Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राफेल
विमान खरेदी, राम मंदीर आणि कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवरून आजही संसदेच्या
कामकाजात व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच, विरोधी सदस्यांनी सभापतींच्या
आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केल्यानं, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी
स्थगित केलं.
लोकसभेतही
काँग्रेस सदस्य राफेलच्या मुद्यावरून, शिवसेनेचे सदस्य राम मंदिराच्या मुद्यावरून तर
अण्णाद्रमुक सदस्यांनी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवरून घोषणाबाजी सुरू
केल्यानं, कामकाजात वारंवार व्यत्यय आला. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्ष
सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
प्रदूषण
पसरवणाऱ्या वाहनांऐवजी पर्यावरण पूरक वाहन निर्मिती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय
परिवहन राज्यमंत्री मनसुखलाल मांडविया यांनी आज लोकसभेत सांगितलं. यासंदर्भात राज्यांशी
चर्चा करुन नियामक प्रणाली तयार केली जात असल्याचं ते म्हणाले. पथकर नाक्यांवर महत्वाच्या
व्यक्तींसाठी वेगळी रांग तयार करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
राजस्थान,
मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं भारतीय
जनता पक्ष विश्लेषण करेल, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी
म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. मध्यप्रदेशात अटीतटीची लढत
होती आणि भाजपनं त्याठिकाणी चांगला लढा दिल्याचं ते म्हणाले.
****
तेलंगणा
राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा
शपथ घेतली. चंद्रशेखर राव यांच्यासोबत काही सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मिझोराममधे
मिझो नॅशनल फ्रंटचे नेते जोरामथांग येत्या शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
****
२०१४
च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे दिली होती, असं मुख्यमंत्री
कार्यालयानं म्हटलं आहे. या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल दोन
गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात
आली आहे, त्यावर हे स्पष्टीकरण देण्यात आलं. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी
अर्ज दाखल करताना, प्रलंबित फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नसल्याबद्दल देवेंद्र फडणवीस
यांची निवड रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं
ही याचिका यापूर्वी फेटाळून लावली असून, सर्वोच्च न्यायालयात योग्य ते उत्तर सादर केलं
जाईल, असं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत दीड कोटी बालकांना
लस देण्यात आली आहे. मुंबईत आज आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली.
या मोहीमेअंतर्गत राज्यभरात दररोज साधारणत: दहा लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट
ठेवण्यात आलं आहे. पालकांनी गोवर-रुबेला लसीबाबत कुठलाही गैरसमज न करता आपल्या मुलांना
लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या कुंटूर इथं येत्या ३० डिसेंबर रोजी सहावं लोकजागर
साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी इंद्रजित भालेराव
यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन असे विविध कार्यक्रम
होणार आहेत.
****
परभणी शहरात आज खंडोबा यात्रेनिमित्त क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. याअंतर्गत
झालेल्या पाच किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत ३५ मुलींसह १५० विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला. व्हॉलिबॉल, जिम्नॅस्टिक, स्केटिंग आदी स्पर्धांनाही आज सुरुवात झाली. तसंच रक्तदान
शिबिरही घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे
महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या तब्बल १४८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली
आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २७ उमेदवारांसह महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी यांचा, तसंच
लोकसंग्रामच्या अनेक उमेदवारांचाही या यादीत समावेश आहे.
****
चीनमधल्या
ग्वांगझू इथं सुरु असलेल्या, वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या
पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत धडक मारली. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात
सिंधूनं तैवानच्या ताई ज्यू यिंग हिचा १४ - २१, २१ - १६, २१ - १८ असा पराभव केला. पुरुष
एकेरीत समीर वर्मानंही आज दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोचा २१ - १६,
२१ - सात असा पराभव करत उपांत्य फेरी गाठण्याची आशा जीवंत ठेवली आहे. पहिल्या फेरीत
समीरला पराभव पत्करावा लागला होता.
****
No comments:
Post a Comment