Monday, 10 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ० सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



Ø वाढत्या इंधन दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध प्रस्तावांवर काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

Ø इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसह २१ विरोधी पक्षांचा आज भारत बंद

Ø बैलपोळा राज्यभरात उत्साहात साजरा

आणि

Ø दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेत रशिया, चीनसह जपानची एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

****



 वाढत्या इंधन दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध प्रस्तावांवर काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणणं, हा इंधनाचे दर कमी करण्याचा एक मार्ग असून, जीएसटी परिषदेनं तसा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देईल, असं ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पहिल्या तीन वर्षात इंधनाचे दर १३ वेळा कमी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमधून पेट्रोलियम पदार्थांवरचे कर मागे घ्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

****



 पेट्रोल-डीझेल दरवाढीसह वाढत्या महागाई विरोधात काँग्रेससह २१ विरोधी पक्षांतर्फे आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत बंद पाळला जाणार असून, इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपांसह विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.



 दरम्यान, विरोधी पक्षाच्या या बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नसल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षाला उशीरा जाग आली आहे. विरोधी पक्ष अपयशी ठरल्यानंतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असं संजय राऊत म्हणाले.



 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र आजच्या बंदला पाठिंबा दिला आहे.

****



 कॉँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये असं मत भारतीय जनता पक्ष प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. कॉँग्रेस शासीत काही राज्यांचे मुख्यमंत्री पेट्रोलवर जीएसटी लागू करण्यास विरोध करतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष पेट्रोल-डीझेल दरवाढी विरोधात आंदोलन पुकारतो, हा विरोधाभास असल्याचं ते म्हणाले.

****



 आयुष्यमान भारत अभियानाच्या जनआरोग्य योजनेंतर्गत लहान मुलांना होणाऱ्या कर्करोगाचा उपचार केला जाणार आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर विनोद कुमार पॉल यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. यात दारिद्र्य रेषेखालील आणि कनिष्ठ मध्यम वर्गातल्या परिवारांचा समावेश असणार असल्यानं जवळपास ४० टक्के परिवारांना याचा फायदा होईल. यासोबतच आयुष्यमान भारत अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या कर्करुग्णांची तपासणी केली जाणार असल्याचही पॉल म्हणाले.

****



 केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार २०१८ अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांमुळे झालेल्या रोजगार निर्मितीची यात विशेष दखल घेण्यात आली. मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्याचा पुरस्कार गडचिरोलीला, प्रभावी अंमलबजावणीसाठीचा पुरस्कार गडचिरोली नागरी ग्रामपंचायतीला आणि उल्लेखनीय कार्यासाठीचा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या खुटाघर इथले ग्राम डाकसेवक नूतन प्रकाश यांना जाहीर झाला आहे.

****



 ‘अजेय भारत - अटल भाजप’ अशी नवी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप सत्रात बोलत होते. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरल्याचा आरोप करुन कॉंग्रेस मुद्यांच्या आधारे न लढता केवळ असत्याचा आधार घेत असल्यानं, त्याचं खंडन आवश्यक आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.



 दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते-केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पक्षाच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत बोलतांना, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवून पक्ष पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला.

****



 माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या सात दोषींना मुक्त करण्याची शिफारस तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे केली आहे. संविधानातील अनुच्छेद ‘१६१ नुसार’ हा निर्णय घेण्यात आला.



 दरम्यान, केंद्र सरकारनं मात्र याआधीच असं न करण्याबाबत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याद्वारे चुकीची परंपरा सुरु होऊ शकते असं केंद्र सरकानं म्हटलं आहे.



****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 बैल पोळा काल राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. काल सायंकाळी परंपरागत पद्धतीनं बैलांची पूजा करून, त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला. बैलांच्या शिंगांना रंग देवून, अंगावर रंगीबेरंगी झूल टाकून त्यांची वाजतगाजत मिरवणूकही काढण्यात आली.

****



 राज्यात काल अनेक भागात जलाशयात बुडून मृत्यूच्या घटना घडल्या.

औरंगाबाद जिल्ह्यात सात जणांचा बैल धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात तीन तर नाशिक, लातूर तसंच हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका जणाचा अशाच घटनेत मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.  

****



 औरंगाबाद इथं, दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका-डी.एम.आय.सी अंतर्गत शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीत रशिया, चीन आणि जपान हे देश एकंदर एक हजार कोटी रुपये गुंतवणूकीतून उद्योग स्थापन करणार आहेत. काल मुंबई इथं यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली. रशियन पोलाद निर्मिती कंपनी नोव्होलिपेत्सक, चीनची वैद्यकीय उपकरणं बनवणारी ग्वांगडाँग बेही मेडीकल टेक्नोलॉजी तर जपानची काँक्रीट बनवणारी फ्युजी सिल्व्हरटेक या कंपन्यांचा यात समावेश असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****



 केंद्र सरकारनं आर्थिक दुर्बल रुग्णांना परवडणारी जन औषध योजना सुरु केली आहे. या अंतर्गत जेनेरिक औषधं ही सामान्यांना परवडणारी आहेत. या योजनेचे रत्नागिरी इथले लाभार्थी प्रेम पटेल यांनी या योजनेच्या लाभाविषयी दिलेली ही माहिती -



मैं प्रेम पटेल, रत्नागिरी रहिवासी हूँ. और मेरेको जनरीक मेडिसन औषध से बहूत फरक लगा है. मेरेको हरनिया का ऑपरेशन होलिया है. ऑपरेशन होने के बाद मैं जनरीक औषध लेता हू. और मेरेको बहूत फरक पडता है. और आपका गोली लेनेके बाद मार्केट के जो मेडिकलका है वह उनका ३०टक्का, ७० टक्का उसमें फरक लगता हे हमको. और उसमें हमको और पब्लीक को फायदा है. आप रेग्लूरल चालू रखोगें तो आपको बहूत फरक लगेंगा. और इसमें बाकीका कोई केमिकल वगेरे का बाकी कोई प्रोब्लम नही आयेंगा यह गोली से.

****



 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या २० वर्षीय नाओमी ओसाकानं आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा  ६-२, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका ही पहिली महिला जपानी खेळाडू ठरली आहे.



 दरम्यान, हैदराबाद इथं झालेली हैदराबाद खुली बॅडमिंटन स्पर्धा समीर वर्मानं जिंकली आहे. जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर असलेल्या समीरनं, काल झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत, मलेशियाच्या जू वेन सूंग चा सरळ दोन डावात पराभव केला.



 भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनही पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. काल अंतिम फेरीत त्यांनी, इंडोनेशियाच्या अकबर काहिओनो- मुहम्मद इस्फाहनी या जोडीला पराभूत केलं.

****



 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, औरंगाबाद नजिक वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्यांमध्ये तोडफोड करुन कोट्यवधी रुपयांचं नुकसान करण्यात आलं होतं, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या २३ संशयितांचा नियमित जामीन अर्ज, न्यायालयानं फेटाळून लावला आहे. तोडफोड करतानाचं सीसीटीव्ही फुटेज बघून या सगळ्यांना अटक करण्यात आली होती. 

****



 मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी काल पुण्यात मूक महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा अथवा रंगाचा झेंडा न घेता, तिरंगा ध्वजाच्या मागे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

 महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलल्या वासुदेवन सूर्यवंशी आणि विजय लोधी ऊर्फ भैया या दोघांना न्यायालयानं येत्या १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांना जळगावमधून दहशतवाद विरोधी पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांच्याकडून काही नकाशे तसंच काही आक्षेपार्ह कागदपत्रं हस्तगत केली आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश तसंच इतर विचारवंतांच्या हत्यांमध्ये या दोघांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...