Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना
अंमलबजावणी संचालनालय ईडीनं कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस बजावली आहे.
या प्रकरणी येत्या गुरुवारी २२ तारखेला ठाकरे यांना ईडी समोर हजर होण्यास सांगण्यात
आलं आहे. ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून,
जोशी आज ईडी समोर हजर झाले आहेत. जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या
व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस
बजावण्यात आल्याचं, मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणूक
काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती, विधानसभा निवडणुकांच्या
काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका, देशपांडे यांनी केली.
****
अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणी
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तीं पैकी,
न्यायमूर्ती एस ए बोबडे आज उपलब्ध नसल्यानं, आज सुनावणी होणार नसल्याचं, न्यायालयानं
सर्व खटल्यातल्या सर्व पक्षांना सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
दररोज सुनावणी होत असलेल्या
या प्रकरणात, रामलल्ला विराजमान या पक्षाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. शुक्रवारी या
पक्षानं आपली बाजू मांडताना, मशिदीपूर्वी या जागेवर मंदीर असल्याचे, १९५० सालच्या पाहणी
समितीच्या अहवालातले पुरावे न्यायालयासोर सादर केले.
****
तहलका मासिकाचे संस्थापक तरूण तेजपाल यांच्या विरोधात
दाखल खटल्यांची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं
गोव्यातल्या कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत. तेजपाल यांच्या माजी सहकारी महिलेने त्याच्या
विरोधात लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे, हे आरोप रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी
तेजपाल याने दाखल केलेली याचिकाच न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठाने रद्दबातल
केली आणि या प्रकरणाची सुनावणी पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणी न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यावर, तेजपालला २०१३ मध्ये अटक करण्यात
आली होती, मात्र मे २०१४ पासून तो जामीनावर आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
काल भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले. येत्या २३ तारखेला पंतप्रधान, संयुक्त
अरब अमिरात आणि बहारिन या देशांच्या तीन दिवसाच्या दौऱ्यांवर जाणार आहेत. संयुक्त अरब
अमिरातच्या दौऱ्यात पंतप्रधानांची राजकुमार शेख मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांच्याशी
भेट होईल. या भेटीत द्वी-पक्षीय, प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय परस्पर संबंधावर चर्चा
होईल.
****
भारताकडून शस्त्रसंधीचं
उल्लंघन होत असल्याचं कारण देत, पाकिस्तान सरकारनं पाकिस्तानातले भारताचे उच्चायुक्त
गौरव अहलुवालिया यांना समन्स बजावलं आहे. अशा प्रकारे समन्स बजावण्याची पाकिस्तानची
ही चौथी वेळ आहे. अठरा ऑगस्टला भारतानं केलेल्या
शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा पाकिस्तान निषेध करतो, असं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं
म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर मधली परिस्थिती हळूहळू निवळत आहे.
श्रीनगर जिल्ह्यातल्या एकशे नव्वद प्राथमिक शाळा आज पुन्हा सुरू झाल्या. बहुतांश शिक्षक
शाळेत उपस्थित होते, मुलांची उपस्थितीत मात्र तुरळक आहे. काश्मीर खोऱ्यातल्या पन्नास
पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातले निर्बंध कालपासून शिथील करण्यात आले असून, या भागात
काहीही अप्रिय घटना घडली नसल्याचं, शासकीय प्रवक्ते रोहित कंसल यांनी सांगितलं. श्रीनगर
शहरात अनेक भागात दूरध्वनी सेवा बहाल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
विधान परिषदेच्या
औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जालना
जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयात मतदान सुरू असून, जालना तहसील कार्यालयातल्या
एकूण ७७ मतदारांपैकी ३४ मतदारांनी आतपार्यंत मतदान केलं आहे. शिवसेना भाजप युतीकडून
अंबादास दानवे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी या दोन प्रमुख
उमेदवारांमध्ये मुख्य लढत होत आहे.
****
बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला
आजपासून स्वित्झर्लंडमध्ये सुरुवात होत आहे. आज भारताच्या साईप्रणीतचा सामना कॅनडाच्या
जेसन अँथनी याच्याशी तर एच एस प्रणॉयचा सामना फिनलँडच्या ईटू एन्टी ओस्करी हायनो याच्याशी
होणार आहे. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या हॉकी ऑलिम्पिक
चाचणी स्पर्धेत काल भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेला सामना दोन-दोन
अशा बरोबरीत सुटला तर, भारताच्या पुरुष संघाला काल न्यूझीलंडनं दोन एकनं पराभूत केलं.
देशाच्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतील आपापला प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून
भारतीय महिला संघाचा उद्या चीनसोबत सामना होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment