Friday, 17 March 2017

TEXT - AIR News Bulletin, Aurangabad 17.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

विधीमंडळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आजही गाजला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या निवेदनावर टीका करत, सरकारनं शेतमालाला हमीभाव पन्नास टक्के वाढवून दिला असता, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असं म्हटलं. कर्जमाफी दिल्यावर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, याची हमी विरोधक देतात का, असं मुख्यमंत्री काल आपल्या निवेदनात म्हणाले होते. याच मुद्यावर पुढे बोलत मुंडे यांनी, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यसभेत केलेल्या विधानाचा संदर्भ देत, केंद्राशी चर्चा करणार असल्याचं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

****

गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित न केल्याचा मुद्दा काँग्रेसचे खासदार दिग्विजयसिंह यांनी राज्यसभेत शून्यप्रहरात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपसभापतींनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. 

****

सर्व खासदारांनी आपापल्या क्षेत्रातल्या बालगृहांना अचानक भेटी देऊन पाहणी करावी, असं आवाहन महिला बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी केलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी अनाथाश्रमात तसंच बालगृहात बालकांचं होणाऱ्या शोषणाला प्रतिबंध करण्यासंदर्भात प्रश्न विचारला, त्या प्रश्नाच्या उत्तरात गांधी यांनी हे आवाहन केलं.

****

देशाचं संरक्षण हा राजकीय पक्षांनी परस्परांवर टीका करण्याचा विषय नसल्याचं, संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

लोकसभेत आज संरक्षण मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देताना, ते बोलत होते. या विषयावर पक्षांतर्गत राजकारण बाजूला ठेवून, चर्चा व्हावी, असं जेटली म्हणाले.

****

दहशतवादासंबंधी संयुक्त राष्ट्र संघानं घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणारे देश आणि संघटनांवरुद्ध कारवाई केली पाहिजे, असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं दहशतवादाचा सामना करण्यासंबंधी आयोजित संमेलनात ते बोलत होते. समुद्रामार्गे होणारा व्यापार आणि दळणवळणावर एकत्रित लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटीच्या सर्व मसुद्यांना जीएसटी परिषदेनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या एक जुलैपासून या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्ली इथं जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. जीएसटी परिषदेची पुढची बैठक ३१ मार्चला होणार आहे.

****

राष्ट्रीय आरोग्य धोरण प्रगतिकडे वाटचाल करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यातून स्वस्थ भारत निर्माण होईल, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.  

दरम्यान, पंतप्रधान येत्या २६ मार्चला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या श्रृंखलेचा हा तिसावा भाग असेल. नागरिकांनी आपले विचार आणि सूचना येत्या २२ मार्चपर्यंत माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नरेंद्र मोदी ॲपवर सांगाव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

उत्तराखंडमध्ये विधिमंडळ नेता निवडीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात नवनियुक्त आमदारांची बैठक उद्या लखनऊ इथं होणार आहे. यानंतर उत्तर प्रदेशच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे. 

****

राज्यात आज अनेक ठिकाणी रंगपंचमीचा सण साजरा केला जात आहे. अहमदनगर इथं भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढीच्या यात्रेला आज रंगपंचमीपासून सुरुवात झाली. कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकल्यानंतर इतर मानाच्या काठ्या टेकवण्याची प्रथा आहे. त्यांनतर त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. या यात्रेसाठी भटक्या समाजाचे सर्व लोक एकत्र येतात. 

****

पैठण इथल्या नाथषष्ठी महोत्सवात कालाष्टमी उत्सवानिमित्त २० मार्च रोजी औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादिवशी औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. मात्र परवा रविवारी १९ मार्चला बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार असल्याचं रुग्णालयातर्फे कळवण्यात आलं आहे.

//**//**//




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...