Friday, 15 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 15.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१५ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

स्वच्छता हीच सेवा अभियान आजपासून राबवण्यात येणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथून या अभियानाला सुरुवात करणार आहेत. येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला या अभियानाचा समारोप होणार आहे. या कालावधीत देशभरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी काल यासंदर्भात आढावा बैठक घेत, स्वच्छता हीच सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले.

****

औरंगाबाद महापालिकेनं नागरिकांच्या सोयीसाठी विज भारनियमन विचारात घेऊन पाणीपुरवठ्याचं वेळापत्रक निश्चित करावं असं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे. शहरातला पाणीपुरवठा भारनियमनामुळे विस्कळीत झाला असून, अनेक ठिकाणी चार - पाच दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी केली होती. तसंच खासदार चंद्रकांत खैरे यांनीही महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

****

समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी अधिक प्रयत्नशील रहावं, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. वंचित घटकासाठी करावयाच्या उपाय योजनाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. समाजातल्या वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी इथं काल स्वच्छ भारत अभियनांतर्गत राज्यस्तरीय पथकानं शहरातल्या विविध भागांची पाहणी केली. उघड्यावर शौचापासून मुक्ती मोहिमेअंतर्गत झालेल्या या पाहणीत सार्वजनिक ठिकाणांसह शैक्षणिक संस्थांमधल्या स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. शौचालय बांधकाम योजनेच्या लाभार्थ्यांशीही पथकानं चर्चा केली.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत सात दिवस वाढ करण्यात आली आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काल ही माहिती दिली. आता शेतकऱ्यांना येत्या २२ सप्टेंबर पर्यंत कर्जमाफीचे अर्ज दाखल करता येणार आहेत.

****

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर हजर व्हावं, असं आवाहन महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद - सिंघल यांनी केलं आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून, त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती सिंघल यांनी दिली. त्या काल मुंबईत बोलत होत्या.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...