Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 12 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
विरोधी सदस्यांसह शिवसेनेच्या सदस्यांनी
केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज वारंवार बाधित झालं. काँग्रेसच्या सदस्यांनी
राफेल खरेदी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत, शिवसेनेच्या
सदस्यांनी अयोध्येत राम मंदीर बांधण्याच्या मुद्यावरून तर अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी
कावेरी पाणी वाटपावरुन जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन
या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत
स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता. मुष्टीयोध्दा एम सी
मेरीकोम हिने जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्याबद्दल, तसंच अंतराळ संशोधन
संस्थेनं सर्वात मोठ्या संचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल, अध्यक्षांनी
या गदारोळातच अभिनंदन प्रस्ताव मांडला. मात्र
गदारोळ वाढत गेल्यानं, त्यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
त्यापूर्वी लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली. कर्नाटक मधून पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या दोन खासदारांना पदाची
शपथ देण्यात आली.
राज्यसभेतही द्रमुक तसंच अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी
कावेरी मुद्यावरुन जोरदार घोषणाबाजी केली. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची
मागणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. या मुद्यावर थेट चर्चा करण्याचं
आवाहन त्यांनी केलं. मात्र सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी लावून धरत घोषणाबाजी
सुरू ठेवल्यानं, सभापतींनी कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित केलं. त्यापूर्वी राज्यसभेत अमेरिकेचे
माजी अध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव तसंच मुष्टीयोध्दा एम सी मेरीकोम हिने जागतिक
मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्याबद्दल, तसंच अंतराळ संशोधन संस्थेनं सर्वात
मोठ्या संचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव संमत केला.
****
मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेस
पक्षाला आज दुपारी सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. दरम्यान, मध्यप्रदेशच्या
मुख्यमंत्रिपदाचा शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा दिला असून, भारतीय जनता पक्ष मध्यप्रदेशात
सत्ता स्थापनेसाठी कोणताही
प्रयत्न करणार नसल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मध्यप्रदेशात
काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसनं मध्यप्रदेशात ११४ जागा जिंकल्या असून,
त्यांना सत्ता स्थापनेसाठी दोन जागांची आवश्यकता आहे.
राजस्थानातही काँग्रेस आज सायंकाळी सत्ता स्थापनेचा
दावा करणार आहे. राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी जयपूर
इथं ही माहिती दिली. गैरभाजप पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं, त्यांनी
सांगितलं.
****
सरकार स्वस्थ भारत निर्माण करण्यासाठी
सातत्यानं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. मोदी यांनी ट्विटरवर
आयुष्यमान भारत योजने अंतर्गत केवळ ८० दिवसांतच पाच लाखांहून अधिक कुटुंबांना नि:शुल्क
सेवेचा लाभ मिळाला असून हे या योजनेचं मोठं यश आहे असं नमूद केलं.
****
देशातल्या ९० टक्के कुटुंबांकडे घरगुती वापराचा गॅस
पोहोचला असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते
काल मुंबईत आयोजित उज्ज्वला संमेलनात बोलत होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि सौभाग्य
योजनांमुळं महिलांचं सबलीकरण होण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बँकांची सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची
कर्ज बुडवून फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याच्या प्रर्त्यापणाचं भारतीय स्टेट
बँकेनं स्वागत केलं आहे. मल्ल्याच्या प्रर्त्यापणामुळे बँकेच्या नऊ हजार कोटी रुपयांच्या
कर्जाच्या वसुलीला वेग येईल, असं बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटलं आहे. कर्ज
फेडण्याबद्दल मल्ल्याकडून बँकेला अद्याप एकही अधिकृत पत्र मिळालेलं नाही असंही त्यांनी
नमूद केलं. दरम्यान, विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्यासाठीची सक्तवसुली संचालनालयाची
याचिका फेटाळून लावावी, अशी विनंती मल्ल्याच्या वकिलानं मुंबईतल्या विशेष न्यायालयाला
केली आहे.
****
अर्थ मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास यांनी, रिजर्व्ह
बँकेच्या गर्व्हनरपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. उर्जित पटेल यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या
सुमारे दहा महिने आधीच राजीनामा दिल्यानंतर दास यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली
आहे.
****
१९ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय
शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत औरंगाबाद विभागीय संघानं प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांगली
जिल्ह्यात इस्लामपूर इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण इथल्या
प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या विभागीय संघानं पुणे संघावर मात करत, पहिला क्रमांक पटकावला.
विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. पुणे संघाचा दुसरा तर
कोल्हापूर संघाचा तिसरा क्रमांक आला. या स्पर्धेत राज्याच्या आठही विभागांचे संघ सहभागी
झाले होते, या सर्व संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ आज निवडला जात आहे.
*****
***
No comments:
Post a Comment