Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 17 August 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
खाण कंपन्यांनी कामगार आणि त्यांच्या
कुटुंबियांच्या कल्याणासाठी धोरण तयार करावं, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. नवी दिल्ली इथं खाण क्षेत्राशी संबंधित २०१३ आणि २०१४चे राष्ट्रीय पुरस्कार आज
राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खाणींमध्ये होणाऱ्या
दुर्घटनांना आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा प्रणाली विकसित करण्याची, तसंच खाणकाम करताना
पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त
केली.
****
सर्वोच्च न्यायालयानं आज मालेगाव
बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितच्या जामीन अर्जावरचा निर्णय राखून
ठेवला. पुरोहितच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात
बाजू मांडली. राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं पुरोहितच्या विरोधात सबळ पुरावे असल्यामुळे
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवावा, असं सांगत, त्याच्या जामिनाला विरोध केला.
या प्रकरणातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहितच्या
जामिनाची मागणी होत आहे. एनआयएची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप साळवे यांनी यावेळी
केला. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात
सात जणांचा मृत्यू झाला होता.
****
ऊर्जेची बचत करणारे एलईडी दिवे,
ट्यूबलाईट आणि पंख्यांची विक्री आता देशभरातल्या पेट्रोलपंपावर करण्यात येणार आहे.
ग्राहकांना एलईडी दिवे ७० रुपयांना, ट्यूबलाईट २२० रुपये आणि पंचतारांचे मानांकन असलेले
पंखे बाराशे रुपयात खरेदी करता येणार आहेत. पेट्रोल पंपांच्या माध्यमातून, उजाला ऊर्जा
कार्यक्षम उपकरणांच्या वितरणासाठी इ एस एलनं इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि
भारत पेट्रोलियम महामंडळ लिमिटेड या तीन विपणन कंपन्यांशी सामंजस्य करार केला. या तीन
तेल विपणन कंपन्यांचे ५३ हजारांहून अधिक पेट्रोल पंप असून, येत्या सहा महिन्यांत देशभरात
ही इलेक्ट्रॉनिक उत्पादनं उपलब्ध होतील, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र
प्रधान यावेळी म्हणाले.
****
आयकर विभागानं राष्ट्रीय जनता
दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती आणि त्यांच्या पतीला बेनामी
मालमत्तेप्रकरणी आज पुन्हा एकदा समन्स जारी केलं. येत्या सोमवारी त्यांना चौकशीसाठी
उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या
कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आयकर विभागानं दिल्ली आणि आसपासच्या परिसरात छापे घातले
होते.
****
राज्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या
बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची
अंमलबजावणी लवकरच होईल, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली तर सरकार त्याला
तोंड देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
****
आघाडी काळात महाराष्ट्र राज्य
रस्ते महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध
आमदार अनिल गोटे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. या विषयाला आपण औचित्याचा
मुद्दा उपस्थित करुन वाचा फोडली होती, असंही त्यांनी सांगितलं. मोपलवारांच्या नेतृत्वाखाली
सनदी अधिकाऱ्यांनी वेगेवगळ्या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन भ्रष्ट
मार्गानं बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याबाबत आपल्या तक्रारीवरुन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक तपास करण्याचे आदेश दिल्याची माहिती गोटे यांनी
यावेळी दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी
सामुहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांचा जवाब नोंदवला जावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च
न्यायालयानं आज फेटाळली. आरोपीच्या वकिलांनी ही याचिका केली होती. मात्र सत्र न्यायालयात
हा खटला सुरु असताना वेगळ्या सुनावणीची गरज नाही, असं न्यायालयानं सांगितलं.
****
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय
होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पश्चिम बंगाल आणि बंगालच्या उपसागरात वातावरणाच्या
वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. या बदलामुळे पावसाचा जोर वाढेल
आणि राज्याला गेल्या १५ दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज
हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या २४ तासात कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस
पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं
वातावरण आहे.
****
सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार शुआई पिंग महिला दुहेरीच्या उपान्त्य
फेरीत पोहोचल्या आहेत. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार क्रोएशियाचा
इवान डोडीग आज स्पर्धेला सुरुवात करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment