Wednesday, 12 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

अयोध्येत लवकरात लवकर राम मंदीर बांधण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा गांधीच्या प्रतिमेसमोर धरणं आंदोलन केलं. भारतीय जनता पक्षानं, २०१४ मध्ये राम मंदीर बांधण्याचं आश्वासन देत, सत्ता मिळवली होती, आपलं आश्वासन पक्षानं पूर्ण करावं, त्यासाठी जरूर भासल्यास थेट अध्यादेश काढावा, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. राम मंदिराच्या मुद्यावर काँग्रेस पक्षानंही आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

****

बहुजन समाज पार्टीनं राजस्थान आणि मध्यप्रदेशात काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी आज ही घोषणा केली. बसपानं मध्य प्रदेशात दोन तर राजस्थानात सहा जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेसाठी दोन तर राजस्थानात सत्ता स्थापनेसाठी एक आमदाराच्या पाठिंब्याची गरज आहे. समाजवादी पक्षानंही काँग्रेसला मध्यप्रदेशात पाठिंबा जाहीर केला आहे.

****

तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीच्या निर्वाचित आमदारांची आज बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यपालांना भेटून सरकार बनवण्याचा दावा करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनं सांगितलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमत मिळालं असून दुसऱ्यांदा हा पक्ष सत्तेवर आला आहे.

****

संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी, लोकसभेत आज धरण सुरक्षा विधेयक २०१८ सादर केलं. धरण अथवा बंधाऱ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी त्याची पाहणी, नियंत्रण आणि देखभाल - दुरुस्तीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक संमत झाल्यावर सर्व राज्यातल्या धरणं तसंच बंधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लागू होणार आहे.

****

भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली असून, यापुढं येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत देशातलं चित्रं बदलेलं असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पवार यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारचा साडेचार वर्षांचा कारभार, नोटबंदी, अर्थव्यवस्थेबाबत उदासीनता, स्वायत्त संस्थांवर हल्ले, आदिवासी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, आक्रमक प्रचार याबाबत जनतेनं स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे, असं ते म्हणाले.

****

पायाभूत सुविधांच्या विकासानं पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या शाश्वत विकासाचे प्रयत्न, सुनियोजित वित्तीय आणि प्रशासनिक सुधारणांमुळं हे उद्दिष्ट २०२५ पर्यंत नक्कीच साध्य करता येवू शकेल असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत आज टाईम्स नेटवर्कतर्फे आयोजित भारतीय आर्थिक परिषदेत ते बोलत होते.

कौशल्याधारित मनुष्यबळाच्या जोरावर ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट अधिक उत्तम पद्धतीनं साध्य करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

पाच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्याची पावती देणारी यंत्र अयशस्वी झाल्याच्या खूपच कमी घटना घडल्या असल्याचं आज लोकसभेत सांगण्यात आलं. कायदा आणि न्याय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

****

देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गो संरक्षणाचा स्वीकार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज मुस्लिम गोरक्ष संघाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. आठवले यांनी या संघटनेला देशातलं ‘क्रांतिकारक पाऊल’ म्हणून संबोधलं असून यामुळे हिंदू आणि मुस्लिम जवळ येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गाईंच्या कत्तलीवर कायद्यानं बंदी घातली असून त्यासाठी जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

****

सरकारनं सायबर हल्ले आणि सायबर दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी संकट व्यवस्थापन योजना तयार केली आहे. केंद्र तसंच राज्य सरकारांची सर्व मंत्रालयं आणि विभागांसाठी ही योजना लागू असणार आहे. लोकसभेत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. माहितीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ७६ सुरक्षा परीक्षण संस्थांचं पॅनल तयार केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१६ ते २०१८ या कालावधीत हजारोंच्या संख्येनं भारतीय संकेतस्थळं हॅक करण्यात आल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचं औचित्य साधून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं अन्न आणि औषध प्रशासनानं ‘स्वस्थ भारत सायकल रॅली’चं आयोजन केलं आहे. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत ही फेरी होणार असून १४ तारखेला अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा इथून औरंगाबाद इथं ही फेरी येणार आहे. १५ तारखेला शहरात तर १७ तारखेला वैजापूर तालुक्यातल्या लोणी खुर्द इथं प्रभातफेरी, प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहेत. १८ तारखेला ही सायकल फेरी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावकडे रवाना होणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...