Saturday, 8 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

८ सप्टेंबर  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा अध्यक्षस्थानी राहतील अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारच्या सत्रात बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची प्रथमच बैठक होत असून, वाजपेयी यांच्या सिद्धांतानुसार पक्ष काम करत राहील असं हुसैन यांनी नमूद केलं.

****



 २०३० सालापर्यंत देशातलं प्रत्येक वाहन हे विजेवर चालेल यादृष्टीनं सर्व विभाग काम करत असल्याचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. वैश्विक मोबिलीटी शिखर संमेलनात ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते. देशभरात ६० हजार गॅस केंद्र असून, प्रत्येक केंद्रावर चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****



 राजे उमाजी नाईक अर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं काल आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंती महोत्सवात ते बोलत होते.

****



 भाजपाचे आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन बाळगून का आहेत, असा सवाल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांन केला आहे. दरम्यान, राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तत्याव्याबद्दल त्यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी पाटील यांनी कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे, की नाही याबाबत खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. मतदार यादीतल्या नावांमध्ये दुरूस्ती, नाव समाविष्ट करणं, वगळणं आदी प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू असून प्रारूप मतदार यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती तपासून मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...