Saturday, 16 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०१८ दुपारी १.०० वा.

****

 ‘ईद उल फित्र’ अर्थात रमजान ईदचा सण आज देशभर आनंदात साजरा होत आहे. औरंगाबाद इथं छावणी तसंच रोजाबाग इथल्या इदगाह मैदानांवर सकाळी साडे नऊ वाजता, तर उस्मानपुरा भागात सकाळी दहा वाजता ईद निमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. हिंगोली शहरातल्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मालेगाव इथं १८ ठिकाणी तर नाशिक शहरात गोल्फ क्लब मैदान इथं नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर शहरातले शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

****



 जम्मू काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळच्या चकमकीत एक जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, सुरक्षा दलं आणि  आंदोलकांमधील चकमकित एक जण काश्मीरमध्ये ठार झाला.

****



 सामाजिक कार्यकरत्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित परशुराम वाघमारे हाच लंकेश यांचा मारेकरी असल्याची माहिती तपास करणाऱ्या विशेष पथकानं दिली आहे. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी या तिघांचीही हत्या एकाच हत्यारानं झाल्याचंही पथकानं म्हटल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

****



 अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यासाठी पदोन्नतीत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व विभागांना आणि सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. या संदर्भात अंतिम निर्णय होई पर्यंत या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली असल्याच्या पार्श्चभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून  हे निर्देश देण्यात आले. या पदोन्नतीवर सर्वोच्च न्यायालयाचे भविष्यातले आदेशही लागू होतील, असं पदोन्नती देताना स्पष्ट करावं, असंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे.

****



 उद्योगपती विजय मल्ल्यानं कमीतकमी दोन लाख पौंड भारतीय बँकांना द्यावे, असे आदेश ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. आपल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी १३ भारतीय बँकांनी मल्ल्या विरोधार ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढा दिला, त्यावेळी झालेल्या खर्चापोटी ही रक्कम त्यांना देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****



 देशाच्या निर्यातीत यावर्षी मे महिन्यात २० पूर्णांक एक आठ टक्क्यांनी वाढ झाली असून, निर्यात २८ अरब ८६ कोटी डॉलर इतकी झाली आहे. इंजिनिअरिंग सामान, पेट्रोलियम उत्पादनं, आणि औषधांमध्ये सर्वोच्च निर्यात वृद्धी दर नोंदवण्यात आल्याचं वाणिज्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

****



 बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबिन पिकाची पेरणी करताना काळजी घेण्याचं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पेरणी संदर्भात काही सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

****



 राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान या नावानं तीन व्याज परतावा योजना आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची तंत्रकौशल्य योजना राबवण्यात येत आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मागास समाजातल्या तरुणांसाठी व्याज परताव्याच्या तीन योजना असून, यात बँके तर्फे स्वयंरोजगार उभारणी करता देण्यात येणार्या कर्ज रक्कमेवरील १२ टक्के पर्यंतचा व्याजाचा परतावा हा महामंडळाकडून देण्यात येणार आहे. दुसऱ्या योजनेत बचत गट, संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी यांना गट कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येणार आहे. तिसरी योजना शेतकरी उत्पादक गटांसाठी असून गट प्रकल्प कर्ज योजनेतून बिनव्याजी दहा लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर याची अधिक माहिती प्राप्त होईल.

****



 कैलास मानसरोवर यात्रेसाठी भाविकांचा पहिला जत्था आज सिक्कीमची राजधानी गंगटोक इथून रवाना होणार आहे. ३४ भाविक नथुला इथून चीनच्या सीमेपर्यंत बसने प्रवास करतील. सिक्कीम सरकारनं हवामानाच्या स्थितीनुसार प्रवाशांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

****



 येत्या २१ तारखेला साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त आज पासून औरंगाबाद इथं आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी या सप्ताहाची सुरुवात विभागीय क्रिडा संकुल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भारतीय क्रीडा प्राधिकरण- साई संस्थेत केंद्रात सुर्यनमस्कारानं करण्यात आली.

****



 युएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामनं पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यानं दक्षिण कोरियाच्या हियो क्वांग याचा २१- १८, २१- १२ असा पराभव केला. उपांन्त्य फेरीत आज त्याचा सामना थायलंडच्या फेतप्रतब याच्या विरुद्ध होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...