Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 13 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
राफेल खरेदी, राम मंदीर आणि कावेरी
मुद्यावरुन आजही संसदेच्या कामकाजात व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच, विरोधी
सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्यानं, सभापती एम व्यंकय्या
नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसद हल्ला
मोडून काढताना हुतात्मा झालेले आठ जवान तसंच एका कर्मचाऱ्याच्या स्मृतींना अभिवादनाचा
प्रस्ताव मांडला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारताच, काँग्रेस सदस्य राफेलच्या
मुद्यावरून, शिवसेनेचे सदस्य राम मंदिराच्या मुद्यावरून तर अण्णाद्रमुक सदस्यांनी कावेरी
खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, अध्यक्षांनी कामकाज
दहा मिनिटांसाठी स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अध्यक्षांनी, सर्व सदस्यांना
शांतपणे कामकाजात सहभागी होऊन, आपल्या मुद्दे मांडण्याचं आवाहन केलं. मात्र सदस्यांनी
घोषणाबाजी सुरुच ठेवल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं.
कामकाज सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता, अध्यक्षांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा
तास पूर्ण करून, शून्यप्रहर पुकारला. त्यावरही गदारोळ सुरुच राहिल्यानं, अध्यक्षांनी
कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात वीरमरण आलेले आठ जवान आणि एका कर्मचाऱ्याला
आदरांजली अर्पण केली. या जवानांचं शौर्य आणि साहस प्रत्येक भारतीयाला प्रेरित करत राहील,
असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्यप्रदेशात मुख्यमंत्री
निवडीची प्रकिया सुरू असून, तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं लवकरच जाहीर
केली जातील, असं काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी
दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
यासंदर्भात राहुल गांधी आज नवी दिल्लीत बैठक घेत
आहेत. राजस्थानात युवा नेते सचिन पायलट आणि ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी
चर्चेत आहेत, तर मध्यप्रदेशात युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ
यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. मध्यप्रदेशाचे काँग्रेस निरीक्षक ए के
अँटोनी तसंच राजस्थानचे निरीक्षक के सी वेणुगोपाल यांना चर्चेसाठी बोलावल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव आज
तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते दुसऱ्यांदा तेलंगणाच्या
मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. राजभवनातल्या प्रांगणात आज दुपारी दीड वाजता
शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. चंद्रशेखर राव यांच्यासोबत नव्या
मंत्रिमंडळातले काही सदस्यही शपथ घेतील.
****
आपल्या विरुद्ध दाखल फौजदारी खटल्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात
न दिल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली
आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्यावर दाखल दोन
फौजदारी खटल्यांची माहिती दडवल्यामुळे, त्यांची निवड रद्द करावी, अशा आशयाची एक याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
****
भाजीपाला आणि स्वयंपाकाचे पदार्थ स्वस्त झाल्यामुळे, गेल्या
महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर दोन पूर्णांक ३३ शतांशापर्यंत खाली आला. गेल्या
१७ महिन्यातला हा नीचांकीदर
आहे. ऑक्टोबर महिन्यात, औद्योगिक उत्पादन आठ पूर्णांक एक दशांशापर्यंत वाढलं. खनिकर्म, वीज, कारखानदारी या क्षेत्रांची कामगिरी, तसंच
भांडवली आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा चांगला उठाव, यामुळे
ही वाढ झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी हिरे व्यापारी मेहुल
चोकसी विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयच्या मागणीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली. चोकसीनं पंजाब नॅशनल बँकेची सात
हजार कोटी रुपयांची फसवणूक केली असून, या वर्षी जानेवारी महिन्यात त्यानं देशाबाहेर
पसार होत, अँटिगुआचं नागरिकत्व घेतलं आहे.
****
चीनमधल्या ग्वांगझू इथं सुरु असलेल्या, वर्ल्ड टूर
फायनल बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्मानं दुसऱ्या फेरीत विजय मिळवला.
आज झालेल्या सामन्यात त्यानं इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा २१ - १६, २१ - सात असा
पराभव केला. महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा
दुसऱ्या फेरीतला सामना आज तैवानच्या ताई ज्यू यिंग विरुद्ध होणार आहे. काल पहिल्या
फेरीत सिंधूनं जापानच्या अकाने यामागुची हिचा २४ - २२, २१ - १५ असा पराभव केला.
****
ओडिशात भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी
विश्वचषक स्पर्धेत, आज भारताचा उपान्त्यपूर्व फेरीतला सामना नेदरलँडशी
होणार आहे. तर उपान्त्यपूर्व फेरीचा दुसरा सामना बेल्जियम आणि जर्मनी
यांच्यात होईल.
*****
***
No comments:
Post a Comment