अध्यक्ष जोरमथांगा यांनी काल संध्याकाळी राज्यपालांची
भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. विधिमंडळ
पक्षाचे नेते म्हणून कालच त्यांची बिनविरोध
निवड झाली आहे.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजपासून कामकाजाला सुरुवात
होणं अपेक्षित आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण
करून, संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं होतं. या अधिवेशन काळात
राज्यसभेत आठ, तर
लोकसभेत १५ विधेयकं मांडण्यात येणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं
काही वेळापूर्वी चौथ्या भागीदारी मंचाचं उद्धाटन केलं. माता-बाल मृत्यूदर रोखणं आणि
किशोर वयीन मुलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणं आणि उत्तरदायित्व निश्चित करणं हा
या मंचाच्या आयोजनाचा उद्देश आहे. भारताकडे यंदा दुसऱ्यांदा या संमेलनाचं यजमानपद आलं
आहे. 85 देशांचे दीड हजार प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment