Thursday, 13 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेल्या नऊ जवानांना आज संसद भवन परिसरात अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, तसंच हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

****



 पायाभूत सुविधांच्या विकासानं पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून २०२५ पर्यंत हे उद्दीष्ट नक्कीच साध्य करता येवू शकेल असा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त  केला आहे. काल मुंबईत टाईम्स नेटवर्कतर्फे आयोजित  भारतीय आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते.



 कौशल्याधारित मनुष्यबळाच्या जोरावर हे उद्दिष्ट अधिक उत्तम पद्धतीनं साध्य करता येईल असं ते म्हणाले.

****



 नांदेडहून मुंबईसाठी एक नवीन रेल्वे लवकरच सुरू करणार असल्याचं आश्वासन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले आहेत. ते काल परभणी इथं बोलत होते. यासाठी मनमाड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद इथंही यादव यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकाच्या विकासाला गती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 नाशिक जिल्ह्यात बागलाणमध्ये नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर ओतत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसनंही या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

****



 मराठी साहित्य परिषदेचं कोकण विभागीय साहित्य संमेलन उद्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं सुरू होत आहे. या संमेलनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत, ग्रंथदिंडी, कविसंमेलन, कोकणी लोककलांचं सादरीकरण, परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत.

****



 भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचे दोन सामने होणार आहेत. सायंकाळी पावणे पाच वाजता जर्मनीचा सामना बेल्जियमशी तर सायंकाळी सात वाजता भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे.

*****

***

No comments: