Monday, 19 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं आज मदत जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पूरग्रस्त भागात एक हेक्टर क्षेत्राच्या नुकसानावर पूर्ण कर्ज माफ करण्यात येणार असून, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पडलेली किंवा धोकादायक असलेली घरं, प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे बांधून दिली जाणार असून, केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय राज्यसरकारकडून एक लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. घर बांधून होईपर्यंत सुमारे वर्षभराच्या कालावधीसाठी संबंधित कुटुंबांना घरभाडे दिले जाणार असून, ग्रामीण भागात २४ हजार रुपये, शहरी भागात ३६ हजार रुपये घरभाड्यापोटी दिले जाणार आहेत. घर बांधणीसाठी पाच ब्रास वाळू आणि पाच ब्रास मुरुम मोफत दिला जाणार असून, बाधित कुटुंबांना पुढचे तीन महिने सरकारकडून धान्य पुरवठा केला जाणार आहे. या मदतीसाठी बाधित कुटुंबांकडून सध्या कागदपत्रांची अपेक्षा केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले....

आता लोकांजवळ समजा पाऊस असल्यामुळे जर लोकांना कागद पत्र मागितली तर ती देऊ शकणार नाही, म्हणून आम्ही लिब्लर त्यासदंर्भात आहोत  अपेक्षा अशी आहे की, कोणी बोगसपणा करु नये, जर कोणी बोगसपणा केला तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
छोट्या व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दुधाळ जनावरांच्या नुकसानाची भरपाई सरपंच तलाठी किंवा दूध संघांच्या शिफारशीवरून केली जाईल, जनावरांच्या गोठ्यांसाठीही सरकारकडून अर्थसहाय्य केलं जाणार आहे. बालभारती सगळ्या विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकं पुरवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
व्यापाऱ्यांना आयकर भरण्याची मुदत वाढवून द्यावी, कर्जपरतफेडीसाठी सहा महिने मुदत द्यावी, तसंच वस्तू सेवा करातूही व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

गावं दत्तक घेणाऱ्या खासगी संस्थांनी, विद्युतीकरण पाणी पुरवठा आदी सुविधा उभारण्यातही सहभाग घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
पुराची कारणं, झालेलं नुकसान आणि ही परिस्थिती टाळण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, याचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
धुळे जिल्ह्यात काल झालेल्या बस अपघातातल्या मृतांच्या वारसांना, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार दहा लाख रुपये मदत करण्यात येईल, असं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. काल रात्री झालेल्या या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये तर जखमींना एक हजार रुपये मदत देण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना रावल यांनी वैयक्तिक दहा हजार रुपये मदत केली आहे.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला आज मराठवाड्यात पैठण इथून प्रारंभ झाला.  पक्षाचे नेते अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांनी, संत एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन या 'शिवस्वराज्य यात्रेची' सुरुवात केली. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले, हे सरकार प्रचंड असंवेदनशील असल्याची टीका अजित पवार यांनी केली. सरकारविरोधातल्या रागाचं मतांमध्ये परिवर्तन करून समाजपरिवर्तन करावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अवैध कीटकनाशकाच्या कारखान्यावर छापा मारून गोदाम सील करण्यात आलं आहे. कृषी विभागानं आज ही कारवाई केल्याचं, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी ही माहिती दिली. बिडकीन पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केल्याचं, गंजेवार यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ९८ पूर्णांक ४८ टक्के मतदान झालं. एकूण ६५७ मतदारांपैकी ६४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचं निवडणूक विभागानं कळवलं आहे. शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत आहे. मतमोजणी येत्या गुरुवारी २२ तारखेला होणार आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 03 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...