Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 8 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
अनेक प्राचिन करार आणि महाकाव्य
डिजिटल स्वरुपात रुपांतरित केल्यास तरुण पिढीसोबतचे त्यांचे संबंध अधिक दृढ होऊन तरुण
पिढीला त्याचा मोठा फायदा होईल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
शिकागोमध्ये होत असलेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेसमध्ये दिलेल्या संदेशात ते
बोलत होते. भारतीय अमेरिकन नागरिक भारत बराई यांनी पंतप्रधान मोदी यांचा संदेश या परिषदेत
वाचून दाखवला. अधिक लोकांना हिंदू धर्मशास्त्र तत्वज्ञानाशी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा
अधिक वापर करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. आपल्या प्राचिन ज्ञानाच्या संपत्तीच्या
जोरावर भारत जगाशी अधिकाधिक कसा संबंध वृद्धींगत करू शकतो, याबाबतही या परिषदेत चर्चा
व्हायला हवी, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी झेक प्रजासत्ताक
देशातल्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे.
ते काल झेकची राजधानी प्रागमध्ये भारत-झेक व्यापार परिषदेत बोलत होते. भारत आणि झेक
दरम्यानच्या संरक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन निर्मिती आणि व्यापार क्षेत्रामध्ये अधिक
संबंध मजबूत करण्याबरोबरच दहशतवादासारख्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. चौथ्या
औद्योगिक क्रांतीचा लाभ घेण्यासाठी भारत आणि झेक कंपन्यांनी एकत्रितरित्या काम करण्याची
आवश्यकता असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही काळाची गरज असल्याचं
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदिप पुरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं आज मूव्ह या पहिल्या जागतिक मोबिलिटी परिषदेत ते बोलत होते. देशात शहरीकरण वेगानं
वाढत असून, चांगली वाहतूक सुविधा असणं महत्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. चांगली
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवण्याच्या दिशेनं ठराविक धोरण विकसित करण्यावर सरकार
काम करत असल्याचं पुरी यांनी सांगितलं. मोबिलिटी परिषदेचा आज समारोप होणार आहे.
****
भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापारासंबंधीच्या
अडचणी सोडवून आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सखोल चर्चा करण्यात
आली. नवी दिल्लीमध्ये काल याबाबत दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापार विभागांदरम्यान एक
बैठक पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचं प्रतिनिधीत्व अनुप वाधवा यांनी केलं तर अमेरिकन
शिष्टमंडळाचं प्रतिनिधीत्व गिलबर्ट कपलान यांनी केलं. भारताच्या २९ वस्तूंवर जकात शुल्क
वाढवण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. आज सकाळी ही चकमक
झाली. मध्यरात्रीच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिस चौकीवर हल्ला केला, त्यानंतर ही
चकमक सुरु झाली.
****
नागरिकांनी आपल्या तक्रारींकरता कायदेशीर प्रक्रियेचं
पालन न करता आणि त्यासाठी ठरवलेला क्रम लक्षात न घेता थेट देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान,
किंवा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणं अयोग्य आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त
केलं आहे. जानेवारी २०१८ मध्ये पुण्यात भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचारातल्या कथित
पीडित व्यक्तींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान
न्यायालयानं ही टिप्पणी केली. याचिकाकर्त्यानं न्यायालयात दाद मागण्यापूर्वी थेट राष्ट्रपती,
पंतप्रधान, आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनाला
आली असून हे केवळ लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी केलं असावं असं न्यायालयानं म्हटलं
आहे
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान ओव्हल इथं सुरु असलेल्या पाचव्या
आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सात बाद १९८ धावांवर सुरु करणार आहे. दुपारी
साडे तीन वाजल्यापासून खेळाला सुरुवात होईल. जोस बटलर ११, तर
आदिल रशिद चार धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा
सलामीवीर अॅलिस्टर कूकचा हा कारकिर्दीतला शेवटचा सामना असून, त्यानं
संस्मरणीय अर्धशतकी खेळी केली. भारताच्या इशांत शर्मानं तीन, तर
जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद घेतले. दरम्यान,
पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं या आधीच तीन
- एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या हिमा दास
ला आसाम सरकारनं क्रीडा दूत नेमलं असून
त्या स्वरुपाचं पत्र
मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल गुवाहाटी इथं सुपूर्द केलं. हिमा
दासला एक कोटी ६०
लाख रुपयांचा धनादेशही प्रदान करण्यात
आला. देशात खेलो इंडिया उपक्रम खूपच यशस्वी होत असल्याचं सोनोवाल
यावेळी म्हणाले. यापूर्वी आसाम सरकारच्या वतीनं हिमा दास हिचं विमानतळावर स्वागत
करण्यात आलं. हिमा दासनं आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment