आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
नीती आयोगाच्या प्रशासकीय
मंडळाची चौथी बैठक आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती
भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
विविध क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण धोरणांच्या अंमलबजावणी संदर्भातल्या चर्चेसाठी आयोजित
ही बैठक सफल होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचं उत्पन्न
दुप्पट करण्यासाठीच्या उपाययोजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय
पोषण आहार, इंद्रधनुष, इत्यादी मोहिमांची अंमलबजावणी तसंच विकासोत्सुक
जिल्ह्यांचा विकास आणि महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती
सोहळ्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल.
****
जम्मू काश्मीरमधल्या शोपियान
जिल्ह्यात ड्रेन्झ इथं काल संध्याकाळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या
गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले. या दोघानांही उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आलं
असून, कथित दहशतवाद्यांनी या दोघांकडील मोबाईल फोन घेतले असल्याचं, तसंच
हे दाघं कोणत्याही राजकीय गटाशी संबंधित नसल्याचं सुरक्षा
दल सूत्रांनी सांगितलं.
****
जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात वाकडी इथं अल्पवयीन
मुलांना मारहाण केल्या प्रकरणी अजित तडवी आणि शकूर तडवी या दोघांना पहूर पोलिसांनी
अटक केली असून, आता या प्रकरणातल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी काल वाकडी गावाला भेट देऊन, मारहाण झालेल्या मुलांना प्रत्येकी एक लाख
रूपयांची आणि वैयक्तिक २५ हजार रूपयांची मदत जाहीर केली. ही घटना निंदनीय असून त्याचं
राजकारण करू नका, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
त्यानंतर औरंगाबाद इथं बोलताना, आठवले यांनी, मागासवर्गीयांवर
होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा संबंध भारतीय जनता पक्षाशी जोडणं योग्य नसल्याचं
नमूद केलं. मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते,
सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जालना इथं सहायक पोलिस निरीक्षक सुनिल काकडे याच्यासह
दोघांना काल लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एका प्रकरणातून सोडवण्यासाठी आरोपीकडून
दहा हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
*****
***
No comments:
Post a Comment