आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
‘ईद उल फित्र’ अर्थात रमजान ईदचा सण आज देशभर साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण समाजातला बंधुभाव
वृद्धिंगत करेल, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे, तर उपराष्ट्रपतींनी
आपल्या संदेशात, हा सण देशात शांतता, सद्भाव आणि समृद्धी प्रस्थापित करेल, असं म्हटलं
आहे. हा सण समाजात एकता आणि सद्भावनेला चालना देईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आध्यात्मिक
शुद्धी प्राप्त करून देणाऱ्या पवित्र रमजान महिन्यानंतरचा हा सण प्रेम आणि बंधुभावाचा
संदेश देतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रमजान ईदनिमित्त आज औरंगाबाद इथं छावणी
तसंच रोजाबाग इथल्या इदगाह मैदानांवर सकाळी साडे नऊ वाजता, तर उस्मानपुरा भागात सकाळी
दहा वाजता ईद निमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली.
****
समाजातील प्रत्येकानं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
करण्याची गरज असून या सन्मानातूनच भविष्यातल्या पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल,
असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
मुंबई इथं काल जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित
चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिले, त्यांची
देखभाल करणं त्यांचा आदर, सन्मान करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात
नाशिक - दिल्ली विमान सेवा सुरु झाली आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी
बी राधाकृष्णन यांच्या हस्ते ओझरच्या विमानतळावर या सेवेला प्रारंभ करण्यात आला. आठवड्यातून
तीन दिवस ही विमासेवा उपलब्ध असेल.
****
लातूर शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी
भारतीय जनता पक्षाचे शैलेश गोजमगुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल या निवडीची
घोषणा महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment