Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 8 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ८ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
संविधानानं
दिलेले अधिकार आणि हक्क लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांनी केलं आहे. पुणे इथं आज भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ.पतंगराव
कदम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित डॉ.पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेत
ते “रुल ऑफ जस्टीस” या विषयावर बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च
न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
नरेश पाटील, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम उपस्थित
होते. लोकशाही व्यवस्थेचा गौरव करताना सरन्यायाधीशांनी यावेळी मुलभूत हक्क आणि स्वातंत्र्य
या मूल्यांविषयी व्यापक विश्लेषण केलं. महाराष्ट्र शासन हे अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त,
महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आदी वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना
राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी
म्हणाले. गुणवंतांना शिक्षण, बेघरांना घरं, बेरोजगारांना रोजगार, भूमिहिनांना जमिनी
आणि उद्योजकांना सवलती हे धोरण अंगिकारल्यामुळे राज्य देशात अग्रेसर असल्याचंही त्यांनी
नमूद केलं.
****
अनुसूचित
जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या दुरुस्त्यांविरोधात आयोजित भारत बंद
म्हणजे काही राजकीय पक्षांतर्फे काही समाजविघातक संघटनांच्या असंतोषाचा एक अल्पसा देखावा
असल्याचं मत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. ते आज पाटणा इथं बोलत
होते. नरेंद्र मोदी सरकारनं कोणताही नवीन असा कायदा केलेला नसून फक्त २९ वर्षापूर्वीच्या
कायद्याच्या तरतूदी पुन्हा कायम केल्या असल्याचं पासवान म्हणाले.
****
भारत
हा स्वच्छ आणि हरित इंधन पुरवठ्याचं जाळं निर्माण करण्यासाठी तयार असल्याचं पेट्रोलियम
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित जागतिक मोबिलीटी
शिखर परिषदेत बोलत होते. देशाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
ही केंद्रस्थानी असावी असे मत व्यक्त करत, तरुण पिढीची स्वत:ची गाडी घेण्यापेक्षा सार्वजनिक
वाहतूक व्यवस्थेमधून सवारी करण्याकडे कल निर्माण होत असल्याचं प्रधान यावेळी म्हणाले.
****
स्वच्छता
अभियानाअंतर्गत चार हजार ४७२ कोटी रूपये निधीतून ६० लाख शौचालयं बाधणारं महाराष्ट्र
राज्य देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता
मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. औरंगाबाद इथं आज राज्य शासनाचा ‘संत तुकडोजी महाराज
स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय पुरस्कारां’चं वितरण लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगर
जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावाला, व्दितीय पुरस्कार सातारा जिल्ह्यातल्या मन्याचीवाडी
आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या ग्रामपंचायतींना विभागून तर तिसरा पुरस्कार
रायगड जिल्ह्यातल्या धाटाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजगड ग्रामपंचायतीला प्रदान
करण्यात आला. औरंगाबाद तालुक्यातल्या लाडसावंगी गावात ‘स्वच्छता आणि आरोग्य विषयक जनजागृती’
केल्याबद्दल, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा लोणीकर यांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.
****
धनगर
समाजाच्या आरक्षणासंदर्भात तसंच सोलापूर विद्यापीठ नामांतरण मागणीसाठी झालेल्या आंदोलनातल्या
आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं राज्याचे
मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर समाज आरक्षणासंबंधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा
अहवाल आला असून, एकाचवेळी कायदेशीर आणि राज्य शासन स्तरावर जी कारवाई अपेक्षित आहे,
ती केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
इंधन
दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीनं आज औरंगाबाद शहरातल्या विविध पेट्रोल पंपांवर वाढत्या
इंधन दराचा आलेख असलेले ‘हेच का अच्छे दिन’ असे फलक लावून आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर ९१ रूपये लिटर तर डिझेलचा
दर ७८ रूपये आणि गॅसचा दर ८५० रूपये असल्याचं सांगून, या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे
आर्थिक नियोजन कोलमडले असून हे दर कमी करण्याची मागणी केली.
****
मुंबई-गोवा
महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आजपासून २४ सप्टेंबरपर्यंत
महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १६ टनांपेक्षा जास्त वजन असलेल्या
ट्रक, मल्टीएक्सेल, ट्रेलर तसंच रेती, वाळू, आणि गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर
ही बंदी असेल. मात्र जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट
देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment