Friday, 3 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यासाठी बँकांच्या आर्थिक प्रशिक्षण केंद्रांनी येत्या एक एप्रिलपासून विशेष प्रशिक्षण शिबीर घेण्याचे निर्देश भारतीय रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. यूपीआय तसंच यूएसएसडी ‘* 99 #’ या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचं प्रशिक्षण देणारी ही शिबीरं वर्षभर राबवण्याच्या सूचना रिजर्व्ह बँकेनं दिल्या आहेत. याशिवाय, बँकांनी शेतकरी, छोटे उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसहायता गट तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी बँकेचं दैनंदिन कामकाज संपल्यानंतर शिबीर घेऊन डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन करावं, असंही रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

****

काळ्या पैशाच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास दल - एसआयटीनं देशभरातून आतापर्यंत ७० हजार कोटी रुपये एवढ्या काळ्या पैशाचा शोध लावला आहे. एसआयटीचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी कटक इथं तपास दलाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती दिली. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला आपला सहावा अहवाल सादर करणार आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी समितीनं काही सूचना सुचवल्या असल्याचंही अरिजित पसायत यांनी सांगितलं.

****

पाकिस्ताननं भारताविरूद्ध दहशतवादी गट उभे केले आणि आता दहशतीचा हा भस्मापूर पाकिस्तानवरच उलटला असल्याचं, संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी अजीत कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल जिनिव्हा इथं मानवी हक्क परिषदेच्या ३४ व्या अधिवेशनात बोलत होते.

****

जम्मू काश्मीरमधल्या बारामुला जिल्ह्यात आज सुरक्षा बलाच्या जवानांनी जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या २ दहशतवाद्यांना पकडलं. त्यांच्याकडून दोन पिस्तुलं हस्तगत करण्यात आली.

****

त्तीसगडमध्ये बीजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिस दलात झालेल्या चकमकीत दोन पोलिस जवान ठार झाले. आज सकाळी ही चकमक सुरू झाली.  

****

खेड्याला सक्षम करण्याची ताकत असलेल्या सहकार क्षेत्राचं शुद्धीकरण गरजेचं असून चाचणी लेखा परीक्षणात आक्षेपार्ह, संशयास्पद बाबी आढळल्यास त्याबाबतची माहिती लेखा परीक्षकांनी ३१ मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात शेतकऱ्याचा आधारस्थान असलेल्या बाजार समित्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि इतर सहकारी संस्थांचा कारभार अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्व कार्यपद्धतीवर प्रभावी नियंत्रण ठेवावं, तसंच सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षण दोष दुरुस्ती अहवालात गंभीर दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

****

शासनाच्या विविध विकासकामांची माहिती लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीकोन ठेवत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमांची मोलाची भूमिका असल्याचं प्रतिपादन जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केलं आहे. मुंबईतील पत्र सूचना कार्यालय आणि जालना जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसार माध्यमांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनासाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निर्माण होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली असल्याचं ते म्हणाले.

****

विश्व शांती केंद्र माईर्स एम आय टीच्या वतीनं देण्यात येणारा भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव पुरस्कार मुंबई दूरदर्शन केंद्राचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना जाहीर झाला आहे. उद्या चार मार्चला पुणे इथं राष्ट्रीय रोबोकोर्न स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

****

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या नळवंडी इथं आज आणि उद्या माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्याबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात विविध स्पर्धा तसंच, आरोग्यविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी संपर्क आणि शोध अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद तालुक्यात जयपूर, करंजगाव, नारेगाव, परिसरात जनतेशी संवाद साधून, उद्या गंगापूर तर परवा वैजापूर मार्गे ही अभियान यात्रा येत्या मंगळवारी मुंबईत पोहोचेल. मंगळवारी राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या अभियान यात्रा मुंबईत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.

//*******//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...