Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 13
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v विरोधी सदस्यांसह शिवसेनेच्या सदस्यांनी
केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित
v धरण सुरक्षा विधेयक लोकसभेत सादर;
सायबर हल्ले रोखण्यासाठी संकट व्यवस्थापन योजना
v मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू मांडण्यासाठी
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती
v पाण्याचे टँकर तसंच चारा छावण्यांना
तत्काळ परवानगी देण्याचे सामाजिक न्यायमंत्र्यांचे निर्देश
आणि
v औरंगाबाद महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची
मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती
*****
विरोधी सदस्यांसह शिवसेनेच्या सदस्यांनी केलेल्या
गदारोळामुळे संसदेचं कामकाज काल बाधित झालं. काँग्रेसच्या सदस्यांनी राफेल खरेदी चौकशीसाठी
संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत, शिवसेनेच्या सदस्यांनी अयोध्येत राम
मंदीर बांधण्याच्या मुद्यावरून तर अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी कावेरी पाणी वाटपावरुन,
अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन गदारोळ केल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी
कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच
होता. मुष्टीयोध्दा एम सी मेरीकोम हिने जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्याबद्दल,
तसंच अंतराळ संशोधन संस्थेनं सर्वात मोठ्या संचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल,
अध्यक्षांनी या गदारोळातच अभिनंदन प्रस्ताव मांडला. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं, त्यांनी
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
राज्यसभेतही द्रमुक तसंच अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी
कावेरी मुद्यावरुन जोरदार घोषणाबाजी केली. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची
मागणी सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. या मुद्यावर थेट चर्चा करण्याचं
आवाहन त्यांनी केलं. मात्र सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी लावून धरत घोषणाबाजी
सुरू ठेवल्यानं, सभापतींनी कामकाज आधी बारा वाजेपर्यंत, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
आणि त्यानंतरही गदारोळ सुरू असल्यानं, दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
अयोध्येत राम मंदीर लवकरात लवकर बांधण्याच्या मागणीसाठी
शिवसेनेच्या खासदारांनी काल संसद परिसरात महात्मा गांधीच्या प्रतिमेसमोर धरणं आंदोलन
केलं. राम मंदिराच्या मुद्यावर काँग्रेस पक्षानंही आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही
शिवसेनेनं म्हटलं आहे.
****
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी,
लोकसभेत काल धरण सुरक्षा विधेयक २०१८ सादर केलं. धरण अथवा बंधाऱ्यांचं नुकसान होऊ नये,
यासाठी त्याची पाहणी, नियंत्रण आणि देखभाल - दुरुस्तीची तरतूद या विधेयकात करण्यात
आली आहे. हे विधेयक संमत झाल्यावर सर्व राज्यातील धरणं तसंच बंधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी
ते लागू होणार आहे.
****
सायबर हल्ले आणि सायबर दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी
सरकारनं संकट व्यवस्थापन योजना तयार केली आहे. केंद्र तसंच राज्य सरकारांची
सर्व मंत्रालयं, आणि विभागांसाठी ही योजना लागू असणार आहे. माहिती
आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. माहितीची
सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ७६ सुरक्षा परिक्षण संस्थांचं पॅनल तयार केलं असल्याचं
त्यांनी सांगितलं. २०१६ ते २०१८ या कालावधीत हजारोंच्या संख्येनं भारतीय संकेतस्थळं
हॅक करण्यात आल्याचंही प्रसाद म्हणाले.
****
पाच राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान
झाल्याची पावती देणारी यंत्र अयशस्वी झाल्याच्या खूपच कमी घटना घडल्या असल्याचं काल
लोकसभेत सांगण्यात आलं. कायदा आणि न्याय राज्य मंत्री पी. पी. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या
उत्तरात ही माहिती दिली.
****
मध्यप्रदेश आणि राजस्थानातल्या काँग्रेस
पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष राहुल
गांधी यांना दिले आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस
आमदारांच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.
****
मराठा आरक्षणसंदर्भात उच्च न्यायालयात
राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची
नियुक्ती केली आहे. काल मुंबईत झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधीज्ञ
हरीश साळवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव
डी.के. जैन या बैठकीला उपस्थित होते.
****
देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी गो संरक्षणाचा स्वीकार
करण्याची गरज असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं
आहे. नवी दिल्ली इथं काल मुस्लिम गोरक्ष संघाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. आठवले
यांनी या संघटनेला देशातलं ‘क्रांतिकारक पाऊल’ म्हणून संबोधलं असून यामुळे हिंदू आणि
मुस्लिम जवळ येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे आवश्यकतेनुसार पाण्यासाठी
टँकर, चारा छावणी सुरू करण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री
दिलीप कांबळे यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ते काल जळगाव इथं बोलत
होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर तहसील कार्यालयात समन्वयक
अधिकारी नियुक्त करावा तसंच शेतकरी आणि सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे प्रश्न
सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असंही
कांबळे यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता
रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयाला केंद्रीय वन आणि
पर्यावरण मंत्रालयानं स्थगिती दिली आहे. महानगरपालिकेच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत
विभागाचे सचिव मिश्रा यांची भेट घेतली. त्यावेळी तासभर झालेल्या चर्चेअंती मिश्रा यांनी
ही स्थगिती दिली तसंच महानगरपालिकेला नियोजित सफारी पार्कचे काम तातडीने पूर्ण करण्याचे
आदेश दिले.
****
वंशवाद आणि जातीयवाद हा एकच असल्याची जाणीव महात्मा
गांधींना झाली आणि त्यानंतरच गांधीजींनी भारतात अस्पृश्योद्धाराला महत्त्व दिलं असं
मत, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केलं आहे. लातूर इथं आयोजित ग्रंथोत्सव
२०१८ मध्ये 'महात्मा गांधी यांच्या विचारांचे विविध पैलू' या विषयावरील परिसंवादात
डॉ. वाघमारे बोलत होते. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव अमेरिका, फ्रांन्स, इंग्लंड,
अफ्रिका आदि देशामध्ये मोठा प्रमाणावर असून गांधी भारतापेक्षा विदेशातील लोकांनाच अधिक कळले असल्याची खंत त्यांनी
व्यक्त केली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचं
औचित्य साधून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच अन्न सुरक्षा आणि मानके
प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं अन्न आणि औषध प्रशासनानं स्वस्थ भारत सायकल फेरीचं
आयोजन केलं आहे. १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत ही फेरी होणार असून, उद्या १४ तारखेला
ही सायकल फेरी अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथून औरंगाबाद इथं पोहोचणार आहे. १५ तारखेला
औरंगाबाद शहरात तर १७ तारखेला वैजापूर तालुक्यातल्या लोणी खुर्द इथं प्रभातफेरी, प्रबोधनपर
कार्यक्रम होणार आहेत. १८ तारखेला ही सायकल फेरी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावकडे रवान
होईल.
****
लातूर जिल्ह्यातल्या प्रस्तावित महामार्गाच्या दुरुस्तीसाठी
२३ कोटी ४२ लाख रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष बाब म्हणून
निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार गडकरी यांनी हा निधी मंजूर
केला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब उप-अधीक्षक भूमी अभिलेख
कार्यालयातला अभिलेखापाल नेमीनाथ कवडे आणि शिपाई पंढरी वाघमारे या दोघांना २०० रूपयांची
लाच घेताना उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. नगर रचना विभागाचं
टिपण, टोच नकाशा आणि चौकशी उताऱ्याची नक्कल देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती.
****
हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्याबद्दल
विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली विलासराव देशमुख यांना वसंतदादा शुगर
इन्स्टिट्यूटचा “ऊस भूषण” हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०१७-१८ च्या गळीत हंगामात,
पारंपारिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा संगम साधून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवल्याबद्दल
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment